कॉंग्रेसची २०२४ ची तयारी...!
   दिनांक :02-Apr-2019
 
कटाक्ष 
 
गजानन निमदेव  
 
 
 
निवडणुका घोषित व्हायच्या होत्या, सहा-आठ महिन्यांचा कालावधी शिल्लक होता, तेव्हापासूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात एकत्र येण्याचा विरोधी पक्षांचा प्रयत्न चालला होता. कॉंग्रेस हा देशातला सगळ्यात जुना पक्षही या प्रयत्नांत सहभागी होता. जवळपास 22-23 पक्षांची महाआघाडी तयार होणार होती. कॉंग्रेस हा या महाआघाडीतील एक घटक पक्ष राहणार होता. पण, आज अशी स्थिती आहे की, उत्तरप्रदेशसाख्या सगळ्यात मोठ्या राज्यात समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टी यांनी युती करून जागावाटपही केले, तरी कॉंग्रेसला पत्ता लागला नाही! एकप्रकारे सपा-बसपाने कॉंग्रेसचा पत्ता कट केला. ज्या उत्तरप्रदेशने देशाला सर्वाधिक पंतप्रधान दिलेत, त्या उत्तरप्रदेशात कॉंग्रेसची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे. सध्याचे कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी ज्या अमेठी मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात त्या अमेठीची आणि इंदिरा गांधींपासून तर सोनिया गांधींपर्यंत जो मतदारसंघ कॉंग्रेसकडेच आहे, त्या रायबरेलीची काय अवस्था आहे, हे प्रत्यक्ष जाऊन बघितले तर कॉंग्रेसला उत्तरप्रदेशच्या जनतेने गेली तीस वर्षे का नाकारले आहे, हे सहज लक्षात येईल.
 

 
 
महाआघाडीसाठी जेव्हा प्रयत्न सुरू होते, तेव्हा मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड विधानसभा निवडणुकीचे निकाल लागायचे होते. त्या वेळी समाजवादी पार्टी, बहुजन समाज पार्टी, तृणमूल कॉंग्रेस, राजद, जेडीएस, राकॉं अशा प्रादेशिक पक्षांपुढे थोडे झुकण्याची कॉंग्रेसाध्यक्ष राहुल गांधी आणि सरचिटणीस प्रियांका गांधी-वढेरा यांची तयारी होती. मात्र, तीन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले, तीनही ठिकाणी कॉंग्रेसची सत्ता आली आणि कॉंग्रेसची वर्तणूकच बदलली. आज कॉंग्रेस ज्या प्रकारे निवडणूक लढवते आहे, ते पाहता हा पक्ष 2024 ची तयारी करत आहे, असेच दिसते. आपला पक्ष राष्ट्रीय स्तरावरचा असल्याने आपण प्रादेशिक पक्षांपुढे एवढे झुकू नये, याची जाणीव अचानक राहुल-प्रियांका यांना झाली आणि त्यांनी प्रादेशिक पक्षांच्या अटी झुगारायला सुरुवात केली. स्वत:ची राष्ट्रीय प्रतिमा कॉंग्रेसला अचानक आठवली आणि त्याने महाआघाडीबाबतची भूमिकाच बदलली.
 
