चिमूरमध्ये अवैध धंद्यांचा सुळसुळाट
   दिनांक :20-Apr-2019
 
 
 
चिमूर: स्थानिक पोलिस ठाण्याच्या टाऊनमध्ये खुलेआम दारूविक्री सुरू झाली असून, चौक व गल्लीच्या आश्रयाने दारू विकल्या जात असून, पोलिस विभाग मात्र सुस्त असून, दुर्लक्ष करीत असल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. पोलिस प्रशासनाने दखल घेऊन दारूविक्रेत्यांच्या मुसक्या बांधून कारवाई करण्याची मागणी होत आहे.
चिमूरच्या चावडी चौक, वाल्मिक चौक, केसलापूर, कवडशी, नेहरू वॉर्ड, गुरुदेव वॉर्ड, नेताजी वॉर्डमध्ये देशी मोहफुलाची दारू विकल्या जात असून, विदेशी दारूसुद्धा मिळत आहे. दारूबंदीचा कायदा धाब्यावर बसवून बिनधास्त दारू विक्री केली जात असून, अधिक दराने दारूविक्री होत आहे. देशी १५० रुपये, तर विदेशी ३०० रुपयांमध्ये विक्री होत आहे. मोहफुले दारूसुद्धा बेभावाने विक्री केली जात आहे.
 
 
 
केसलापूर परिसराला तर मद्यपी तांडापूर म्हणून संबोधतात तर चावडी चौकमधील काही हाटेल जेव्हा देशी दारू राहते तेव्हाच सुरू असतात तर वाल्मिक चौकात देशी मोहफुलाची दारू विकल्या जात आहे. हे सर्व राजरोसपणे सुरू असताना हे कुणाच्याही लक्षात का येत नाही, अशी चर्चा नागरिकात आहे. तसेच सट्टापट्टीने डोके वर काढले असून, हा मटका व्यवसाय राजरोसपणे सुरळीत सुरू असून, छोटा मटका किंगला राजाश्रय प्राप्त असल्याने तो जुन्या प्रसिद्ध मटका किंगला धंदा देत असल्याचे चर्चिले जात असून, मटका व्यवसायसुद्धा खुलेआम सुरू आहे.
एवढेच नाहीतर अवैध वाहतूक जोमात असून, बसस्थानकापासून २०० मीटरच्या आत ही खाजगी वाहने उभी राहतात. राजरोसपणे खाजगी अवैध वाहतूक सुरू आहे. बसस्थानकाला लागून नागपूर तर समोरून चंद्रपूरसाठी जाणार्‍या खाजगी ट्रॅव्हल्स उभ्या राहतात. वाहतूक नियम पायदळी तुडवून ही अवैध प्रवासी वाहतूक सुरू आहे. मात्र, चिमूर पोलिसांचे याकडे दुर्लक्ष होत आहे.