निवडणूक कर्तव्यातील वाहनाने तरुणाचा मृत्यू
   दिनांक :19-Apr-2019
 
 
मृतदेह आणला पोलिस ठाण्यात
दर्यापूर: दहा दिवसांपूर्वी लेहगाव रेल्वे येथील 25 वर्षीय तरुण रवींद्र कावनपुरे यास अंजनगाव नगर परिषदेच्या वाहनाने निवडणूक कार्यावर असताना धडक दिली होती. त्या तरुणाचा गुरुवारी रात्री अमरावती येथील खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला. यावरून मृताचे नातेवाईक संतप्त झाले. निवडणूक विभागाने मृताच्या रुग्णालयीन खर्चासह मदत द्यावी, असा आग्रह धरत मृतदेह दर्यापूर पोलिस स्टेशनला आणला. मागणीवर ठोस अश्वासन तहसीलदार तथा निवडणूक विभाग देणार नाही तोपर्यंत अंतिम संस्कार करणार नसल्याची भूमिका त्यांनी घेतली होती. काहीवेळाने दर्यापूर पोलिसांच्या यशस्वी शिष्टाईने नातेवाईकांनी अंतिम संस्कार आटोपले.
 
 

 
 
याच महिन्याच्या 7 तारखेला अंजनगाव नगर परिषदेची गाडी क्र एमएच 27 - 0482 ही निवडणूक कार्यात वापरली जात होती. त्या गाडीचे स्टिअरिंग लॉक झाल्याने गाडीचा अपघात झाला. यावेळी दर्यापूरवरून लेहेगाव येथे दुचाकीने जात असलेला 25 वर्षीय तरुण रवींद्र कावनपुरे यास जबर धडक बसली. यात तो गंभीर जखमी झाला होता. त्यास तातडीने अमरावती येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादारम्यान त्यांचा गुरुवारी मृत्यू झाला. रुग्णालयात उपचाराचा खर्च 3 ते 4 लाख रुपये आल्याचे नातेवाईक सांगत आहे. या खर्चाकरिता निवडणूक अधिकार्‍यांनी तरतूद करण्याची ग्वाही दिली असल्याचेही ते सांगतात. मात्र संपूर्ण खर्च कुटुंबाला करावा लागला असून निवडणूक विभागाकडून कुठलीही मदत मिळाली नाही, असा आरोप करीत नातेवाईकांनी आज मृतदेह पोलिस स्टेशनला आणला होता. दरम्यान जिल्हा निवडणूक अधिकार्‍यांनी खाजगी रुग्णालयातील डॉक्टरांशी संपर्क साधून मृताच्या उपचाराचे बिल देण्याची जबाबदारी घेतली असल्याचे कळते. मात्र यावर नातेवाईकांचे समाधान झाले नाही. मृतकाच्या कुटुंबास शासकीय मदत जाहीर करावी, असा आग्रह त्यांनी धरला आहे. त्यानंतर दर्यापूर पोलिसांनी नातेवाईकांची समजुत काढल्यावर अंत्यसंस्कार पार पडले.