‘मेंटल है क्या’ चित्रपटाचे नाव वादाच्या भोवऱ्यात
   दिनांक :19-Apr-2019
राजकुमार राव आणि कंगना रणौत यांची मुख्य भूमिका असलेल्या ‘मेंटल है’ या चित्रपटाच्या शीर्षकावरून वाद सुरू झाला आहे. भारतीय मनोचिकित्सा संस्थेने चित्रपटाच्या शीर्षकावर आक्षेप घेतला असून निर्मात्यांना लवकरात लवकर शीर्षक बदलण्याची मागणी केली आहे. मानसिक आरोग्याच्या समस्यांना तोंड देणाऱ्यांसाठी हे नाव भेदभाव करणारे आणि हिणवणारे असल्याची तक्रार त्यांनी केली आहे.
 
 
या चित्रपटाचे पोस्टर्स नुकतेच प्रदर्शित झाले आहेत. या संस्थेने सेन्सॉर बोर्डालाही शीर्षक बदलण्यासंदर्भात पत्र लिहिले आहे. ‘चित्रपटाच्या नावाला आमचा तीव्र विरोध आहे. मानसिक विकार आणि मानसिक विकारांपासून पीडित असलेल्या लोकांसाठी हे भेदभाव करणारं, अपमानास्पद आणि अमानवीय आहे,’ असं त्यांनी म्हटलंय. यासोबतच मनोरुग्णांच्या हक्कांचे उल्लंघन करणारे एखादे दृश्य चित्रपटात असल्यास तेसुद्धा काढून टाकण्याची मागणी या संस्थेने केली आहे.
 
 
‘मेंटल है क्या’ या चित्रपटाच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या पोस्टरमध्ये कंगना आणि राजकुमार जीभेवर ब्लेड ठेवून त्याचा तोल राखण्याचा प्रयत्न करत असताना दिसतात. या पोस्टरवरही अनेकांनी आक्षेप घेतला होता. आता चित्रपटाचे निर्माते याला काय उत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. प्रकाश कोवेलामुडी दिग्दर्शित या चित्रपटात कंगना आणि राजकुमारसोबतच जिमी शेरगिल, अमायरा दस्तुर, सतीश कौशिक आणि अमृता पुरी यांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. हा चित्रपट २१ जून रोजी प्रदर्शित होणार आहे.