रसाईचे दिवस...
   दिनांक :20-Apr-2019
 
 
 

 
 
 
 
आता प्रत्येक गोष्टीचा एक सिझन असतो अन्‌ मग त्याच्या बातम्या होतात. सध्या निवडणुकीचा मोसम असल्याने अन्‌ त्यातही आम इलेक्शन असल्याने लोक आंबलेत राजकीय बातम्यांनी; त्यात मग अनेक महत्त्वाच्या विषयाच्या बातम्यांकडे दुर्लक्ष होत आहे. पहिल्या दोन टप्प्यांचे मतदान आटोपले असल्याने आणि आता केवळ वाटच बघायची असल्याने अनेक उमेदवारांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. काही टप्पेच खात असल्याने अन्‌ त्यांचा मतदानाचा टप्पा यायचा असल्याने काय होणार, या चिंतेने  त्यांच्याही तोंडचे पाणी पळाले आहे. प्रत्येक टप्प्यागणिक काही नवे होते आहे. आता बघाना मुलायम आणि मायावती एकत्र आलेत अन्‌ एकमेकांचे गुणगाण करू लागले आहेत. संधी बघून काहींच्या तोंडाला पाणी सुटले आहे. अशात पाणी टंचाईच्या बातम्यांकडे मात्र दुर्लक्ष होत आहे. आम इलेक्शन असल्याने बातम्यांचा आमवात होत असताना आंब्याचा सिझन आहे अन्‌ यंदा अजूनही रसाईला सुरुवात झालेली नाही, याकडेही दुर्लक्ष होत आहे. आता निकाल लागल्यावर जो जिंकून आला त्याला लोक रसाईला बोलावतील.
तर सांगायचे आहे रसाईबद्दल, आंब्याबद्दल अन्‌ सुरुवात बालभारतीपासून झाली. आता बालभारती यासाठी आठवली की, त्या काळात प्राथमिक वर्गाला एक कविता होती, सुगी नावाची.
दिवस सुगीचे सुरू जाहले,
ओला चारा बैल माजले,
ढुम पट, पट ढुमऽऽ,
लेझीम चाले जोरातऽऽ...लेझीम ढुम पट ढुम कसे चालते ते आम्हाला आजवर कळलेले नाही, मात्र आता आंब्याच्या सीझनवरून एक कविता मात्र याच कवितेवर सुचली आहे -
दिवस रसाईचे सुरू जाहले,
सुट्या लागुनी पाहुणे आले,
लंगडा, पायरी, हापूस, गावरान...
रसाई चाले जोरांत
आता हे रसाईचे दिवस आहेत. बेगमपल्लीपासून सुरुवात करत करत माणसं आपली औकात ताणतात आणि मग पायरी पायरीने वर चढत केसर, लंगडा असे करत हापूसपर्यंत एका सीझनमध्ये तर तो नक्कीच पोहोचतो. आता गावरान काही हाताला लागत नाही. जे जेव्हा असतं तेव्हा त्याची काही किंमत नसते, मात्र ते दुर्मिळ झाले की मग मात्र तेच हवे असते. आता बघाना प्लॅटिनम नावाचा धातू आहे. तो सगळ्यात महाग आहे... आता त्यात महाग असण्यासारखे काय असते? केवळ तो दुर्मिळ आहे इतकेच काय ते; पण त्यासाठी तो मौल्यवान झाला आहे. तसेच हापूसचे असते का? एखादी गोष्ट ब्रँड झाली की मग त्यावर कुणी शंका घेतच नाही. ते उत्तमच असते. मागे एका सिनेमाचे गाणे संगीतकाराला दाखवले, तो नाक मुरडणार तर निर्माता म्हणाला, ‘‘मराठीत पहिल्यांदाच गुलजारांनी लिहिले आहे हे गाणे... मग एकदमच संगीतकार म्हणाला, ‘‘क्या बात है! काय गाणे आहे...’’
पूर्वी गावरान उपलब्ध होते तेव्हा लोकांना इम्पोर्टेडचा जमाना हवा होता. आता सार्‍यांना सारेच कसे गावरान हवे असते. त्यामुळे गावरान आंबे सगळ्यांनाच हवे असतात. पूर्वीच्या काळी गावरान आंब्याच्या जातीही विकसित केल्या जायच्या. त्यातला केसर, संत्रा, खोबर्‍या, साखर्‍या... अशा काही जाती आठवतात. शेतकरी त्याची कलमं करायचे. नवा आंबा विकसित करायचे. त्याचा आकार, कोयीचा आकार, मगज... असे सारेच पाहिले जायचे. तेव्हा शेतकरी बियाणं आणि इतर बाबींच्याही वाणांवर संशोधन करायचे. काही प्रयोग करायचे. आता सार्‍याच क्षेत्रांत आणि सगळ्यांनाच रेडिमेडची सवय लावण्यात आली आहे. अर्थात त्यामागे बाजार आहे. बाजारीकरणाने एकतर असुरक्षितता निर्माण केली आणि ज्या गोष्टी आपण सहज निर्माण करत होतो त्या रेडिमेड देऊ केल्या. टू मिनिट आणि तय्यार! त्यामुळे आमच्यातली काही कौशल्यं संपली, संशोधक वृत्तीदेखील संपली.
 
