प्रेमसंबंधांना विरोध केल्यामुळे मुलीच्या वडिलाची हत्या
   दिनांक :20-Apr-2019
 
 
रत्नागिरी : प्रेमसंबंधांना विरोध केल्याच्या रागातून प्रियकराने मुलीच्या वडिलांची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे .  तालुक्यातील कोतवडे येथील कांबळे यांना गेल्या गुरूवारी रात्री त्यांच्या घराजवळ गाठून आरोपीने गोळया घातल्या. या हल्ल्यात कांबळे यांचा जागीच मृत्यु झाला. खून करून मुंबईला पळणाऱ्या मुख्य आरोपीला ग्रामीण पोलिसांनी अवघ्या काही तासांत अटक केली. तर अन्य एका तरुणाची कसून चौकशी सुरू आहे.
कांबळे यांचा खून करण्यासाठी आरोपी ऋषिकेश सनगरे याने सहा महिन्यापुर्वी पिस्तुल खरेदी केले. खरेदी केलेल्या बेकायदेशीर रिव्हॉल्व्हरचा वापर करून ऋषिकेशने पूर्वनियोजित कट रचत कांबळे यांची हत्या केली. त्याला २२ एप्रिल पर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. हत्येनंतर काही तासातच आरोपीला गजाआड करणारे पोलीस निरीक्षक सुरेश कदम यांचे वरिष्ठांनी अभिनंदन केले आहे.
कांबळे यांची मुलगी व संशयित आरोपी ऋषिकेश हे दोघे कोतवडे येथील शाळा आणि महाविद्यालयात एकत्र शिक्षण घेत होते. शाळेपासूनच दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. महाविद्यालय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्या तरुणीसह ऋषिकेश मुंबई येथे नोकरीसाठी गेला.
 
 
दोघांच्या प्रेमसंबंधांची माहिती कांबळे यांना झाली. ऋषिकेश याची वर्तणूक चांगली नसल्याची माहिती भिकाजी कांबळे व त्यांच्या कुटुंबियांना मिळाली. त्यामुळे त्यांनी ऋषिकेश व मुलीच्या प्रेम संबंधाला विरोध केला. तू ऋषिकेश पासून लांब रहा, असे कांबळे यांनी आपल्या मुलीला बजावले होते . तेव्हापासून ती मुलगी ऋषिकेशला वारंवार टाळत होती. याचाच राग ऋषिकेश मनात निर्माण झाला होता.
आरोपीचा यापूर्वी अनेक वेळा भिकाजी कांबळे यांच्याशी वाद, बाचाबाची झाली होती. तो कांबळे यांना वारंवार धमकीही देत असे. पण त्यांनी त्याबाबत पोलीस स्थानकात तक्रार केली नव्हती. प्रेम संबंध सुरू असताना कांबळे यांच्या मुलीने ऋषिकेशकडून दहा हजार रुपये उसने घेतले होते. ती आपल्याला टाळत आहे, हे लक्षात आल्यानंतर ऋषिकेशने ते पसे कांबळे यांच्याकडे मागितले. त्यांनीही पसे देण्यास तयारी दर्शविली होती. परंतु मला तुमच्या मुलीच्या समक्ष पसे हवेत, असा आग्रह ऋषिकेशने धरला होता.
गेल्या १७ एप्रिलला ऋषिकेश मुंबईहून रत्नागिरीत आला होता. त्याच दिवशी त्याने कांबळे यांना मुलीला बोलावून घ्या, नंतरच माझे पसे परत करा, असे बजावले होते. कांबळे यांनीही मुलीला फोन करून येण्याची सूचना केली. परंतु सुट्टी मिळत नसल्याने ती आली नाही. दुसऱ्या दिवशी, १८ एप्रिलला रात्री भिकाजी कांबळे आपल्या घरी जात असताना ऋषिकेशने त्यांना रस्त्यात अडविले. मुलगी आली का, असे विचारताच कांबळे यांनी नाही असे सांगितले. सुट्टी मिळाल्यानंतर ती येईल, त्यानंतर आपण विषय संपवून टाकू, असे ते ऋषिकेशला सांगत होते. हा वाद सुरू असतानाच त्यांनी, मुंबई येथील आपल्या मुलीला फोन करून गावी निघून येण्यास सांगितले. येथे ऋषिकेशने मला अडवले आहे, असेही त्यांनी फोनवरून मुलीला सांगितले. त्यानंतर काही क्षणातच ऋषिकेशने कांबळे त्यांच्यावर गोळी झाडली. त्यानंतर तो मुंबई जाण्यासाठी तेथून पळून गेला. स्थानिक ग्रामस्थांनी मृतदेह पाहिल्यानंतर ही घटना उघड झाली.