राहुल गांधींचे अमेठीतून पलायन!
   दिनांक :02-Apr-2019
 
 
 
 
कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यावेळी दोन लोकसभा मतदारसंघांतून निवडणूक लढणार, ही गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली चर्चा अखेर खरी ठरली आहे. उत्तरप्रदेशातील अमेठीसोबतच राहुल गांधी केरळमधील वायनाड मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढणार असल्याची घोषणा कॉंग्रेस पक्षातर्फे करण्यात आली. अमेठी आणि रायबरेली हे गांधी घराण्याचे मतदारसंघ तसेच कॉंग्रेसचे गड म्हणून ओळखले जात होते. पण, या गडाचे चिरे 2014 च्या लोकसभा निवडणुकीपासून ढासळू लागले आहेत. 2009 पर्यंत या मतदारसंघात एकतर्फी निवडणूक होत होती. भाजपा उमेदवार रिंगणात राहात असला तरी चर्चेत राहात नव्हता. हे चित्र 2014 च्या निवडणुकीने बदलले.
 
 

 
 
 
2014 मध्ये राहुल गांधी या मतदारसंघातून विजयी झाले असले, तरी त्यांचे मताधिक्य मोठ्या प्रमाणात घसरले. साडेतीन लाखांवर मतांनी निवडून येणारे राहुल गांधी 2014 मध्ये एक लाखावर मतांनी विजयी झाले. हा चमत्कार घडवला भाजपाच्या नेत्या आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी. यावेळीही स्मृती इराणी भाजपाच्या उमेदवार म्हणून राहुल गांधी यांच्याविरुद्ध लोकसभा निवडणूक लढणार आहेत. त्यामुळे या मतदारसंघातील निवडणूक आता राहुल गांधी यांच्यासाठी सोपी राहिली नाही. अमेठी आणि रायबरेलीच्या जनतेला गांधी घराणे आणि कॉंग्रेस गृहीत धरत होती. आपल्याला मतदान करण्याशिवाय या मतदारसंघातील जनतेला दुसरा पर्याय नाही, अशी भावना गांधी घराण्यात निर्माण झाली होती. त्यामुळे श्रीमती इंदिरा गांधी, संजय गांधी, राजीव गांधी, श्रीमती सोनिया गांधी आणि आता राहुल गांधी यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले असले, तरी या मतदारसंघाचा अपेक्षित विकास होऊ शकला नाही.
 
मतदारसंघाचा विकास कसा करायचा, हे श्रीमती सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांनीच नाही, तर सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी, केंद्रीय भूपृष्ठ परिवहन आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडून शिकले पाहिजे. 2014 मध्ये गडकरी पहिल्यांदा नागपूर लोकसभा मतदारसंघातून विजयी झाले आणि त्यांच्या पुढाकारामुळे नागपुरात विकासाची गंगा धो धो वाहू लागली. अमेठी मतदारसंघात विजयाची खात्री नसल्यामुळेच राहुल गांधी यांना दुसर्‍या मतदारसंघात पळ काढावा लागला. दक्षिण भारतात कॉंग्रेसचा विस्तार करण्यासाठी राहुल गांधी यांनी वायनाड मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याचे कॉंग्रेसतर्फे सांगण्यात आले, ही शुद्ध फोकनाड आहे.
 
जेव्हा जेव्हा उत्तर भारतात विजयाची खात्री वाटली नाही, तेव्हा तेव्हा गांधी घराण्यातील लोकांनी दक्षिण भारतात आश्रय घेतला होता. 1980 मध्ये श्रीमती इंदिरा गांधी यांनी तेव्हाच्या आंध्रप्रदेशातील आणि आताच्या तेलंगणातील मेडक मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली होती. श्रीमती सोनिया गांधी यांनी 1999 मध्ये कर्नाटकच्या बेल्लारी मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. आता राहुल गांधी केरळच्या वायनाड मतदारसंघातून लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहेत. याचा अर्थ, जेव्हा जेव्हा उत्तर भारतातील लोकांवरचा विश्वास कमी होतो, तेव्हा तेव्हा गांधी घराणे दक्षिण भारतात धाव घेत असते.
 
