अमेठीतील पराभवाच्या धास्तीनेराहुल गांधी वायनाडला गेले का?
   दिनांक :02-Apr-2019
बबन वाळके  
 
 
कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी यावेळी आपल्या परंपरागत अमेठी मतदारसंघासोबतच केरळमधील वायनाड येथून लोकसभा निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे. यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले असून, तर्कवितर्कांना अक्षरश: उधाण आले आहे. अनेक दिवसांपासून ही चर्चा सुरू होती की, राहुल गांधी केरळ, कर्नाटक िंकवा तामिळनाडूतील एका जागेवरून निवडणूक लढणार आहेत. त्यात केरळच्या वायनाडचे नाव आघाडीवर होते. त्या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे.
राहुल गांधी यांनी असा निर्णय का घेतला असावा? अमेठीत आपला पराभव होणार, या धास्तीने त्यांनी वायनाडचा मार्ग धरला का? असे प्रश्न राजकीय वर्तुळात विचारले जाऊ लागले आहेत.
 
 
 
 
अमेठी आणि रायबरेलीवर कॉंग्रेस पक्षात अनेक दिवसांपासून मंथन सुरू होते. त्यासोबतच प्रियांकाला उत्तरप्रदेशातून लढवायचे काय, यावरही विचार सुरू होता. प्रियांकाबाबत निर्णय अजून झालेला नाही, पण कॉंग्रेस श्रेष्ठींनी राहुलला अमेठीबाबत धोक्याचा संकेत दिल्याचे बोलले जात आहे. त्याची कारणमीमांसाही करण्यात आली आली. बैठकीत अमेठीच्या विद्यमान स्थितीचा आढावा घेतला असता, गेल्या विधानसभा निवडणुकीत येथे भाजपाचे चार आमदार निवडून आले आहेत. एक जागा समाजवादी पक्षाकडे आहे. अखिलेशचा कल राहुलकडे आहे. पण, मायावतींचा जेव्हा प्रश्न आला तेव्हा मायावतींबाबत शंका उपस्थित केली गेली. मायावती या धूर्त राजकारणी आहेत. कॉंग्रेसने प्रियांकाला मैदानात आणल्यामुळे मायावती बिथरल्या आहेत. त्यामुळे त्या ऐनवेळी कोणता निर्णय घेतील, याची शाश्वती कॉंग्रेसजनांना नाही. ज्यावेळी सपा-बसपा युती झाली, तेव्हा मायावती आणि अखिलेश यांनी पहिल्याच बैठकीत जाहीर केले होते की, अमेठी आणि रायबरेली या दोन जागांवर आम्ही उमेदवार देणार नाही. पण, आता प्रियांकाला कॉंग्र्रेसने पूर्वांचलाची जबाबदारी दिल्यामुळे मायावती चिडल्या आहेत. आपल्या सपा-बसपा युतीला खिडार पाडण्यासाठीच कॉंग्रेसने ही खेळी खेळल्याचा समज मायावतीचा झाला आहे. तीच बाब अखिलेशची. अमेठीत समाजवादी पक्षही चिडलेला आहे. एक आमदार सपाचा आहे. पण, त्या पक्षाचा आमदार आणि स्थानिक नेतृत्व आता भाजपाच्या विरोधात गेले आहे. तेथे मुस्लिम समुदायामध्येही असंतोष असल्याची बाब आता लपून राहिलेली नाही. दुसरीकडे स्मृती इराणी या गतवेळच्या निवडणुकीत अयशस्वी झाल्या असल्या तरी गतवेळीच त्यांनी राहुल गांधींच्या तोंेडाला फेस आणला होता.
 