ज्या वेळी भाजपाने स्वबळावर केंद्रात सरकार स्थापन केले, त्यानंतर एकेका राज्यातली कॉंग्रेसची सत्ता निवडणुकांच्या माध्यमातून हिरावून घेतली, त्या वेळी कॉंग्रेसच्या पायाखालची वाळू सरकली होती. त्यामुळे भयभीत झालेल्या कॉंग्रेसने कुठल्याही प्रादेशिक पक्षाशी मैत्री करण्याची तयारी ठेवली होती. कॉंग्रेसची ही अवस्था बघून प्रादेशिक पक्षांनीही, त्यांना सल्ला देणार्‍या स्वयंघोषित विचारवंतांच्या सांगण्यावरून कॉंग्रेसवर दबाव वाढवायला सुरुवात केली. प्रादेशिक पक्षांपेक्षा त्यांच्याप्रती सहानुभूती ठेवणार्‍या तमाम विचारवंतांनी प्रादेशिक पक्षांमार्फत कॉंग्रेसवर दबाव वाढवला होता. कॉंग्रेस पक्षानेच पुढाकार घेत मोदीविरोधी आघाडी तयार करण्यासाठी हा दबाव होता. नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदावरून हटविण्याची इच्छा असलेले तमाम बुद्धिजीवी एकत्र आले, मोदींविरुद्ध त्यांनी बेंबीच्या देठापासून बोंबलायला सुरुवात केली. कॉंग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी मोदींविरुद्ध काहीही करू शकतात, कुठलेही पाऊल उचलू शकतात, हे माहिती असल्याने या बुद्धिजीवींनी मोदीविरोधाची धार तीव्र करण्याचा प्रयत्न केला, राहुल गांधी यांना जाळ्यात ओढण्याच्या प्रयत्नात ते यशस्वीही ठरले. आज राहुल गांधी जी भाषा बोलत आहेत, त्यांच्या पक्षात तिकीटवाटपावरून जो गोंधळ सुरू आहे, तो बघितला तर त्यांना 2019 ची निवडणूक जिंकायची  नसून, ते 2024 ची तयारी करीत आहेत, हेच दिसून येते.
 
ज्यांनी कधी निवडणुकीचे राजकारण केले नाही, जे कुठल्याही राजकीय पक्षात नाहीत, ज्यांना राजकारण कसे करतात हे माहिती नाही, असे अनेक बुद्धिजीवी, विचारवंत आपल्याला राजकीय विश्लेषक म्हणून टीव्ही वाहिन्यांवरील चर्चेत सहभागी होताना दिसतात. राजकारणात कोण चुकतंय, कोण बरोबर आहे, काय करायला पाहिजे, काय करायला नको, कोण जातीयवादी आहे, कोण धर्मनिरपेक्ष आहे, हे ठरविण्याचा अधिकार या स्वयंघोषित वा वृत्तवाहिन्याघोषित राजकीय विश्लेषकांनी स्वत:कडे घेतल्याचेही स्पष्टपणे जाणवते. यापैकी अनेक लोक वर्तमानपत्रांतून स्तंभ लिहितात, अनेक जण स्वत:च्या ब्लॉगवरही लिहितात. कॉंग्रेसने जर स्वत:ची जबाबदारी नीट पार पाडली तर भाजपाविरोधी महाआघाडी योग्य रीत्या अस्तित्वात येऊन मोदींना मात देऊ शकते, असे मत या मंडळींनी लेखांमधून व चर्चांमधून व्यक्त केलेले आहे. असे मत व्यक्त करतानाच, प्रत्येक राज्यात जशी राजकीय स्थिती आहे, त्याप्रमाणे ही महाआघाडी आकार घेईल, असे सांगायलाही हे लोक विसरले नाहीत. याचा अर्थ असा की, प्रादेशिक पक्ष सांगतील त्याप्रमाणे कॉंग्रेसने तडजोडी स्वीकारायच्या आणि आघाडी अस्तित्वात आणायची. हळूहळू झाले काय की, प्रादेशिक पक्षांनी आपला अजेंडा राबविला आणि एकेका राज्यातून कॉंग्रेस महाआघाडीतून गायब झाली. महाराष्ट्रासारख्या मोठ्या राज्याचा अपवाद वगळला, तर कुठल्याही राज्यात कॉंग्रेस पक्ष म्हणावी तशी आघाडी प्रादेशिक पक्षासोबत करू शकला नाही.
 
