निवडणूक: पुण्यात केंद्रीय सुरक्षा दलासह ७ हजार पोलिसांचा बंदोबस्त
   दिनांक :19-Apr-2019
 
 पुणे : पुण्यात २३ एप्रिल रोजी मतदान होणार आहे.  यासाठी केंद्रीय सुरक्षा दलाच्या कंपन्या, राज्य राखीव पोलीस दल, रेल्वे सुरक्षा दल, होमगार्ड यांच्यासह शहर पोलीस दलाचा ७ हजार पोलीस अधिकारी व कर्मचारी तैनाद असणार आहे़. त्याचबरोबर मध्य प्रदेश राज्य राखीव दलाच्या एका कंपनीचा बंदोबस्त असणार आहे़.
 

 
 
पुणे शहर लोकसभा व बारामती लोकसभा मतदारसंघातील पुणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत ४५२ इमारतीत २ हजार ५०९ मतदान केंद्रे आहेत़. शहरातील ३० पोलीस ठाण्यांच्या अंतर्गत मतदानाच्या बंदोबस्तासाठी १५५ पोलीस अधिकारी, १८०० होमगार्ड, राज्य राखीव पोलीस दलाच्या ३ कंपन्या, केंद्रीय सुरक्षा दल, रेल्वे सुरक्षा दल, मध्य प्रदेश राज्य राखीव पोलीस दल यांच्या प्रत्येकी एक कंपन्या तैनात करण्यात येणार आहे़. प्रत्येकी दोन पोलीस ठाण्याचा एक सेक्टर तयार करुन बुथच्या संख्येनुसार बंदोबस्तासाठी एक वाहन, एक अधिकारी व ३ कर्मचारी यांचे जलद कृती दल असणार आहे़ याशिवाय कोठेही काही अनुचित प्रकार घडल्यास प्रॉम्ट रिपॉन्स टीम असणार असून ते घटनास्थळी ३ ते ५ मिनिटात पोहचतील अशी बंदोबस्ताची आखणी केली़. याशिवाय प्रत्येक सहायक पोलीस आयुक्त, पोलीस उपायुक्त, अपर पोलीस आयुक्त, सह पोलीस आयुक्त यांच्याबरोबर १० कर्मचारी यांचा फौजफाटा असेल़. तसेच प्रत्येक पोलीस ठाण्याचा स्वतंत्र बंदोबस्त असणार आहे़. संवेदनशील मतदान केंद्रावर अतिरिक्त बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे़.
 
याशिवाय निवडणुक आयोगाच्या सूचनेनुसार सर्व ३० पोलीस ठाण्यात फ्लायिंग स्कॉड तसेच सर्व्हेलन्स स्टॅट्रिक फोर्स असणार आहे़. ते संपूर्ण मतदारसंघात फिरुन माहिती घेतील व थेट निवडणुक आयोगाला रिर्पोटिंग करणार आहेत़. त्यांच्याबरोबर व्हिडिओग्राफी करणारे पथकही असणार आहे़.