‘कॉफी विथ करण’ प्रकरण; हार्दिक पांड्या आणि के. एल राहुलला दंड
   दिनांक :20-Apr-2019
‘कॉफी विथ करण’ या करण जोहरच्या शोमध्ये महिलांबाबत आक्षेपार्ह विधान करणारा हार्दिक पांड्या आणि लोकेश राहुल यांना चौकशीसाठी हजर रहाण्याचे आदेश देण्यात आले होते. BCCI चे लोकपाल डी के जैन यांनी दिले होते. कार्यक्रमात  महिलांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारे भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि लोकेश राहुल यांना बीसीसीआयचे लोकपाल डी के जैन यांनी २० लाखांचा दंड ठोठवला आहे. यातील १० लाख हे शहीद निमलष्करी जवानांच्या कुटुंबीयांना तर १० लाख हे अंध क्रिकेटच्या निधीसाठी आणि त्याच्या प्रसिद्धीसाठी देण्याचे आदेश बीसीसीआयचे लोकपाल यांनी दिले आहेत.
 
 
या २० लाख रूपयांच्या दंडाच्या रकमेतील १० लाख कर्तव्य बजावताना शहीद झालेले निमलष्करी दलातील १० जवान यांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी १ लाख अशा प्रमाणे मदत निधी म्हणून दोघांनीही द्यावा. तसेच १० लाख रुपये हे अंध क्रिकेटच्या प्रचार आणि प्रसिद्धीसाठी तयार करण्यात आलेल्या संघटनेला मदत म्हणून द्यावा, असे आदेश लोकपाल डी के जैन यांनी दिले आहेत. ही  रक्कम त्यांनी ४ आठवड्यांच्या आत जमा करायची आहे. जर ही दंडाची रक्कम त्यांनी दिलेल्या कालावधीत जमा केली नाही, तर बीसीसीआयला त्यांच्या सामन्याच्या मानधनातून ती रक्कम कापून घेण्याचे हक्कदेखील लोकपाल यांनी दिले आहेत.
 
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) काही दिवसांपूर्वी या २ खेळाडूंवर निलंबनाची कारवाई केली होती. पण नंतर काही दिवसांनी या दोघांना आतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळण्याची परवानगी देण्यात आली. पण या दोघांपुढील अडचणी संपलेल्या नव्हत्या. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी नियुक्त केलेल्या लोकपालांनी या दोघांना नोटीस बजावल्या होत्या.