2009 मध्ये राहुल गांधी यांना साडेतील लाखावर अमेठीत लीड मिळाली होती. 2014 मध्ये हाच आकडा एक लाख सात हजारावर आला. पण, नंतर 2017 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत चार जागी भाजपा निवडून आली. एका जागी सपा. कॉंग्रेसला एकही विधानसभा मिळाली नाही. त्यामुळे राहुलला 2014 मध्ये मिळालेली लीड चालली गेली. उलट भाजपाची वाढली. त्याची दखल कॉंग्रेस श्रेष्ठींनी घेतलेली दिसते.
अमेठीचे समीकरण
अमेठी लोकसभा मतदारसंघात सालोन, तिलोई, जगदीशपूर, अमेठी आणि गौरीगंज या पाच विधानसभा येतात. 2017 ची विधानसभा निवडणूक झाली, तेव्हा गौरीगंज (सपा) वगळता अन्य चारही जागी विजयी झालेल्या भाजपा आमदारांनी, कॉंग्रेसवर मात केल्यानंतर मताधिक्य पाहिले तर ती मते होतात 1 लाख 37 हजार 873. याचा अर्थ राहुल गांधी यांना अमेठी लोकसभेत जी एक लाख 7 हजारांची लीड मिळाली होती, ती भाजपाच्या चार विधानसभांची लीड पाहिली तर ती 30 हजार अधिक आहे. म्हणजे, विधानसभा निवडणुकीच्या वेळीच राहुल गांधी हे तसेच पराभूत झाल्याचे दिसत आहे.
दुसरीकडे स्मृती इराणी या 2014 मध्ये पराभूत झाल्या असल्या तरी, त्यांनी मतदारसंघातील संपर्क कमी केलेला नाही. उलट तो वाढविला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेठीत झालेल्या सभेला जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला होता. ही बाबही कॉंग्रेसच्या डोळ्यातून सुटली नाही. शिवाय अमित शाह यांनी अमेठीची जागा ही प्रतिष्ठेची केली असून कसेही करून यावेळी राहुल गांधींना पराभूत करायचेच या इरेला ते पेटले आहेत. अमेठीच्या जनतेचे लक्ष विकासाकडे वेधण्यात भाजपा यशस्वी झाली आहे. या सगळ्या वस्तुस्थितीवर कॉंग्रेसच्या मंथन बैठकीत विचार झाला आणि नंतर केरळमधील वायनाड लोकसभा मतदारसंघातूनही राहुलला लढविण्याचा निर्णय घ्यावा लागला. ही झाली अमेठीची कथा.
 
आता थोडा वायनाड मतदारसंघाचा विचार करू. येथे राहुल गांधी लढणार अशी प्रतिक्रिया येताच पहिली प्रतिक्रिया डाव्यांकडून आली आहे आणि ती अशी की, आम्ही राहुलला पराभूत करणार! केरळमध्ये दोनच आघाड्यांची नावे समोर येतात. याच आघाड्यांनी आलटूनपालटून येथे सत्ता स्थापन केली आहे. यात युडीएफ-युनायटेड डेमोक्रेेटिक फ्रंट ही कॉंग्रेसप्रणीत आघाडी आहे. या आघाडीत कॉंग्रेस, मुस्लिम लीग, केरळ कॉंग्रेस (एम) केरळ कॉंग्रेस (जाकोब), रिव्होल्युशनरी सोशालिस्ट पार्टी आणि फॉरवर्ड ब्लॉक हे अन्य पक्ष आहेत. दुसरी आघाडी आहे, एलडीएफ. या आघाडीत 14 पक्ष आहेत. त्यात प्रमुख म्हणजे माकपा, भाकपा, जनता दल सेक्युलर, राष्ट्रवादी कॉंग्रेस. बाकी सगळे अगदी छोटे पक्ष आहेत. या आघाडीचे सध्या केरळमध्ये सरकार आहे. या आघाडीने 2016 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत एकूण 140 जागांपैकी 99 ठिकाणी विजय मिळविला होता. तर युडीएफने 47 ठिकाणी विजय मिळविला होता. राहुल गांधी हे याच युडीएफ आघाडीचे उमेदवार असणार आहेत.
राहुल वायनाडमधून का लढणार, याचे कारण देताना, ए. के. अँटनी आणि प्रवक्ते रणजीत सुरजेवाला म्हणाले, राहुल गांधींना श्रेष्ठींनी सांगितले की, दक्षिणेतील कार्यकर्त्यांची प्रबळ इच्छा आहे की, तुम्ही दक्षिणेतून लढावे. त्यांच्या इच्छेचा मान न राखणे हे बरोबर होणार नाही. कॉंग्रेस दक्षिणेतील संस्कृती, परंपरा आणि भाषांचा सन्मान करते, तसेच उत्तर-दक्षिणेतील दरी दूर करणे हा संदेश देण्यासाठीच राहुल गांधी यांनी वायनाडमधून निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला आहे. तशी ही कल्पना पहिल्यांदा कर्नाटकचे कॉंग्रेस नेते सिद्धरामय्या यांनी मांडली होती. पण, कारण, वेगळेच आहे. वायनाडमध्ये मोठ्या संख्येत मुस्लिम मतदार आहेत आणि त्यांचा कल मुस्लिम लीगकडे आहे. वायनाडमध्ये 10 टक्के ख्रिश्चन समुदाय आहे. हेच गणित धरून राहुल गांधी यांना धर्माच्या आधारावर निवडणूक लढविण्यास श्रेष्ठींनी सांगितले असावे, असे दिसते.
पण, वायनाडमधून राहुल गांधी विजयी होतील का? हाही एक प्रश्नच आहे. कारण, राहुल गांधींच्या उमेदवारीवर केरळमधील कम्युनिस्ट जाम भडकले आहेत. राहुल गांधी यांनी केरळमध्ये येणे म्हणजे त्यांनी एलडीएफला आव्हान दिले आहे. आम्ही त्यांचा पराभव होण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करू, अशी प्रतिक्रिया माकपाचे पॉलिट ब्युरो सदस्य प्रकाश कारत यांनी दिली आहे. आम्ही नरेंद्र मोदी यांना हरविण्यासाठी जी आघाडी केली होती, त्याला राहुल गांधींनी छेद दिला आहे. आम्ही आधीच वायनाडमधून आमच्या आघाडीतर्फे भाकपाचे पी. पी. सुनीत यांना उमेदवारी दिली आहे. राहुल गांधी यांनी भाजपासोबत लढाई करण्याचे सोडून त्यांनी एलडीएफ विरोधात लढण्याचा निर्णय घेणे म्हणजे भाजपाला पराभूत करण्याच्या प्रयत्नांना विफल करण्याचा प्रयत्न आहे. भाजपाविरोधात लढणारी एलडीएफ ही मोठी शक्ती आहे, हेही राहुल विसरले. याचा अर्थ राहुल गांधी यांना भाजपासोबत लढायचे नसून एलडीएफसोबत संघर्ष करायचा आहे. आम्ही राहुल गांधी यांना पराभूत करण्यासाठी पूर्ण ताकत लावू, असे प्रकाश कारत म्हणाले. माकपाचे महासचिव सीताराम येचुरी यांनीही राहुल गांधी यांच्यावर टीका करताना सांगितले की, त्यांनी डाव्या आघाडीसोबत लढण्याचा निर्णय कशासाठी घेतला, याचा खुलासा राहुल गांधी यांनी केला पाहिजे.
 
