साध्वींची उमेदवारी...
   दिनांक :20-Apr-2019
 
 
साध्वी प्रज्ञािंसह ठाकूर यांना भोपाळ लोकसभा मतदारसंघातून भारतीय जनता पार्टीने उमेदवार म्हणून घोषित करताच, सर्वत्र खळबळ माजणे स्वाभाविकच होते. या भारतमातेला, या भूमीवरील सनातन धर्माला जे प्राणापलीकडे प्रेम करणारे आहेत, त्यांना साश्चर्य आनंद झाला. परंतु, ज्यांना या समाजाला, या देशाला क्षतविक्षत करायचे आहे, त्यांना मात्र प्रचंड धक्का बसल्याचे जाणवले. हा धक्का इतका प्रचंड आहे की, अजूनही ते या धक्क्यातून सावरल्याचे दिसत नाही. भोपाळमध्ये साध्वींचा सामना कॉंग्रेसचे दिग्विजयिंसह यांच्याशी आहे. त्यांना तर घाम फुटल्याचे त्यांच्या प्रतिक्रियेवरून दिसून आले. एक अत्यंत पाताळयंत्री म्हणून दिग्विजयिंसह यांची कीर्ती आहे. अशा या व्यक्तीविरुद्ध भाजपाने साध्वी प्रज्ञा यांना उतरवून, सार्‍या देशाचे लक्ष भोपाळ मतदारसंघाकडे वेधले आहे.
 
 
 
 
मालेगाव येथील मशिदीत झालेल्या बॉम्बस्फोटात, साध्वी प्रज्ञािंसह यांचा सहभाग होता, या आरोपावरून त्यांना 2008 साली अटक करण्यात आली. अटकेत असताना त्यांचा अनन्वित छळ करण्यात आला. इतका छळ कदाचित इंग्रजांनीदेखील भारतीय देशभक्तांचा केला नसेल! या अमानवी छळपायी त्यांना विविध आजारदेखील जडले. एक-दोन नाही, तर तब्बल नऊ वर्षे त्या तुरुंगात होत्या. त्यांच्यावर जी कलमे लावण्यात आली होती, त्यामुळे त्यांना जामीनही मिळत नव्हता. नऊ वर्षे छळल्यानंतरही त्यांच्यावर आरोपपत्र दाखल करता येत नव्हते. शेवटी साध्वीवरील संघटित गुन्हेगारीचे कलम हटविण्यात आले. तदनंतर राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) त्यांच्यावरील आरोप खारीज करून निर्दोष मुक्त केले. परंतु, त्यांच्यावर सध्या बेकायदेशीर कारवाया प्रतिबंधक कायद्यान्वये (युएपीए) खटला चालू आहे. त्यांची ढासळती प्रकृती बघून न्यायालयाने त्यांना जामीन दिला आहे आणि आता त्या भाजपाच्या उमेदवार म्हणून दिग्विजयिंसहांविरुद्ध उभ्या आहेत.
 
एका महिलेचा आरोपी म्हणून किती अमानवी छळ करता येतो, याचे साध्वी प्रज्ञा प्रतीक बनल्या आहेत. तुरुंगात त्यांनी नऊ वर्षे जे भोगले, ते ऐकले तर दगडालाही पाझर फुटेल आणि हा सर्व छळ, ज्यांना महाराष्ट्राने डोक्यावर घेतले होते, त्या एटीएस प्रमुख हेमंत करकरे यांनी केला, हे जर खरे असेल तर आणखीनच दुर्दैव म्हणावे लागेल. 26/11च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यात हेमंत करकरे अतिरेक्यांकडून मारले गेले. त्या वेळी सारा महाराष्ट्र हळहळला होता. परंतु, आता प्रज्ञािंसह यांच्या खुलाशाने हेमंत करकरे यांची दुसरी बाजू समोर आली आहे. आता कुठला हेमंत करकरे स्वीकारायचा, हे जनता ठरवेल. त्यात आपण मध्ये पडायचे काही कारण नाही.
 
ज्या त्वेषाने भाजपाविरोधकांच्या प्रतिक्रिया येत आहेत, त्यावरून ते या उमेदवारीमुळे किती घाबरले आहेत, हेच लक्षात येते. या देशाला मोदी-शाह यांच्या जोडीपासून वाचविण्यासाठी या लोकांनी इतक्या वर्षांपासून जे अथक प्रयत्न चालविले आहेत, त्या प्रयत्नांद्वारे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे, ते सर्व प्रयत्न आणि त्यांना नजरेसमोर दिसत असलेला (स्वप्नातील म्हणा) यशाचा कलश, हळूहळू ध्वस्त होत आहे. त्यामुळे इतक्या दिवसांची मेहनत पाण्यात जाताना बघून ज्या वेदना होणार, त्या वेदनाच त्यांच्या या सर्व प्रतिक्रियांमधून दिसून येत आहेत.
 
