जे बोलतो ते करून दाखवतो : नितीन गडकरी
    दिनांक :20-Apr-2019
पैठण :
 
भाजप सरकारने सत्तेत आल्यापासून विकासाची अनेक कामं केली आहेत. काँग्रेसला ५० वर्षात जे जमलं नाही ते भाजपने ५ वर्षात करून दाखवलं आहे. ५ वर्षात मराठवाड्यात, राज्यात मोठा विकास झाला आहे. मी फोकनाड नेता नाही, जे बोलतो ते करून दाखवतो, असे प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे.
 
रावसाहेब दानवे यांच्या प्रचारार्थ पैठणमध्ये आयोजित प्रचारसभेत ते बोलत होते. यावेळी गडकरी म्हणाले की, ज्यांना विकासावर मतं मागता येत नाहीत त्यांनी जातीवादावर मतं मागायला सुरुवात केली आहे. सुरुवातीपासून काँग्रेस गरीबी हटावचा नारा देत आहे. आता पंडित नेहरूंचा पणतू देखील गरीबी हटावचाच नारा देत आहे, असे गडकरी म्हणाले. आजवर जनतेची गरीबी हटली नाही मात्र काँग्रेसच्या चेल्या चंपाट्यांची गरीबी हटली असल्याचेही ते म्हणाले.
 
 


 
गडकरी यावेळी म्हणाले की, राज्यात मोठ्या प्रमाणावर सिंचनाची कामे झाली आहेत. यामुळे पुढील दीड वर्षात महाराष्ट्राची सिंचन क्षमता वाढणार आहे. मराठवाड्यातील साडेपाच लाख एकर जमीन पाण्याखाली येणार आहे, असे गडकरी म्हणाले.
यावेळी गडकरी म्हणाले की, मराठवाड्यात ७० हजार कोटी खर्चून राष्ट्रीय महामार्गाचे काम सुरु आहे. महाराष्ट्रात फक्त माझ्या विभागाकडून ५ लाख कोटींची काम सुरु आहे, असे त्यांनी सांगितले.
जायकवाडी धरण भरत नाही, कारण गोदावरीला पाणी नाही, मात्र दमनगंगा पिंजर योजनेतून आम्ही गोदावरीला पाणी सोडण्याचे नियोजन करतोय, त्यातून आगामी काळात जायकवाडी १०० टक्के भरेल, असेही गडकरी म्हणाले. मराठवाडा पाणी प्रश्न गंभीर आहे. ७ हजार कोटी रुपयांची नदीजोड करतो आहे. त्यामुळे मराठवाडा सुजलाम सुफलाम होईल, असे गडकरी म्हणाले.