'मनसे हा भाड्यानं विकलेला पक्ष आहे, त्यांना बाकीचं काही माहित नसतं'
   दिनांक :19-Apr-2019
मुंबई:
 
शिक्षणमंत्री विनोद तावडेंनी मनसेच्या पत्रावर बोलताना मनसे हा भाड्याने विकलेला पक्ष असल्याचे म्हटले आहे. तसेच, 'ती पाच वर्षांपूर्वीची घटना आहे, त्याचा आताच्या निवडणुकांशी काहीही संबंध नाही. त्यानंतर, राजनाथसिंह यांच्यासोबत मी अनेक दौरे केले. गाडीतून केले, विमानातून केले, ट्रेनमधून गेले. पण मनसे, जे भाड्यावर विकले जातात, त्यांना हे माहिती नाही, असे म्हणत तावडेंनी मनसेनं राजनाथसिंहांना लिहिलेल्या पत्राचा समाचार घेतला आहे.
 

 
नवी मुंबईतील मनसेच्या अध्यक्षांनी चक्क राजनाथसिंह यांना पत्र लिहून विनोद तावडेंना एकदा तुमच्या गाडीत बसू देण्याची संधी द्यावी, अशी मागणी केली होती. अर्थात, विनोद तावडेंची खिल्ली उडविण्याचा प्रयत्न मनसेने केला होता. मनसेच्या या पत्रावर विनोद तावडेंनी, मनसे हा भाड्यानं विकलेला पक्ष आहे, त्यांना बाकीचं काही माहित नसतं, मी राजनाथसिंह यांच्यासोबत विमानदौरेही केले आहेत, असे उत्तर दिलं आहे.
मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी इचलकरंजी येथील सभेत बोलताना, तावडेंना विनोदी नेता असे संबोधले होते. तसेच, राजनाथसिंहांचा ड्रायव्हर ज्यांना आपल्या गाडीत बसू देत नाही, त्यांनी राज ठाकरेंबद्दल बोलू नये, असेही संदीप देशपांडेंनी म्हटले. त्यानंतर, नवी मुंबईतील मनसेचे शहर अध्यक्ष गजानन काळे यांनी चक्क गृहमंत्री राजनाथसिंह यांना पत्र लिहून विनोद तावडेंना तुमच्या गाडीत बसू देण्याची एकदा संधी द्यावी, अशी मागणी केली होती. मनसेचे हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.