गुरूचे धनू व वृश्चिक राशीतील भ्रमण सत्ताधार्‍यांना यशाकडे नेणारे...
   दिनांक :02-Apr-2019
 
 
 
ज्योतिषाचार्य डॉ. अनिल वैद्य
 
 
 दि. 11 ऑक्टोबर 2018 रोजी वृश्चिक राशीत प्रवेश केलेला ‘गुरू’ ग्रह दि. 29 मार्च, शुक्रवार रोजी सायकाळी 7.08 वा. ‘धनू’ राशीत प्रवेशता झाला. याच दिवशी ‘बुध’ ग्रह मार्गी लागला असून शनी आणि केतू हेसुद्धा सध्या ‘धनू’ या गुरूच्याच राशीतून भ्रमण करीत आहेत. हे सर्व ग्रह सत्ताधारी पक्षास सत्ता राखण्यास अनुकूल आहेत, असे आंतरराष्ट्रीय ज्योतिषाचार्य डॉ. अनिल वैद्य यांनी सांगितले.
 
 
 
 
 
22 एप्रिलला ‘गुरू’ वक्री गतीने वृश्चिक राशीत येणार असून, पुन्हा मार्गी होऊन 4 नोव्हेंबरला पुन्हा धनू राशीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे एकाच वर्षात जनतेला दोन राशीतील गुरूची फळे अनुभवास येतील.
काही महिन्यांपूर्वी भाजपासारख्या पक्षसंघटनेला थोड्या अडचणी निर्माण झाल्या होत्या, मात्र गुरूचे हे भ्रमण पुन्हा सत्तेत येण्यासाठी त्यांना अत्यंत अनुकूल असल्याचे डॉ. वैद्य यांनी सांगितले. ‘2019’ या वर्षाची बेरीज (2+0+1+9=12=1+2=3) बारा येते याचा अर्थ ‘3’ हा गुरूचा आकडा प्रस्थापित होतो. या वर्षी यामुळेच देशावर ‘गुरू’ महाराजांची कृपा राहील.
सध्या ‘गुरू’ ग्रहाचा वारंवार राशिपालट व मार्गी-वक्री होत असल्यामुळे देशात एकप्रकारे अस्थिरता आहे; तसेच प्रत्येकाला याचा वेगवेगळ्या प्रकारे त्रासच होत असावा. त्यामुळे सध्याच्या काळात पीडापरिहारार्थ ‘गुरूचा’ नियमिीत जप, दान, पूजा अवश्य करावी, असा डॉ. वैद्य यांचा सल्ला आहे.
मार्च महिन्यातच ‘राहू’चे मिथुनेत तर ‘केतू’चे धनूत आगमन झाले आहे. शनी या आधीपासूनच धनूत मुक्कामाला आहे. त्यामुळे आगामी दीड वर्ष शनी-केतू युती जगात धुमाकूळ घालतील आणि या काळात होणारी ग्रहणे मिथुन व धनू राशीत होणार आहेत. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर राहूचा जबरदस्त प्रभाव पडणार आहे.
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा ग्रहणातलाच जन्म. त्यामुळे राहू-केतूचा प्रभाव त्यांच्यावर सतत जाणवत असतो. त्यांच्या कुंडलीत कालसर्प योग असून, भारताचे पंतप्रधान मोदीजी याप्रमाणेच त्यांचीही वृश्चिक राशी आहे. राहुल गांधींचीही वृश्चिकच राशी आहे. वृश्चिक राशी गुप्तपणे गनिमी काव्यानेच लढा देत असते. ‘दे धक्का’ हे तंत्र वृश्चिकेला प्राणप्रिय असते, त्यातच साडेसातीचे शेवटचे पर्व. शनीसोबत आलेला केतू कडवा लढवय्या होण्यास भाग पाडतो.
अमेरिकेची कुंडली धनू लग्नाची आहे. त्यानुसार मिथुनेतील राहू त्यांच्या कुंडलीत सप्तमात असेल आणि राहूसोबत 7 मेपासून मंगळही येत आहे.
शनी-मंगळ प्रतियोग, शनी-केतू युती, मंगळ-राहू युती व केतू-मंगळ प्रतियोग हा जगाला किती क्लेशदायक आहे, त्याची कल्पना सैतानालाही करता येणार नाही. असे योग 72 वर्षांनी येत आहेत. 22 जूनपर्यंत मंगळ-राहू युती अमेरिकेस एल्गार करण्यास भाग पाडेल. 7 मे 2019 ते 22 जून 2019 हा कालखंड जगाला हादरवणारा ठरेल. या कालावधीत ट्रम्प यांच्या बुधावरून भ्रमण करणारा राहू त्यांची दिशाभूल करेल, असे डॉ. अनिल वैद्य म्हणालेत.
भारत, पाकिस्तान, इस्रायल यांच्या कुंडलीत चंद्र कर्क राशीत असल्याने हा बदललेला ‘राहू’ बारावा होत आहे.
पाकिस्तानच्या कुंडलीत राहू तृतीय स्थानातून भ्रमण करत असल्याने 10 मे ते 4 जून या दरम्यान पाकिस्तानातील गृहकलह वाढण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे येणार्‍या काळात पाकिस्तानात सत्ताबदलाची शक्यता नाकारता येत नाही. कारण इमरान खान वक्री शनी असताना पंतप्रधानपदी आले आहेत व शनी आता मार्गी झाला आहे, त्यामुळे मार्च 2019 नंतर त्यांच्या भाग्यातील शनी-केतू, रवी, चंद्र, बुध व शुक्रास सहावे होत आहे. बारावा केतू संयुक्त राष्ट्रसंघात चीनची सरशीच दाखवत आहे. चीनची रास ‘मकर’ आहे.
भारतात नवी लोकसभा अस्तित्वात येत आहे, त्यांना आल्या आल्याच जागतिक स्तरावरील आव्हाने स्वीकारून, देशाला विकासाच्या, प्रगतीच्या मार्गावर न्यायचे आहे. त्यात ते नक्कीच यशस्वी होतील, असे आंतरराष्ट्रीय ज्योतिषाचार्य डॉ. अनिल वैद्य यांनी सांगितले.
 
9371838951