धनगर समाजाला मीच आरक्षण मिळवून देणार- महादेव जानकर
   दिनांक :19-Apr-2019
 
 
सांगली: धनगर समाजाला मीच आरक्षण मिळवून देणार आहे.  त्याबाबतची सुरुवात आम्ही केली, त्यामुळे शेवटही आम्हीच करणार, असा दावा दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी केला आहे. सांगली लोकसभा निवडणुकीतील भाजपाचे उमेदवार संजय पाटील यांच्या प्रचारासाठी दुग्धविकास मंत्री महादेव जानकर आले असता त्यांनी धनगर आरक्षणाबाबतीत भाजपा आणि आपली भूमिका स्पष्ट केली.
 

 
 
 
ते म्हणाले की, धनगर समाजाला आरक्षण देण्याचा मुद्दा केंद्र पातळीवर असून, राज्य सरकारकडून प्रयत्न सुरू आहेत. शिफारस करण्याबरोबर टिकणारे आरक्षण देण्यासाठी आपण आग्रही आहोत. त्याचबरोबर धनगर समाजाला आदिवासींप्रमाणे सामाजिक आरक्षण देण्यात आले आहे. आता राजकीय आरक्षणच उरलेले आहे. त्यामुळे आरक्षण देण्याची सुरुवात आम्ही केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून शेवटही आपणच करणार असल्याचा विश्वासही मंत्री जानकर यांनी यावेळी व्यक्त केला.
याआधी देशातील इतर मागासवर्ग आयोगाला कोणताही घटनात्मक दर्जा नव्हता. एनडीएच्या बैठकीत मागणी केल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आयोगाला घटनात्मक दर्जा मिळवून दिला. त्याचबरोबर धनगर समाजाच्या शेळी-मेंढी विकास महामंडळाला सरकारकडून एक हजार कोटी देण्यात येणार असून लवकरच अध्यादेश काढण्यात येणार असल्याचे मंत्र्यांनी स्पष्ट केले.