उत्तरप्रदेशसारख्या सगळ्यात जास्त जागा असणार्‍या राज्यात समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टीने परस्पर आघाडी केली आणि 80 पैकी 38-38 जागा वाटून घेतल्या. तीन जागा अजित िंसह यांच्या राष्ट्रीय लोकदलासाठी सोडल्या. अमेठीत राहुल गांधी आणि रायबरेलीत सोनिया गांधी उभ्या राहणार असल्याने या दोन मतदारसंघांत उमेदवार न देण्याचा तेवढा निर्णय सपा-बसपा आघाडीने घेतला. त्यामुळे या राज्यात स्वबळावर निवडणूक लढण्याशिवाय कॉंग्रेसपुढे पर्याय उरला नाही. सपा-बसपा आपल्याला सोबत घेत नाही हे पाहूनच मग कॉंग्रेसने प्रियांका गांधी-वढेरा यांना उत्तरप्रदेशमध्ये सक्रिय केले. त्यांच्या दिमतीला ज्योतिरादित्य िंसदिया यांनाही मैदानात उतरविले. सध्या प्रियांका गांधी ज्याप्रकारे परिश्रम घेत आहेत, ते बघता कॉंग्रेसला सपा-बसपाने किती व कसे झिडकारले आहे, हे सहज लक्षात येईल. प्रत्यक्ष रणधुमाळीत कॉंग्रेसकडून फक्त मोदींवरच टीका केली जाते की सपा-बसपालाही लक्ष्य केले जाईल, हे येणार्‍या काळात दिसून येईलच. बिहारमध्ये लोकसभेच्या 40 जागा आहेत. त्यापैकी कॉंग्रेससाठी केवळ 8 जागा सोडण्याची तयारी लालूपुत्र तेजस्वी यादव यांनी दाखविली. एकप्रकारे कॉंग्रेसची बोळवण करण्याचाच प्रयत्न झाला. तिकडे बंगालमध्ये 42 जागा आहेत. पण, कॉंग्रेससाठी एखादी तरी जागा सोडावी, असे तृणमूल कॉंग्रेसच्या ममता बॅनर्जींना वाटले नाही. ओरिसातही तीच स्थिती झाली कॉंग्रेसची. बंगालमध्ये मोदींचा मुकाबला फक्त ममता दीदीच करू शकतात आणि ओरिसात नवीन पटनायकच पुरेसे आहेत, याची जाणीव या दोन्ही पक्षांचे
 
सहानुभूतिदार असलेल्या स्वयंघोषित विचारवंत कम राजकीय विश्लेषकांनी कॉंग्रेसला व सोबतच देशालाही करून दिली.
543 सदस्यसंख्या असलेल्या लोकसभेत बहुमत मिळविण्यासाठी भारतीय जनता पार्टी संपूर्ण ताकदीने लढत आहे. प्रत्येक राज्यात भाजपाने आपली ताकद आणि प्रतिष्ठा पणाला लावली आहे. असे असताना प्रादेशिक पक्षांच्या भरवशावर मोदींना हरविण्यासाठी निघालेल्या कॉंग्रेसवर नामुष्कीची आणि बेइज्जत होण्याची पाळी तेव्हा आली, जेव्हा अजित िंसहांच्या राष्ट्रीय लोकदलासाठी तीन जागा सोडताना कॉंग्रेससाठी फक्त दोन जागा सोडण्याची तयारी दाखवली. ज्या कॉंग्रेसला उत्तरप्रदेशने पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी आणि राजीव गांधींच्या रूपाने तीन तीन पंतप्रधानपदाचे उमेदवार दिले, ते प्रत्यक्षात पंतप्रधान झालेत, त्या उत्तरप्रदेशातल्या 80 जागांपैकी फक्त दोनच जागांसाठी सपा-बसपाने कॉंग्रेसला लायक समजावे, हा केवढा मोठा अपमान! कॉंग्रेससोबत आघाडी करायची, कॉंग्रेसच्याच माणसाला पंतप्रधानही करायचे. पण, सरकार एवढे लाचार आणायचे की, सातत्याने दबावाखाली ठेवत स्वत:चा स्वार्थ साध्य करायचा, ही प्रादेशिक पक्षांची खेळी आता कॉंग्रेसच्या लक्षात आली असणार, असे समजू या. नसेल आली तर मोदींनी पाहिलेले कॉंग्रेसमुक्त भारताचे स्वप्न राहुल गांधीच साकार करतील, यात शंका नाही!