केरळमध्ये निवडणूक प्रचार शिगेला
   दिनांक :20-Apr-2019
केरळमधील सर्वच सर्व 20 लोकसभा मतदारसंघात तिसर्‍या टप्प्यात 23 एप्रिल रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे आता येथील प्रचार शिगेला पोचला आहे. केरळमध्ये यावेळी भारतीय जनता पार्टी, कॉंग्रेस समर्थित संयुक्त लोकशाही आघाडी आणि डावी लोकशाही आघाडी अशी तिहेरी लढत बघायला मिळणार आहे. भाजपाला येथून पथानमथित्ता, पलक्कड आणि तिरुवनंतपुरम या तीन जागा मिळण्याची आशा आहे. त्यामुळे येथे भाजपा पूर्ण ताकदीनिशी उतरली आहे. त्रिचूर या जागेवरही भाजपाने लक्ष्य केंद्रित केले आहे. निवडणूकपूर्व सर्वेक्षणात तिरुवनंतपुरम येेथे भाजपाला 36 ते 40 टक्के मते मिळण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. येथे कॉंग्रेसचे शशी थरूर हे पुन्हा नशिब आजमावत आहे. पण, यावेळी त्यांना भाजपा उमदेवारासोबत कडवी टक्कर मिळणार असल्याचे बोलले जात आहे. येथून भाजपाने मिझोरामचे माजी राज्यपाल कुम्मानन राजशेखरन यांना तिकिट दिले आहे. प्रामुख्याने सबरीमला मंदिर प्रकरणी केरळ सरकारने घेतलेल्या निर्णयावर येथे बरेच रान माजले होते. त्यात भाजपाने आस्थेचा प्रश्न उपस्थित केला होता तर डाव्या आघाडीने सर्व महिलांना मंदिरात प्रवेश मिळावा, अशी भूमिका घेतली आहे. त्यामुळे येथे िंहदू मते मोठ्या प्रमाणात एकवटल्याचे दिसत आहे. तिरुवनंतपुरम येथे िंहदू मते 63 टक्के आहेत. 13 टक्के मुस्लिम व 19 टक्के ख्रिश्चनधर्मीय आहेत.
 
 
 
भाजपा उमेदवार राजशेखरन यांनी नुकतीच प्रख्यात चित्रपट अभिनेते मोहनलाल यांची भेट घेतली व त्यांना पद्मभूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल अभिनंदन केले होते. यावरून मोहनलाल यांचे भाजपाला समर्थन असल्याची आवई उठविण्यात आली होती. पण, ही माझी केवळ मोहनलाल यांचे अभिनंदन करण्यासाठीची सदिच्छा भेट होती, असे राजशेखरन यांनी म्हटले आहे. पलक्कड येथेही 66 टक्के िंहदू मते आहेत. मुस्लिम 29 आणि ख्रिश्चन मते 4 टक्के आहेत. या मतदारसंघावरही भाजपाचा डोळा आहे. पथानमथित्ता मतदारसंघात 57 टक्के िंहदू मते आहेत. केरळ राज्याचे वैशिष्ट्य म्हणजे येथे पुरुषांपेक्षा महिला मतदारांची संख्या अधिक आहे. सर्वच मतदारसंघात तीन ते चार टक्के अधिक महिला मतदार आहेत. केरळमध्ये महिला मतदारांची संख्या 1 कोटी 33 लाख आहे. तर पुरुष मतदारांची संख्या 1 कोटी 22 लाख आहे. या निवडणुकीत डावी आणि संयुक्त अशा दोन्ही आघाड्यांनी स्वत:ला प्रचारात झोकून दिले आहे. डाव्या आघाडीने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. तर कॉंग्रेसनेही पूर्ण जोर लावला आहे.