किलच्या कशाला पाडायच्या!
   दिनांक :02-Apr-2019
 
 ही तो रश्रींची इच्छा!
 
 र. श्री. फडनाईक
 
राजकारणातनं काही कारण नसताना नसते ते राज उघड केले जातात! लोकांना जे माहीत नाही, ते लोकांच्या हिताचे असो वा नसो, कामाचे असो वा नसो, त्याचे चवर्ण केले जाते. चूक आहे ते!
आता हेच पाहा ना, इंडियन नॅशनल कॉंग्रेस हा एक राष्ट्रीय पक्ष आहे; आहे ना! या पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी आहेत; आहेत ना! ते उत्तर प्रदेशातील अमेठीतून उभे राहत आले आहेत, यावेळी सुद्धा ते तिथूनच ‘लढणार’ आहेत. याशिवाय ते केरळमधील वायनाड या मतदारसंघातूनही आपले नशीब आजमावणार असल्याचे वृत्त अनावृत्त झाले आहे. आता या घटनेवर मल्लिनाथी करण्याची काही गरज आहे का! राहेतना राहुलजी डझनभर ठिकाणांहून! डिपॉझिट तेच भरणार! जप्त झाले तर त्यांचेच पैसे सरकारजमा होणार! तेवढेच पैसे सरकारला आयतेच मिळणार! तुमचं काय जाते? उगाच किलच्या पाडायच्या! विरोधकांच्या त्यांच्याविरुद्धच्या घोषणा काय राहतील, यावरही लोकांचा कल्पनाविलास! वायनाड से खडा है फोकनाड, हा त्यातला एक कल्पनाविलास! लोकांच्या कल्पनासृष्टीत काय काय उगवेल अन्‌ काय काय बहरेल सांगता येत नाही!
 

 
 
 
आता वायनाड गावाची काही वैशिष्ट्ये असतीलच! प्रत्येक गावाची असतात! त्यातली चांगली जी असतील, ती सांगावी; विपरीत असतील ती झाकून ठेवावीत, हेच अपेक्षित असते. पण नाही, काहींची खोडसाळवृत्ती त्यांना स्वस्थ बसू देत नाही! आपले ज्ञान नको तिथे पाजळतात! वायनाड गावात बेडकाची अशी प्रजाती सापडली आहे, जी वर्षातून केवळ चार दिवसच जमिनीबाहेर प्रकट होते, असे एका विश्लेषकाने म्हटल्याची बातमी प्रसिद्ध झाली आहे. आता, स्वत:ला या क्षेत्रातला तज्ज्ञ समजणार्‍या या तथाकथित अभ्यासकाने, याच वेळला हे सांगण्याची काही गरज! याला ‘मिसचिफ’च म्हणावे लागेल ना! हे वृत्त छापायची तरी काही आवश्यकता! अन्‌ फक्त वायनाडमध्येच आहे का, ही प्रजाती! मग त्याच गावाचा उल्लेख का? छे, छे! हे योग्य नाही! लोकशाहीत कशी मुद्यांवर चर्चा व्हायला पाहिजे! मसुद्यांवर मतिमान मंथन व्हायला पाहिजे! त्यातून नवनीत निघायला हवे, हलाहल नव्हे!
 
आता हे दुसरे वृत्त तेवढेच अनावश्यक! कॉंग्रेसच्या अध्यक्षांना खोटे बोलण्याची सवय लागली आहे, असा आरोप, मध्य प्रदेशच्या, काल-परवापर्यंत मुख्यमंत्रिपदी राहिलेल्या शिवराजिंसह चौहान यांनी नवी दिल्लीत, पत्रकारांना आवतन देऊन केला, अशी ही बातमी आहे. मूळ विधानांत कसलीही तोडफोड न करता, त्यावर झणझणीत तर्री न टाकता, ते जसेच्या तसे दिले असेल, म्हणजेच बातमी खर्रीखुर्री असेल, तर एवढ्या मोठ्या नेत्याने, असा काही गवगवा करायला नको होता! कोणी खरं बोलो, की खोटं; वाढवून सांगो, की ठासून सांगो त्यावर सांगोपांग विचार करू नये! या कानाने ऐकावे, त्या कानाने सोडून द्यावे! कानाडोळा करावा! सत्यमेव जयते, एवढेच लक्षात ठेवावे!
 
आणि हे तिसरे वृत्त : दिल्लीचे विद्यमान मुख्यमंत्री अरिंवद केजरीवाल यांच्याबाबतचे! 2015 मध्ये त्यांच्या ‘आप’ या पक्षाने कॉंग्रेस व भाजपा दोघांनाही आपटी दिली. त्या अनपेक्षित यशाने त्यांच्या कानात हवा शिरली! सारा देश, नव्हे, सारे विश्व जिंकल्याचा आविर्भावात ते वावरू लागले, आपला आवाका विसरले! पंतप्रधानांपेक्षा स्वत:ला मोठे आखू लागले! मात्र, लोकसभेची निवडणूक उंबरठ्यावर येताच घाबरले! कॉंग्रेसला विनवण्या करू लागले. एकट्याचा निभाव लागणार नसल्याचे लक्षात येताच कॉंग्रेसला भाव देऊ लागले! कॉंग्रेसने जेवढा खायचा तेवढा भाव खाल्ला! नंतर ‘आप’ला सांगितले, हम और आप मिल नहीं सकते; आप जा सकते! म्हणतात, की शीला काकूंनी केलेल्या कांकूने सारा घात झाला, चाकोंची मध्यस्थी वाया गेली! प्रत्यक्षात काय झाले माहीत नाही. ते जाणण्याची कोणाची इच्छाही नाही! आपच्या फजितीचे हे वृत्त देण्याची काही गरज होती का! कोणाकोणाच्या फजितीच्या बातम्या देणार तुम्ही! विरोधक सारेच, वेगवेगळ्या तर्‍हेने आपटी खाणार आहेत! दुसर्‍या बातम्या द्या ना!