भंडारा जिल्ह्यात परप्रांतीय मेंढपाळांचे काफिले दाखल
   दिनांक :02-Apr-2019
 
 
 
भंडारा: राजस्थानमध्ये उंट, मेंढ्या व गाईंना मूबलक चारा मिळत नाही. त्यासाठी राजस्थानातील अनेक लोक आपले उंट, मेंढ्या घेऊन महाराष्ट्रातील कानाकोपर्‍यात दाखल होतात. ओसाड शेतशिवारात व जंगल भागात मेंढ्याचे व उंटाचे कळप जिल्ह्याच्या काही भागात भटकंती करताना दिसत आहेत.
वाळवंटातील जहाज म्हणून प्रसिद्ध असलेल्या उंटाची सोबत घेऊन परराज्यातून आलेल्या या लोकांना रानावनात भटकंती करावी लागत असते. राजस्थानमधून आपलेल्या या लोकांचा व्यवसाय उंट, मेंढ्या व गायी चारणे हाच असल्याने ते आपल्या व्यवसायाप्रती एकरूप झाले आहेत. एवढेच नव्हे तर हे मेंढपाळ आपली चिमुकली मुले व पत्नीलाही घेऊन गावालागतच्या शेतशिवारात जंगल, दर्‍याखोर्‍यात मेंढ्या व उंटासोबत आपला संसार थाटत असल्याचे चित्र आहे.
 

 
 
 
लहान लहान मुलेसुद्धा आई-वडिलांसोबत शेळ्या, मेंढ्या व उंटाच्या राखणदारीचे काम करीत असतात अशा लोकांचे जीवनसुद्धा भटकंती करणारेच असते. यामधील अनेक लोक कष्टाळू असतात तर काही मुजोरसुद्धा असतात. त्यामुळे काही मेंढ्याना गावालगतच्या शेतातील पिकात आपल्या शेळ्या मेंढ्या हाकलून लावतात. त्यामुळे शेतकर्‍याच्या पिकाचे मोठे नुकसान होते. कधी कधी शेतकर्‍यांसोबत वादाचे स्वरूप मोठ्या भांडणात होत असते. आता वनविभागाने जंगलात जनावरे चराईसाठी मनाई हुकुम काढल्याने व वनकायद्याच्या दंडुकशाहीमुळे जंगलात शेळ्या, मेंढ्या नेण्यासाठी राजस्थानी टाळत आहे.
राजस्थानी नागरिकांचा मुख्य व्यवसाय म्हणजे जनावरे पाळणे यामध्ये उंट, शेळ्या, मेंढ्या, गायी, कोंबळ्या आदींच्या दूध व मासावर उपजिविका करणारे हे लोक आहेत. राजस्थानमधून हे लोक आपल्या मालकांकडून गायी, उंट, शेळ्या, मेंढ्या चारण्यासाठी येत असतात. त्याच्या मोबदल्यात त्यांना तीन ते चार हजार रुपये महिनासुद्धा मिळत असतो. हे लोक मोठे हिम्मतवान व कष्टाळू असतात. रानातील हिंस्र प्राणी, पक्षी, साप यापासून त्यांना स्वत:चे रक्षण कसे करावे याचे चांगल्याप्रकारे ज्ञान असते.
 
वन्यप्राणी व पक्षाचा आवाजसुद्धा ते ओळखतात. जंगलातील पहाडावर व शेतशिवारातील उंच भागावर ते लोक आपले तंबू टाकून आजूबाजूला उंट, शेळ्या, मेंढ्याचे कळप बसवित असतात. त्या रात्रीला त्याचे वास्तव त्याच ठिकाणी असते. 8 ते 10 दिवसांपर्यंत ते एकाच ठिकाणी वास्तव करीत असतात. शेतकर्‍यांंच्या शेतात बसविण्याकरिता ते शेतकर्‍यांकडून त्यांचा मोबदला पैसे किंवा अन्न घेत असतात. काही शेतकर्‍यांनी त्यांनी आपल्या शेतात मेंढपाळाचे बस्थान मांडले आहे. ज्यामुळे ग्रामीण भागात आतापासून रानावनात शेतशिवारात उंट, शेळ्या, मेंढ्यांचे काफिले दिसत आहेत.