राज्यकर्ते, राजकारण्यांची अशीही अंधश्रद्धा!
   दिनांक :20-Apr-2019
राजकारणी-पुढारी मंडळींची वेगवेगळी अंधश्रद्धा कशा प्रकारे वर्षानुवर्षे सुरू असू शकते याचे प्रमुख उदाहरण म्हणून उत्तर प्रदेशच्या नोएडा विभागाचे देण्यात येते. उत्तर प्रदेशातील नोएडाला भेट देणारा मुख्यमंत्री एकतर निवडणुकीत पराभूत होतो िंकवा त्याला सत्ता सोडावी लागते अशी राजकीय-प्रशासकीय अंधश्रद्धा उत्तर प्रदेशात वर्षानुवर्षे प्रचलित होती. मात्र ही अंधश्रद्धा मोडित काढण्याचे महत्त्वपूर्ण व साहसी काम केले ते उत्तर प्रदेशचे विद्यमान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी.
 
 
 
नेएडाला भेट देणार्‍या मुख्यमंत्र्याला काही ना कारण अथवा संकटामुळे सत्ता सोडावी लागते ही अंधश्रद्धापूर्ण धारणा सुरू झाली ती सुमारे 40 वर्षांपूर्वी म्हणजेच 1880 च्या दशकात. त्यावेळी तत्कालीन व एकत्रित उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री वीर बहादूर िंसह यांनी राज्यात नव्याने विकसित झालेल्या नोएडाला भेट दिली होती व राजकीय योगायोग म्हणजे नोएडातून परत येताच पक्षाने त्यांना मुख्यमंत्रिपदावरून हटविले व या राजकीय योगायोगाची त्यावेळी बरीच चर्चा पण झाली होती.
 
या राजकीयदृष्ट्या धक्कादायक प्रकारानंतर उत्तरप्रदेशच्या जवळपास सर्वच मुख्यमंत्र्यांनी नोएडाला जाणे टाळले. सध्याचे गृहमंत्री व राज्याचे तत्कालीन मंत्री राजनाथिंसह यांनीही नोएडाला भेट देण्याचे कटाक्षाने टाळले होते. याउलट 2011 मध्ये मेट्रो सेवेच्या उद्घाटनासाठी उत्तर प्रदेशच्या तत्कालीन मुख्यमंत्री मायावती नोएडाला गेल्या होत्या. मात्र त्यानंतर 2012 च्या निवडणुकीत मायावती यांचा परभव झाला व समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव हे राज्याचे मुख्यमंत्री झाले.
 
अखिलेश यादव यांच्या मुख्यमंत्री कार्यकाळात नोएडा-एनआरसी येथील एका मोठ्या कार्यक्रमाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्याचा आग्रही प्रस्ताव होता. मात्र या उद्घाटनासाठी न जाण्याचा व आपले मुख्यमंत्रिपद जाऊ नये याचा अखिलेश यादव यांनी एवढा मोठा धसका घेतला होता की त्यांनी राजधानी लखनऊ येथील मुख्यमंत्री निवासातूनच या प्रकल्पाचे उद्घाटन करण्याचे प्रशासनिक सोपस्कार पार पाडले. एवढी सारी काळजी घेऊनही या नोएडाच्या कार्यक्रमाच्या उद्घाटनानंतर 2017 मध्ये झालेल्या उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव होण्याचा इतिहास तसा ताजा आहे.
 
या सार्‍या राजकीयदृष्ट्या अस्थिरतेच्या महत्त्वपूर्ण व परंपरागत राजकीय पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्रिपदाची सूत्रे सांभाळल्यानंतर डिसेंबर 2017 मध्ये नोएडातील एका कार्यक्रमात मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आवर्जून उपस्थित होते. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असणार्‍या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दशकांच्या राजकीय अंधश्रद्धेला बगल देत मुख्यमंत्री योगीजी या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचे जाहीर अभिनंदन केले होते. या कार्यक्रमाची त्यावेळी सार्‍या उत्तरप्रदेशात उत्सुकतापूर्ण चर्चा झाली होती.
 
नोएडातील या जाहीर कार्यक्रमात मुख्यमंत्री म्हणून उपस्थित राहिल्यानंतर पण आपले मुख्यमंत्रिपद शाबूत राखणार्‍या योगी आदित्यनाथ यांना त्यांच्या या नोएडातील कार्यक्रमानंतर उत्तरप्रदेशातील कैराना, फुलपूर व गोरखपूर या मुख्यमंत्र्यांच्याच विशेष प्रभाव क्षेत्रात झालेल्या तीनही लोकसभेच्या पोटनिवडणुकांमध्ये भाजपाचा एकजात व मोठ्या प्रमाणावर पराभव होण्याच्या राजकीय पार्श्वभूमीवर उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांच्या नोएडा कार्यक्रमानंतर होणारे विपरीत परिणाम हा मुद्दा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नव्या संदर्भात चर्चेला आला आहे.