इलेक्शन स्पेशल थाली आणि चौकीदार पराठा
   दिनांक :20-Apr-2019
लोकशाहीचा सर्वात मोठा उत्सव म्हणून ओळखल्या जाणार्‍या आगामी लोकसभा निवडणुकांचा रंग सर्वत्र पाहायला मिळत आहे. मतदार, उमेदवार, राजकारण, सत्ता, पक्ष, आरोप- प्रत्यारोप आणि देशाचा कारभार चालवण्यासाठी कोणत्या प्रतिनिधींची निवड केली जाणार याविषयी असणारं कुतूहल असंच काहीसं वातावरण आणि चर्चा सध्या सर्वत्र पाहायला मिळत आहेत. बाजारपेठांमध्ये असणार्‍या कपड्यांच्या दुकानांपासून ते अगदी भांड्यांच्या दुकानांपर्यंत सर्वत्र निवडणूकांचीच छाप पाहायला मिळत आहे.
 
 
 
पक्ष म्हणू नका िंकवा नेते, प्रत्येकातील लक्षवेधी बाब हेरत आता हे राजकीय वारे थेट खाण्याच्या ताटात अगदी साग्रसंगीतपणे रचण्यात आले आहेत. याला नाव देण्यात आलं आहे, ’इलेक्शन स्पेशल’ िंकवा ’निवडणूक स्पेशल थाळी’. नवी दिल्ली येथील कनॉट प्लेस या अत्यंत मोक्याच्या ठिकाणी ही थाळी खवैयांची भूक भागवत आहे. देशाच्याच आकाराच्या एका भव्य ताटाच्या रूपात ती आपल्या समोर येते. निवडणुकांच्या पार्श्र्वभूमीवर मतदान करण्यासाठी जास्तीत जास्त नागरिकांना एका आकर्षक मार्गाचा अवलंब करत प्रोत्साहित करावं हाच या संकल्पमेमागील मुख्य हेतू असल्याचं रेस्टॉरंटचे मालक सुवीत कालरा म्हणाले.
  
देशातील जवळपास 28 राज्यांमधील विविध पदार्थांची चव या थाळीत चाखायला मिळते. ज्यामध्ये अगदी वडापावपासून 'चौकीदार पराठा' ही आहे. सकस आहार, चविष्ट पदार्थ आणि राजकारणाची हवा पाहता ही थाळी खवैयांसाठी खर्‍या अर्थाने पर्वणी आहे, असं म्हणायला हरकत नाही. कोणाच्याही मनात जाण्याचा मार्ग हा त्याच्या पोटाच्या वाटे जातो असं म्हणतात. थोडक्यात काय तर, पोटोबा खुश ठेवत अनोख्या मार्गाने मतदारांमध्ये निवडणुका आणि मतदानाविषयीची जनजागृती करण्याचा हा फंडा खर्‍या अर्थाने सुपरहिट ठरत आहे हे खरं.