फेसबुककडून 'अजाणतेपणी' लाखो युजर्सचे ई-मेल कॉन्टॅक्ट्स अपलोड
   दिनांक :19-Apr-2019
नवी दिल्ली:
 फेसबुकच्या करोडो युजर्सचा डेटा लीक झाल्याची माहिती काही दिवसांपूर्वी समोर आली होती. ६० कोटी युजर्सचा पासवर्ड फेसबुकमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना माहिती पडला त्यामुळे युजर्सची प्रायव्हसी धोक्यात आली होती. युजर्सचा डेटा चोरीला गेल्याची बाब समोर असतानाच,  कोट्यवधी फेसबुक युजर्सचा डेटा अ‍ॅमेझॉन क्लाउड सर्व्हरवर लीक झाल्याची माहिती समोर आली होती. यानंतर आता पुन्हा एकदा फेसबुक युजर्सच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कारण फेसबुककडून अजाणतेपणी तब्बल १५ लाख युजर्सचे ई-मेल कॉन्टॅक्ट्स अपलोड झाले आहेत.
 
 
मे २०१६ पासून आतापर्यंत 'अजाणतेपणी' १५ लाख युजर्सचे ई-मेल कॉन्टॅक्ट्स अपलोड झाल्याची माहिती फेसबुकनेच दिली आहे. कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, 'फेसबुकने मार्चमध्ये पहिल्यांदा साइन-अप करणाऱ्या युजर्सना ई-मेल पासवर्ड व्हेरिफिकेशन ऑप्शन ऑफर बंद केली होती. अशा काही प्रकरणांत युजर्सने अकाउंट तयार केल्यानंतर त्याचे कॉन्टॅक्ट्स फेसबुकवर अपलोड झाले होते.' तसेच जवळपास १५ लाख युजर्सचे ईमेल कॉन्टॅक्ट अपलोड झाल्याची माहिती फेसबुकने रॉयटर्सला दिली आहे. हे कॉन्टॅक्ट कोणाशीही शेअर करण्यात आलेले नाहीत. आता ते डिलीट करण्याचं काम सुरू आहे अशी माहिती फेसबुकने दिली आहे. ज्या युजर्सचे कॉन्टॅक्ट्स अपलोड झाले आहेत त्यांना कंपनीकडून नोटिफिकेशन पाठवण्यात येणार आहे. ही समस्या आता सोडवण्यात आली असल्याचेही कंपनीने स्पष्ट केले आहे.