इन्स्टाग्रामवर प्रभासचा पहिला फोटो
   दिनांक :19-Apr-2019
‘बाहुबली’ चित्रपटानंतर प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचलेल्या अभिनेता प्रभासने नुकतंच इन्स्टाग्रामवर पदार्पण केलं आहे. अकाऊंट उघडल्यानंतर चाहत्यांना प्रतीक्षा होती की प्रभास पहिला फोटो कोणता पोस्ट करणार? इन्स्टाग्रामवर कोणताही फोटो पोस्ट करण्यापूर्वी, डीपी ठेवण्यापूर्वीच त्याच्या फॉलोअर्सची संख्या सात लाखांवर गेली होती. आता त्याने पहिला फोटो पोस्ट केल्यानंतर चाहत्यांकडून त्यावर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.
 
 
actorprabhas असं त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटचं नाव असून त्याने ‘बाहुबली’ चित्रपटातील एक फोटो पोस्ट केला आहे. हाच फोटो त्याने डीपी म्हणूनसुद्धा ठेवला आहे. तलवारबाजी करतानाचा हा त्याचा फोटो आहे. अवघ्या २४ तासांत या फोटोला लाखोंच्या संख्येने लाईक्स १८ हजारहून अधिक कमेंट्स मिळाले आहेत. आपल्या आवडच्या सेलिब्रिटीच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याबद्दल जाणून घेण्यास चाहते नेहमीच उत्सुक असतात. सोशल मीडियामुळे चाहते आणि सेलिब्रिटींमधील दरी कमी होते. हेच जाणून घेत प्रभासने इन्स्टाग्रामवर येण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रभासचा आगामी ‘साहो’ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात अभिनेत्री श्रद्धा कपूरचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे. ‘साहो’मधील साहसदृश्यांसाठी हॉलिवूडमधील ५० लोकांची एक टीम भारतात बोलावण्यात आली आहे. ही टीम प्रभासला अ‍ॅक्शन सीनसाठी प्रशिक्षित करणार आहे. या प्रशिक्षणात सहभागी असलेल्या ५० लोकांनी अनेक हॉलिवूड चित्रपटांसाठी काम केले आहे.