‘त्या’ वळणावर!
   दिनांक :02-Apr-2019
घुमू संगतीनं
अमान रेड्डी
 
 सकाळी अगदी निवांत उठलो सात वाजता! मग बाहेर चहा आला होता, तो घेतला. तिथे 2 लडाखी महिला लडाखी पोशाख घालून फोटो काढावा, असं आवतण देत होत्या. मग तो कार्यक्रम झाला. आता उत्तम नाष्टा करत गप्पा टप्पा करत बसलो. बर्‍यापैकी उशिरा, म्हणजे साडेनऊला निघालो. हे आत्तापर्यंतचे सगळ्यात उत्तम रहाणे होते. वाटेत एका उभ्या बुद्धाच्या पुतळ्यापाशी थांबलो. हे जरा टेकडीवर होते, त्यामूळे चौफेर पसरलेले रण दिसत होते. ते बघत असताना हळूहळू लांबवर धूळ उडू लागली. तो वारा हळूहळू मोठा होत होत एक छोटेसे धुळीचे वादळ तयार झाले व समोरील पर्वत काही काळ त्यात अदृश्य झाले. काही मिनिटांतच ते शमले व आम्ही पुढे निघालो. जाताना त्या रणातून सपाट रस्त्यावरून गेलो, जो आम्ही कालवरून घाटातून पाहीला होता.
आजही वातावरण स्वच्छ होते पण आज तेवढे प्रखर ऊन्ह नव्हते कालच्यासारखे. आज मी हेल्मेट परत घातले होते. पटापट खारदुंगलावर पोहोचलो. वर पोचताना थोडा बर्फ होता रस्त्यात, त्यावर एक चारचाकी घसरत होती. अक्षय त्याच्या मागे जाऊन फसला आणि त्याची पण गाडी पकड घेईना. मी बाजूने बर्फावरूनच काढली पण मी जाऊ शकलो. वर जाऊन गाडी लावली व परत यायला निघालो. पण तोपर्यंत अक्षयची पण गाडी सुटली होती आणि त्याने ‘‘येऊ नको’’ म्हणून सांगितले. मग अतुलला गाडी घेऊन परत मागे पाठवले. तो परत चढून येताना त्याचे चित्रण केले. आज इथे खूपच सुसह्य होते. गर्दी होतीच. शेवटी, अशा उंच ठिकाणी दहा मिनिटांपेक्षा जास्त थांबू नका, हे आठवून निघालो. तिथून झटपट खाली उतरलो आणि सरळ हॉटेल गाठले. आता प्रचंड भूक लागली होती. लगेच जेवायला बाहेर पडलो. मी कालच जर्मन बेकरी बघितली होती जवळच. तिथे जायचे ठरवले. त्यात एक हेतू हा होता की- तिथे वायफाय असते. पण तिथे गेलो तर ते बिघडले आहे गेले 3-4 दिवस अशी माहिती मिळाली. अर्थात, जेवण तिथेच केले.
 

 
 
परवासारखेच चीजने भरलेले बर्गर, बटाटा काप आणि वर कॉफी! मग आम्ही म्हटलं आता थोडी ताणून देऊ आणि मग परत बाजारात येउ. तेव्हाच करायला टाकलेले टीशर्ट्स घेऊ. पण अतुल टीशर्टवाल्याकडे जाऊन बसला आणि आम्ही येऊन झोपलो. तासभर मस्त झोप झाली आणि एकदम वाद्यांचा मोठा गोंधळ ऐकू येऊन जाग आली. समोरच्याच आमच्या परवाच्या हॉटेलमधे गच्चीत स्थानिक लोकांचा नाच चालू झाला होता पर्यटकांसाठी. मग मी त्याचे थोडे चित्रण केले. मग अचानक मला बनियन धुण्याची आठवण झाली. खोलीत येऊन ते धुऊन परत गच्चीत वाळत टाकले. हे कधी? तर अंधार पडायला फार तर अर्धातास राहिला असताना. पण आज नसते धुतले तर एकदम मनालीलाच दिवसांनी. थोड्या वेळापूर्वी, परवा धोब्याकडे दिलेले कपडे त्याने धुतलेच नव्हते असे कळले होते. ते त्याने म्हणे मगाशीच धुतले.
 
मग ते पण येतील की नाही प्रश्नच होता. पण तिथे खूपच कोरडी हवा असल्याने असेल, रात्री माझे बनियन पण 80 टक्के वाळलेले होते आणि धोब्याचे कपडे पण आले होते पूर्ण कोरडे होऊन! चला, उद्या सकाळी धावपळ नको. आता अतुल आला होता आणि ‘‘फार झोप येत आहे’’ म्हणू लागला. मघाशी ये म्हटल तर आला नाहीस. पण एक झालं, त्याने सगळे टीशर्ट्स अजयसाठी पण, करून आणले होते. त्याने एक मोठा 10 लिटरचा डबा आणला होता पेट्रोलसाठी. कारण उद्या उपशी नंतर जवळपास 365 किलोमीटर पेट्रोल पंप नाही. एकदम टंडीलाच. त्यामुळे! सगळ्यांनीच 5, 5 लिटर पेट्रोल घ्या, असे निलेशने सूचवले होते. पण मला माझी गाडी तब्बल 48 सरासरी देत होती. फक्त नुब्रालाच तिने 45 सरासरी दिली होती. टाकी 15 लिटरची होती. त्यामूळे मला मनालीपर्यंत पेट्रोल लागणारच नव्हते.
 
अतुल अक्षयला सरासरी 35 आणि 30 अशी मिळाली होती. त्यांच्या पण टाकीची क्षमता बघता अतिरिक्त पेट्रोल लागले असतेच अस नाही. त्यामुळे चौघात मिळून 10 लिटर घेऊ असं ठरवलं. पण अजयला फोन केला तर तो म्हणाला- त्याने आधीच 5 लिटर पेट्रोल घेतलंय्‌. तर मग आम्हा तिघांत 10 खूपच झाल. हो, उगाच जास्त झालं असतं तर चंदिगढमधे काढून घेऊन काय करणार? वायाच गेलं असतं. त्यामुळे योग्य गणीत करायची गरज होती. 10 लिटर घेऊ, जर गरज नाहीच पडली कोणाला तर मीच ते माझ्या गाडीत टाकून पुढे जाईन. कारण मी आणि अजय चंदिगढला न जाता मनालीहून स्पितीला जाणार होतो. पुढे 10 दिवस. मग ठरल्यावर पेट्रोल भरून आणि घेऊन आलो. आता फक्त वैयक्तिक खरेदीसाठी बाहेर पडलो. फार काही घेतले नाही पण बाजारात फिरायला मजा आली. आणि आता आजचा शेवटचा दिवस लेह मधला! हॉटेलवर आलो तर कळले की उद्या पांग ऐवजी सरचूला जाऊन रहायचे अस नक्की झालंय्‌. कारण तिथे चांगली सोय आहे पांगपेक्षा. म्हणजे 90-100 लोमीटर जास्त. म्हणून पहाटेच उठायचे होते. अर्थात, आत्तापर्यंत सवय झालीच होती. भल्या पहाटे उठून 200 किलोमीटर दौड करायची. त्यामुळे फारसे काही वाटले नाही. आज दुसर्‍या रसाची बाटली काढून संपवली.