चोरी चोरी...
   दिनांक :20-Apr-2019
फायरब्रँड भाजपानेत्या उमा भारती खरोखरच आग आहेत. राजकारणात येण्याआधी त्या आणि ऋतंभरा या दोन साध्वी देशभर गाजत होत्या. त्यांची भाषणे ऐकायला लोक गर्दी करीत असत. पुढे उमा भारती भाजपात आल्या, मुख्यमंत्री झाल्या, केन्द्रीय मंत्री झाल्या. यावेळी त्यांनी तब्येतीच्या कारणावरून स्वत:हून निवडणुकीतून माघार घेतली. (पाऊणशे पार काही ज्येष्ठांनीही असे केले असते तर किती बरे झाले असते!) पण म्हणून त्या राजकारणातून बाहेर पडल्या असे नाही.
 

 
 
पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांना वारंवार चौकीदार चोर है... म्हणत हिणवणारे राहुल गांधी यांचा समाचार घेताना त्यांनी गांधी कुटुंंबालाच लक्ष्य केले. कॉंग्रेसची राजकन्या प्रियांका वाड्रा ही तर चोराची बायको आहे, असा थेट हल्ला उमा भारतींनी केला. रॉबर्ट वाड्रा करचोरीच्या आरोपात जमानतीवर आहेत. त्यामुळे प्रियांकाकडे लोक चोराची पत्नी याच नजरेने पाहतात, असा दावा त्यांनी केला. तसे पाहिले तर, गांधी कुटुंबच चोर आणि भ्रष्टाचारी आहे, हे गेल्या पन्नास वर्षात अनेकदा दिसून आले आहे. इंदिरा गांधींपासून सुरू झालेला हा सिलसिला अजूनही सुरूच आहे आणि आई, मुलगा, जावई हे सारे जामिनावर बाहेर आहेत. तरी नाक उंच करून इतरांना चोर ठरवत फिरत आहेत. याला म्हणतात शहाजोगपणा!
 
स्टेट बँकेतून परस्पर काढण्यात आलेल्या लाखो रुपयांचे इंदिराजींच्या काळातील प्रकरण आठवा. त्यांच्या आवाजातील फोन बँकेत जातो काय, त्यावर विश्वास ठेवून बँक पैसे देते काय, तो माणूस नंतर अपघातात मरतो काय. सारेच गूढ आणि संशयास्पद. हे प्रकरण दडपले गेले अशीच भावना त्याकाळी होती आणि तो गुंता शेवटपर्यंत सुटलाच नाही. लोकांच्या पैशाची ही चोरीच होती की नाही? राजीव गांधींच्या काळात बोफोर्स कांड घडले. संरक्षणमंत्री राहिलेले त्यांचेच जुने सहकारी व्ही. पी. िंसग यांनी हे प्रकरण बाहेर काढले. त्यात राजीव सरकार गेले. या प्रकरणाच्या चौकशीवर दोनशे कोटी खर्च झाले. पण म्हणून 68 कोटींचा बोफोर्स घोटाळा लहान ठरत नाही. त्याने देश ढवळून निघाला आणि त्याचे राजकीय परिणाम झाले, हे सत्य आहेच.
 
सोनिया, राहुल या मायलेकांना नॅशनल हेराल्ड प्रकरणात जामीन मिळाला असला तरी टांगती तलवार कायमच आहे. दहा वर्षांच्या कारकीर्दीत झालेल्या अनेक घोटाळ्यांमध्येही त्यांची नावे घेतली जात आहेत. असे असताना हे लोक मोदींना चोर म्हणतात, तेव्हा त्यांच्या हिमतीला दादच द्यावीशी वाटते! जिनके अपने घर शीशेके होते है वे दुसरोंपे पत्थर नही फेका करते... असे म्हणतात. येथे तर उलटेच सुरू आहे. रोज दगडफेक! काय तर म्हणे, चौकीदार चोर है... उमा भारतींनी चांगला जवाब दिला. पण फक्त वाड्राच चोर नाही. सारे गांधी कुटुंबच भ्रष्टाचारी आहे आणि जनतेचे पैसे लुटत आले आहे. लोक याला चोरी नव्हे, तर दरोडेखोरी म्हणतात! गेली पाच वर्षे हे सारे थांबले, म्हणून तर जळफळाट झाला आहे ना!