#MeToo च्या आरोपांनंतर स्वत:ला निर्दोष सिद्ध करण्यासाठी प्रसिद्ध रॉकस्टारची आत्महत्या
   दिनांक :02-Apr-2019
#MeToo च्या आरोपानंतर मॅक्सिकोतील प्रसिद्ध रॉकस्टार अर्मांडो वेगा गिल यांनी स्वत:ला निर्दोष सिद्ध करण्यासाठी आत्महत्या केली आहे. त्यांच्या आत्महत्येनं संगीत विश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे. ते ६४ वर्षआंचे होते. ‘मी अपराधी नाही म्हणूनच स्वत:ला निर्दोष सिद्ध करण्यासाठी मी आत्महत्या करत आहे’ असं त्यांनी सुसाइड नोटमध्ये म्हटलं आहे.

 
 
#MeTooMexicanMusicians मोहिमेअर्तंगत एका अज्ञात महिलेनं अर्मांडो वेगा गिल यांच्यावर लैंगिक गैरवर्तणुकीचे आरोप केले. ती १३ वर्षांची असताना अर्मांडो यांनी आपलं लैंगिक शोषण केल्याचा आरोप तिनं केला. या आरोपानंतर अर्मांडो यांनी आपल्या राहत्या घरात आत्महत्या केली. ‘संबधीत महिलेनं माझ्यावर जे आरोप केले आहेत ते पूर्णपणे चुकीचे आहेत. मी दोषी आहे किंवा मी या प्रकरणात अपराधी आहे म्हणून मी आत्महत्या करत नाही मी स्वत:ला निर्दोष सिद्ध करण्यासाठी आत्महत्या करत आहे. माझ्या मुलाला भविष्यात या चुकीच्या आरोपांमुळे त्रास होऊ नये म्हणून मी स्वत:चं जीवन संपवत आहे’ असं अर्मांडो यांनी आत्महत्यापूर्वी लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.
आर्मांडो यांनी आत्महत्येपूर्वी हे पत्र आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवरही शेअर केले. ‘मी टु मोहिमेअर्तंगत नाव आल्यानं ते खूपच दु:खी होते. या आरोपांमुळे आपल्या मुलाला कोणताही नाहक त्रास सहन करावा लागू नये याची चिंता त्यांना सतावत होती म्हणूनच त्यांनी आत्महत्या केली अशी माहिती त्यांच्या जवळच्या व्यक्तीनं दिली आहे.