शहरांची वैशिष्ट्यपूर्ण रचना!
   दिनांक :02-Apr-2019
हॅपनिंग वे
 
पल्लवी जठार-खताळ
 
दक्षिण भारताच्या तमीळनाडू राज्याचा तसेच पॉंडिचेरीचा भाग असलेले ओरोविल शहर अनेक कारणांनी अद्‌भुत आहे. या शहरात कोणताही धर्म नाही, तसेच या शहरासाठी कोणतेही सरकारही नाही. मानव हाच धर्म व मानवी एकात्मता याच उद्देशाने हे शहर वसविले गेले आहे. भारत सरकारचे या शहराला समर्थन आहे व युनेस्कोने या शहराला आंतरराष्ट्रीय शहर म्हणून मान्यता दिली आहे. पहाटेचे शहर किवा ‘सिटी ऑफ डॉन’ या नावानेही ते ओळखले जाते.
 
 
 
या शहरात कोणत्याही देशाचा, धर्माचा नागरिक वास्तव्य करू शकतो. मात्र येथे राहताना त्याला कोणतेही पद मिळत नाही तर सेवक म्हणून राहावे लागते. येथे जातपात, उच्चनीच अस भेदभाव करता येत नाही. या शहराचे भूमिपूजन अरिंवद आश्रमाच्या माताजींच्या आशीर्वादाने 28 फेब्रुवारी 1968 रोजी 124 देश व भारतातील 23 राज्यांतून एकत्र आलेल्या 5 हजार लोकांनी एका वडाच्या झाडाखाली जमून केले. 124 देशातून तसेच भारताच्या 23 राज्यांतून आणण्यात आलेली माती येथे एकत्र केली गेली. अशा शहराची कल्पना मॉंना 1930 सालीच सुचली होती, असेही सांगितले जाते.
 
 
 
या शहराची रचना वैशिष्ट्यपूर्ण आहे. शहरात एकच मंदिर आहे मात्र ते कोणत्याही देवाचे नाही. ते मातृमंदिर म्हणून ओळखले जाते व येथे लोक योगाभ्यास, ध्यानधारणा करतात. शहरात इंडस्ट्री, निवासी, शांतता, आंतरराष्ट्रीय असे विविध विभाग आहेत. लघु व मध्यम क्षमतेचे उद्योग आहेत तसेच प्रशिक्षण केंद्रे, कला, क्राफ्ट आणि प्रशासनही आहे. शहराभोवती मोठा ग्रीन बेल्ट आहे. बगीचे खूपच आहेत. चेन्नईपासून 150 किमी वर तर पॉंडिचेरीपासून 14 किमीवर अंतरावर हे शहर आहे. जगातला हा पहिला व एकमेव आंतरराष्ट्रीय प्रकल्प आहे.