राज ठाकरेंचा मतदानाचा अधिकार काढण्याचे प्रयत्न - मनसेचा आरोप
   दिनांक :19-Apr-2019
 
मुंबई: सध्या राज्यभर सुरू असलेली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भाषणे थांबवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर दिल्लीतून दबाव येत असल्याचा दावा पक्षाने केला आहे. तसेच, राज ठाकरेंचा मतदानाचा अधिकार काढून घेण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचा खळबळजनक आरोप गुरुवारी पुण्यात झालेल्या सभेत मनसे उपाध्यक्ष अभिजीत पानसे यांनी केला आहे.
 

 
 
राज ठाकरे यांनी महाराष्ट्रभरात सभांचा तडाखा लावला असून, यावेळी ते सर्वांधिक पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शाह यांना लक्ष्य करत असल्याचे दिसून आले आहे. या सभांच्या चर्चा सोशल मीडियावर रंगू लागल्या आहेत. त्यामुळे राज ठाकरेंची तोफ थंड करण्यासाठी भाजपाने कारवाया सुरू केल्या आहेत, असे मनसेने आपल्या आरोपात म्हटले आहे.
दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या सहकार्‍यांनी काही वकिलांशी सल्ला मसलत करून राज ठाकरेंच्या सभा कशा थांबवता येतील यावर विचारमंथन केले. यात राज ठाकरेंचा मतदानाचा अधिकारच काढून घेऊ, असा विचार मुख्यमंत्री करत असल्याचेही मनसेने म्हटले आहे. दरम्यान, राज ठाकरेंनी महाआघाडीला पािंठबा दिला नसला तरी आतापर्यंत झालेल्या सर्वच सभेत त्यांनी राज्य आणि केंद्र सरकारवर टीका चालवल्याने मुख्यमंत्री धास्तावल्याचा दावा पानसेंनी केला आहे.