...आणि कुलदीपला अश्रू अनावर झाले
   दिनांक :20-Apr-2019
IPL 2019: 
 
विराट कोहलीच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाने शुक्रवारी हंगामातील दुसऱ्या विजयाची नोंद केली. कोलकाता नाईट रायडर्स संघाला त्यांच्याच मैदानात १० धावांनी मात देत बंगळुरुने धडाकेबाज कामगिरी केली आहे. या सामन्यात एक हृदयद्रावक प्रसंग पाहायला मिळाला. विराट-मोईन जोडीने कोलकात्याचा चायनामन फिरकीपटू कुलदीप यादवला लक्ष्य केले. कुलदीपच्या ४ षटकात बंगळुरुच्या फलंदाजांनी ५९ धावा कुटल्या. या कामगिरीमुळे कुलदीप यादव IPL मध्ये सर्वात महागडा गोलंदाज ठरला. कोलकाताकडून १४व्या षटकापर्यंत सारं काही नीट होतं. पण त्यानंतर कुलदीप यादवने फेकलेल्या षटकानंतर समीकरण पूर्ण बदलून गेले. त्याच्या त्या षटकात तब्बल २७ धावा मोईन अलीने लुटल्या. या घटनेनंतर कुलदीपला अश्रू अनावर झाले आणि त्याला मैदानावरच रडू कोसळल्याचे दिसून आले.

 
या घटनेनंतर ट्विटरवर भारतीय पाठीराख्यांनी ट्विट करत ‘अशा प्रकारच्या घटना खेळात घडतात. तू वाईट वाटून घेऊ नको. भविष्यात तू नक्की चांगली कामगिरी करशील’ अशा पद्धतीचे ट्विट करून त्याला पाठिंबा दर्शविला.
 
 
नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा दिनेश कार्तिकचा निर्णय त्याच्या गोलंदाजांनी सार्थ ठरवला. सलामीवीर पार्थिव पटेल आणि अक्षदीप नाथ झटपट माघारी परतले. मात्र यानंतर विराट कोहली आणि मोईन अली यांनी तिसऱ्या विकेटसाठी धडाकेबाज अर्धशतकी भागीदारी रचली. दोन्ही फलंदाजांनी कोलकात्याच्या गोलंदाजीचा समाचार घेतला. या भागीदारीमुळेच बंगळुरुने आजच्या सामन्यात आश्वासक धावसंख्येचा पल्ला गाठला. कोलकात्याकडून सुनील नरीन, आंद्रे रसेल, हॅरी गुर्ने आणि कुलदीप यादव यांनी प्रत्येकी १-१ बळी घेतला.