हज यात्रेकरूंची फसवणूक करणाऱ्यांवर गुन्हा दाखल
   दिनांक :20-Apr-2019
 
 

 
 
नागपूर: हज यात्रेला जाणाऱ्या यात्रेकरूंकडून पैसे घेवून त्यांना हज यात्रेला न पाठविता त्यांची लाखो रुपयांनी फसवणूक केल्याप्रकरणी जुनी कामठी पोलिसांनी दोन एजंटविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
मुजीबुर रहमान आणि नूर मो. अंसारी अशी या एजंटची नावे आहेत.
मुजीबूर आणि नूर मोहम्मद यांचे फुटाना ओली, कामठी येथे अल हिजाज हज उमराह टुर्स नावाचे कार्यालय आहे. २०१६ मध्ये विणकर कॉलनी, कामठी येथील नसीम अख्तर मो. हनिफ (६५) यांना व त्यांच्या अन्य दोन नातेवाईकांना हज यात्रेला जायचे होते. त्यामुळे नसीम अख्तर यांनी मुजीबूर आणि नूर मोहम्मद यांच्या कार्यालयात जाऊन त्यांची भेट घेतली. त्यावर आरोपींनी त्यांना एका व्यक्तीला १ लाख ९० हजार रुपये खर्च येईल असे सांगितले. नसीम अख्तर यांनी तीन लोकांची बुकिंग केली. २५ ऑक्टोबर २०१६ रोजी दुपारी १२ च्या सुमारास अख्तर यांनी कामठी खदान येथील इंडियन बँक येथून अल हिजाज हज उमराहच्या खात्यात ५ लाख ७० हजार रुपये वळते केले. त्याचप्रमाणे आपले पासपोर्ट देखील टुर्स कार्यालयात जमा केले. काही दिवसानंतर आरोपींनी नसीम अख्तर यांना सांगितले की, तुमचे तिकीट व व्हिसा तयार न झाल्याने तुम्हाला हज यात्रेला जाता येणार नाही. नसीम यांनी पैसे परत मागितले असता २०१८ मध्ये हज यात्रेला पाठवू असे आश्वासन आरोपींनी दिले होते. २०१८ मध्येही आरोपींनी त्यांना यात्रेला पाठविले नाही. नसीम यांनी पैसे परत मागितले असता पैसे व त्यांचे पासपोर्ट देखील परत केले नाही.
त्याचप्रमाणे नसीम यांचे नातेवाईक ओ. असलम अंसारी (रा. खाकी बिल्डींगमागे, लकडगंज) यांच्याकडून देखील ५ लाख २० हजार रुपये घेऊन त्यांना हज यात्रेला न पाठविता त्यांची फसवणूक केली. याप्रकरणी नसीम अख्तर यांच्या तक्रारीवरून जुनी कामठी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.