मॅगी सहज मिळते. त्यामुळे शेवया करण्याचे कौशल्य आता लोप पावत आहे. पापडं तुम्ही म्हणाल त्या प्रकारची मिळतात. त्यामुळे घरोघरी पापडं तयार केली जात नाहीत अन्‌ मग पापडं तयार करण्याचे कौशल्य गमावले जात आहे. तसेच ज्वारीची, तांदळाची, तुरीची, गव्हाची... अशी कितीतरी वाणं आम्ही गमावून बसलो आहोत. त्यांना त्या वेळी गावरान म्हणून हिणवले गेले. त्या काळात आमच्या पूर्व शेतकर्‍यांनी अत्यंत संशोधक वृत्तीने अन्‌ जिद्द, चिकाटीने ती वाणं विकसित केली होती. ती आमच्या वातावरणाला, जमिनीला पूरक अशी होती. बीज कंपन्या आल्या. त्यांनी आपली वाणं विकसित केली. सार्‍या देशांत एकच बियाणं असावं, यासाठी हा उपद्व्याप. बारा किलोमीटरवर भाषा बदलते तसेच थोडेफार वातावरणही बदलते. जमिनीचा पोतही बदलत असतो. त्यामुळे स्थानिक बियाणे हवे. तसे आता होत नाही. तेच नेमके आंब्याच्या बाबत झाले. हापूस हा उच्च जातीचा आंबा म्हणून त्याला मान्यता मिळाली, पण मराठवाड्यात असलेल्या गावरान आंब्याच्या कितीतरी जाती विकसितच झाल्या नाहीत. आमरायाही संपल्या. पूर्वीच्या काळी सासरी गेलेल्या लेकीला अन्‌ सोबत मग तिच्या नवर्‍यालाही रसाईला उन्हाळ्यांत घरी आणले जायचे. साडी-चोळी केली जायची. घरच्या शेतवाडी, मालमत्तेत तिचा अधिकार असतो म्हणून हे एक प्रकारचं वर्षासनच असायचं. त्यामुळे शेती कसणारा तिचा मालक राहायचा अन्‌ केवळ वडिलोपार्जित हक्क म्हणून बहिणींना त्याचा तुकडा तोडून देण्याची गरज पडायची नाही.
 
रसाईला बहीण यायची, जावई यायचा अन्‌ साडीचोळीदेखील केली जायची. कधी कधी मग नवा व्याही अन्‌ विहीणही यायची. मुलीचा बाप अन्‌ मुलाची आई म्हणजे व्याही-विहीण यांच्या नात्याला एक हळुवार नाजूकपणाची डूब असायची. अर्थात मिश्कीलपणे ती त्याची मस्करी केली जायची. विनोदी प्रश्न विचारायचे. उत्तर असायचं ‘‘विहीण आलती ना रसाईले... शेतावर घेऊन गेलता ना शंकर तिले...’’ म्हणजे आंब्याच्या रसासोबतच त्या रसासारखेच आंबट-गोड असे मधुर नाते अन्‌ त्यांचा एक पटही उलगडायचा. नवे लग्न झालेली लेक नव्या जोडीदाराला तिच्या हक्काच्या आंब्याच्या झाडाखाली नेऊन सांगायची, ‘‘या आंब्याची चव इतकी गोड हाय ना तुमी कल्पनाही नाही करू सकत!’’ तेव्हा तो म्हणायचा, ‘‘ह्या आंबा खावून तू इतली गोड झाली, तेच्यावरून आलं ना ध्यानात!’’ तेव्हा ती झक्क लाजायची... रसाईच्या दिवसांना अशी गोड नात्यांची किनार असायची. आता त्यावर हिस्से वाटण्याच्या कोर्ट-कज्जांची काजळी धरली आहे. कोर्टात पन्नास पन्नास वर्षे केसेस सुरू असतात... आमच्या गावच्या पाटलांकडे असलेल्या या प्रकारच्या भांडणाच्या केसचा निकाल या रसाईच्या दिवसांत लागला. पंचावन्न वर्षे केस सुरू होती. आता आमराई नाही अन्‌ ज्यांनी केस टाकली ते चुलत घराणेही नाही... कुणी कुणाला अन्‌ कसले काम्पेन्सेशन द्यायचे? अकारणच्या भाऊबंदकीत तोंड आंबट झाले अनेक पिढ्यांचे. आता गावच्या पाटलांनाही शहरातून आंबे विकत आणावे लागतात अन्‌ रसाई करावी लागते. कधीकाळी माज केल्याने घरी पडणारा आंब्याचा माच संपला आहे... आत ओला चाराही नाही अन्‌ माजणारे बैलही नाहीत!