संजय दत्त करणार बहीण प्रियाचा प्रचार
   दिनांक :19-Apr-2019
 
 
 मुंबई: अभिनेता संजय दत्त आपली बहीण प्रिया दत्त यांच्या प्रचारासाठी मैदानात उतरणार असल्याची माहिती आहे. उत्तर मध्य मुंबई मतदारसंघात कॉंग्रेसच्या प्रिया दत्त आणि भाजपा उमेदवार पूनम महाजन यांच्यात सामना रंगला आहे. दोन्ही उमेदवारांचा आपापल्या पद्धतीने जोरदार प्रचार सुरू आहे.
 

 
 
 
संजय दत्त सर्व सहा विधानसभा मतदारसंघात सोमवारपासून रोड शोसाठी सुरुवात करणार आहे. सध्या प्रिया यांचा प्रचार लहान मोठ्या बैठका, घरोघरी भेट अशा पद्धतीने सुरू आहे. आता त्यांच्या मदतीला भाऊ संजय दत्तही येणार आहे. उत्तर मध्य मुंबई मतदारसंघात भाजपाच्या विद्यमान खासदार पूनम महाजन आणि प्रिया दत्त टक्कर देणार आहेत. मागील निवडणुकीत पूनम यांनी पराभूत केल्यामुळे प्रिया यांच्याकडे पराभवाचा वचपा काढण्याची संधी आहे. सुरुवातीला त्यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिला होता. मात्र पक्षातील दिग्गज नेते आणि कार्यकर्त्यांच्या मनधरणीनंतर त्या पुन्हा लोकसभेच्या रिंगणात उतरण्यास तयार झाल्या.
दिवंगत अभिनेते तसेच केंद्रीय मंत्री सुनिल दत्त यांच्या मृत्यूनंतर 2009 मध्ये प्रिया दत्त यांनी उत्तर मध्य मुंबईच्याच जागेवरून खासदारकी मिळवली होती. 2014 च्या निवडणुकीत मात्र भाजपाचे दिवंगत नेते प्रमोद महाजन यांच्या कन्या पूनम यांनी प्रिया यांचा 1.86 लाख मतांनी पराभव केला होता. त्यामुळे आपला मतदारसंघ काबीज करण्यासाठी प्रिया दत्त यांनी पुन्हा कंबर कसली आहे.