वायनाड मतदारसंघाची राहुल गांधी यांच्यासाठी करण्यात आलेली निवड चुकीची म्हणावी लागेल. 2009 मध्ये अस्तित्वात आलेल्या वायनाड मतदारसंघातील आतापर्यंतच्या दोन्ही निवडणुका कॉंग्रेसने जिंकल्या असल्या, तरी 2009 मध्ये दीड लाखावर मतांनी निवडणूक  जिंकणाऱ्या कॉंग्रेसला 2014 मध्ये फक्त 20 हजार मतांनी निसटता विजय मिळाला. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून सतत मंदिराच्या वार्‍या करणार्‍या राहुल गांधींचे देऊळ अमेठीसोबत वायनाडमध्येही पाण्यात गेले तर आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. केरळमधील वायनाडची निवड करत कॉंग्रेसच्या निवडणूक व्यवस्थापकांनी आपले डोके ठिकाणावर नसल्याचेही दाखवून दिले आहे. केरळ हा डाव्यांचा गड आहे, वायनाडची निवड करत कॉंग्रेसने डाव्यांच्या शेपटीवर विनाकारण पाय दिला. कारण या मतदारसंघात राहुल गांधींची लढत डाव्यांच्या उमेदवारांसोबत होणार आहे. राहुल गांधी यांना वायनाडमध्ये पराभूत करण्याचा चंग डाव्या पक्षाच्या नेत्यांनी बांधला आहे. म्हणजे भाजपाचे काम या मतदारसंघात डाव्या पक्षांच्या नेत्यांनी सोपे करून टाकले.
 
राहुल गांधी यांना दुसर्‍या मतदारसंघातून निवडणूक लढवायचीच होती, तर त्यांनी एखाद्या कॉंग्रेसशासित राज्याची निवड करायला हवी होती. जेणेकरून त्यांना त्या मतदारसंघात भाजपाविरोधी पक्षांचा पािंठबा मिळाला असता. मात्र, वायनाडमध्ये तर कॉंग्रेसने भाजपासोबत अन्य विरोधी पक्षांनाही आपल्या अंगावर घेतले, याला राजकीय शहाणपण म्हणत नाही. कॉंग्रेसमध्ये केरळची लॉबी प्रभावी होत असल्यामुळे त्यांनी राहुल गांधींना या मतदारसंघातून निवडणूक लढवायला तयार केले. या आधी श्रीमती सोनिया गांधींचे सर्व खाजगी सचिव केरळचे होते, तर आता कॉंग्रेसचे संघटन महामंत्री असलेले के. सी. वेणुगोपाल केरळचे आहेत. राहुल गांधी यांच्यासाठी वायनाड मतदारसंघाची निवड करण्यामागची पार्श्वभूमी ही आहे.
 
नरेंद्र मोदी यांनी 2014 मध्ये गुजरातसोबत उत्तरप्रदेशातील वाराणसी मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली होती, याचा दाखला कॉंग्रेस नेते देत आहेत. मात्र, मोदी यांचे दोन मतदारसंघांतून लोकसभा निवडणूक लढवण्याचे कारण आणि राहुल गांधी यांचे कारण यात जमीन-आस्मानाचा फरक आहे. गुजरातच्या वडोदरा मतदारसंघात पराभवाची भीती असल्यामुळे नाही, तर पूर्ण उत्तरप्रदेशात वातावरणनिर्मिती करण्यासाठी नरेंद्र मोदी यांनी वाराणसी मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला होता. मोदींच्या या निर्णयाचा संपूर्ण उत्तरप्रदेशात भाजपाला फायदा झाल्याचे नंतर दिसून आले. गुजरातमधील 26 पैकी 26, तर उत्तरप्रदेशातील 80 पैकी 71 जागा भाजपाने जिंकल्या, ही ऐतिहासिक कामगिरी म्हणावी लागेल. याच्या उलट,
 
अमेठीत विजयाची शक्यता नसल्यामुळे राहुल गांधी यांना वायनाड मतदारसंघात पळ काढावा लागला.
केरळमधील वायनाड हा कर्नाटक आणि तामिळनाडूला लागून असलेला मतदारसंघ आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा मुस्लिम आणि ख्रिश्चनबहुल मतदारसंघ आहे. या मतदारसंघात 56 टक्के मुस्लिम आणि 10 टक्के ख्रिश्चन मतदार आहेत. एकीकडे आपणही हिंदुत्ववादी असल्याचे वेगवेगळ्या मंदिरात जाऊन सिद्ध करायचे, जानवेधारी हिंदू असल्याचे भासवायचे आणि दुसरीकडे आपल्यासाठी दुसरा मतदारसंघ निवडण्याची वेळ आली तर मुस्लिमबहुल मतदारसंघाची निवड करायची, म्हणजे आपले खायचे आणि दाखवायचे दात वेगळे असल्याचे कॉंग्रेसने दाखवून दिले आहे. मुळात वायनाडची निवड करत राहुल गांधी यांनी अमेठीच्या जनतेवर एकप्रकारे अविश्वासच दाखवला आहे. अमेठी आणि रायबरेलीच्या जनतेने गांधी घराण्यावर भरभरून प्रेम केले होते. 2014 मध्ये संपूर्ण उत्तरप्रदेशने कॉंग्रेसवर अविश्वास दाखवला असताना या दोन्ही मतदारसंघांतील लोकांनी कॉंग्रेसची लाज राखली होती. पण, त्याची बूज राहुल-सोनिया यांना राखता आली नाही, हेच खरे!