वायनाड जागा कॉंग्रेसला भरवशाची का वाटते? तर 2009 आणि 2014 च्या लोकसभा निवडणुकीत येथे कॉंग्रेसने विजय मिळविला होता व दोन्ही वेळा भाकपाच्या उमेदवाराचा पराभव केला होता. पण, कॉंग्रेसने हे विसरू नये की, 2014 च्या निवडणुकीत येथे कॉंग्रेसला केवळ 21,870 एवढ्याच मतांचे आधिक्य मिळाले होते. ही लीड फारच कमी आहे. तरीही कॉंग्रेसने राहुल गांधींवर जुगार खेळण्याचा निर्णय घेतला आहे. 2014 मध्ये येथे भाजपाच्या उमेदवाराला 80752 मते मिळाली होती.
एकूणच अमेठीसह वायनाड येथूनही राहुल गांधी यांनी निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतल्यामुळे सध्या वाहिन्यांवर हा एकच प्रश्न चर्चिला जात आहे. राहुल वायनाडला का गेले असावेत? काही निरीक्षकांना वाटते की, राहुल गांधी यांनी वायनाडमधून लढण्याचा निर्णय घेणे ही मोठी चूक आहे. त्यामुळे अमेठीच्या जनतेत चुकीचा संदेश गेला आहे. प्रामुख्याने कॉंग्रेस कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचे आणि निराशेचे वातावरण निर्माण होऊ शकते. तिकडे विरोधक वायनाडच्या निर्णयावरून राहुल गांधींवर टीका करीत सुटले आहेत. ही संधी विनाकारण राहुल गांधी यांनी विरोधकांना दिली आहे. अमेठीत राहुल जिंकू शकत नाही, म्हणूनच त्यांनी वायनाडकडे धाव घेतली असा आरोप करण्यास राहुल गांधी यांनी जागा करून दिली आहे. कॉंग्रेस जे नरेंद्र मोदी यांचे उदाहरण देतात, ते येथे गैरलागू आहे. 2014 मध्ये नरेंद्र मोदी यांनी वाराणसी आणि वडोदरा या दोन्ही ठिकाणांहून निवडणूक लढविली होती व ते दोन्ही ठिकाणी विजयी झाले होते. त्यावेळी मोदी लाट होती आणि ते पाच मतदारसंघातून उभे झाले असते तरी निवडून आले असते, असे कॉंग्रेसविरोधी वातावरण होते. यावेळी तशी स्थिती मुळीच नाही. राहुल गांधी हे प्रभावहीन घोषणा करीत आहेत. वायनाड कॉंग्रेसला सोपे वाटले असेल, पण तेवढे ते सोपे नाही. तेथे कम्युनिस्ट आघाडी आणखी जोराने उसळी मारेल आणि कॉंग्रेसविरोधात प्रचार करेल. त्याचा परिणाम देशाच्या वातावरणावर होईल. कथित महागठबंधनच्या आधीच चिंध्या झालेल्या असताना, केवळ कॉंग्रेस स्वबळावर जिंकण्याची भाषा करीत असेल, तर तेवढी ताकद कॉंग्रेसमध्ये नाही, ही वस्तुस्थिती आहे. केरळमध्ये एलडीएफला आव्हान दिल्यामुळे देशातील अन्य मतदारसंघातही वेगळा संदेश जाईल असे मत अनेक राजकीय पंडितांनी व्यक्त केले आहे.