आता प्रज्ञािंसह यांना निवडणूक लढविण्यापासून रोखण्यासाठी सर्व तर्‍हेचे व सर्व पातळीवरचे प्रयत्न सुरू झाले आहेत. निवडणूक आयोगाकडेही धाव घेऊन झाले. आयोगाने सांगितले की, साध्वी प्रज्ञािंसह या गुन्हेगार नाहीत. त्यांच्यावर फक्त आरोप आहेत. त्यामुळे त्यांना निवडणूक लढविण्यापासून आम्ही रोखू शकत नाही. आता काही जण न्यायालयात गेले आहेत. मालेगाव बॉम्बस्फोटात मरण पावलेल्या एकाचे वडील निसार सईद यांनी एनआयएच्या न्यायालयात धाव घेत मागणी केली आहे की, साध्वी प्रज्ञािंसह यांना प्रकृतीच्या कारणावरून जामीन मिळाला आहे. परंतु, ज्या अर्थी त्या निवडणूक लढविण्यास सक्षम आहेत, त्या अर्थी त्यांची प्रकृती आता चांगली ठणठणीत झाली आहे. त्यामुळे त्यांचा जामीन रद्द करण्यात यावा. यावर न्यायालयाचा निर्णय येत्या काही दिवसांत अपेक्षित आहे. न्यायालयाचा निर्णय काहीही लागो, भोपाळमध्ये दिग्गीराजांचा पराभव निश्चित आहे, असे आजच म्हटले जाऊ लागले आहे.
 
साध्वी प्रज्ञािंसह यांना उमेदवारी देऊन भाजपाने ‘हिंदू  दहशतवादा’वरील चर्चेला मध्यभागी आणले आहे. प्रत्येक दहशतवादी कृत्यात मुसलमानच सापडत होते. केवळ भारतातच नाही, तर जगभरातही. त्यामुळे मुसलमान अस्वस्थ होत होते की नाही, माहीत नाही. कदाचित होतही नसतील. परंतु, स्वत:ला मुसलमानांचे हितकर्ते, आधारस्तंभ मानणारे भारतातील विचारवंत व मीडिया मात्र अत्यंत अस्वस्थ होते. मुसलमानांप्रती जनमानसात जो संताप निर्माण होत होता, त्याने हा समाज वाळीत पडेल, या भीतीने या मंडळींना रात्र-रात्र झोप येत नसावी. त्यावर या लोकांनी एक तोड शोधली. ही तोड भयंकर होती. हजारो वर्षांपासून आपल्या सहिष्णुतेमुळे जगभर ख्यात असलेल्या, एवढेच नाही तर या सद्गुणामुळे स्वत: प्रताडित झालेल्या हिंदू समाजालाच दहशतवादी ठरविण्याचे कारस्थान रचण्यात आले. केंद्रातील सोनिया गांधींच्या संपुआ सरकारमधील पी. चिदम्बरम्‌ व कपिल सिब्बल या पाताळयंत्री मंत्र्यांच्या मदतीने हा कट रचला गेला, अशी चर्चा आहे. त्याला शरद पवारांसारख्या हिंदूदुद्वेष्ट्याने तत्काळ पािंठबा दिला असावा आणि तदनुसार मालेगाव मशीद बॉम्बस्फोटात साध्वी प्रज्ञािंसह यांच्यासह काही जणांना अटक करण्यात आली. केवळ मुसलमानच नाही तर  हिंदू देखील दहशतवादी असतो, असा प्रचार सुरू करण्यात आला. या खोट्या लांछनाने हिंदू समाज दुखावून उसळून उठला. पण, त्यामुळे जे नुकसान व्हायचे ते झालेच होते. केवळ मतांसाठी संपूर्ण हिंदू समाजाचा करण्यात आलेला हा अपमान अभूतपूर्व होता. अगदी इंग्रजांनीदेखील असा आरोप कधी केला नव्हता. मात्र, कॉंग्रेस पक्षाने ते पाप केले. आता या पापाचे त्यांना प्रायश्चित्त देण्याची संधी या निवडणुकीच्या माध्यमातून हिंदू समाजाला मिळाली आहे. त्या संधीचा पुरेपूर उपयोग करून हिंदू समाजाने त्यांच्यावर चिटकविण्यात आलेले हिंदू दहशतवादाचे लांछन दूर केले पाहिजे आणि सार्‍या जगाला दाखवून दिले पाहिजे की, हिंदू समाजाला कारस्थान करून बदनाम करणार्‍यांची काय गत होते ते.
साध्वी प्रज्ञा प्रखर वक्त्या आहेत. आपल्या वाणीतून समोरच्याला अंतर्बाह्य हादरवून टाकण्याची त्यांच्यात क्षमता आहे. त्यांनी या सनातन धर्मासाठी भोगलेही अपार आहे. परंतु, आता त्या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. इथले नियम, मर्यादा वेगळ्या असतात. निवडणुकीच्या काळात निवडणूक आयोगाला जवळजवळ संपूर्ण अधिकार असतात. त्यामुळे यापुढे प्रत्येक कृती, प्रत्येक वक्तव्य अधिक काळजीपूर्वक व धोरणाने केले पाहिजे. साध्वी प्रज्ञा यांनी जे भोगले, सोसले ते सर्वत्र पोहोचले आहे. लोकांच्या मनात त्याची सलही आहे. त्या छळाचा आता वारंवार उच्चार नको. एक लोकप्रतिनिधी म्हणून आपण भोपाळसाठी काय करू शकतो, याचा आराखडा जनतेसमोर त्यांनी ठेवणे अधिक सयुक्तिक राहील. त्या राजकारणात नव्या आहेत. प्रतिस्पर्धी घाग आहे. त्यामुळे खूप सावधगिरी बाळगावी लागणार आहे. आपले नवखेपण, समर्थकांना व पक्षाला अडचणीत आणणार नाही, याची अतिशय काळजी त्यांनी घेतली पाहिजे. युद्धात कधीकधी दोन पावले मागे घेणेही शहाणपणाचे आणि विजयाकडे नेणारे असते, याचे भान साध्वी ठेवतील, अशी आशा आहे...