राजसाहेब, पवारांनंतर तुम्हीच!
   दिनांक :20-Apr-2019
चौफेर  
 
 सुनील कुहीकर 
 
 
 
 
राजसाहेब,
त्रिवार कुर्निसात!
हो! गेल्या काही दिवसांत ‘जय महाराष्ट्र’ म्हणण्याची सवय सुटली म्हणे आपली! ज्या लोकांच्या सेवेत सध्या आपले दिवस चालले आहेत, तिकडे हुजरेगिरीलाच प्राधान्य आहे! तेव्हा म्हटलं सरळ कुर्निसातच करावा. सध्या बरीच धावपळ चालली असणार ना राजे? किती त्या सभा, किती ते बोलणे... एकही उमेदवार मैदानात उतरविण्याची परिस्थिती नसलेल्या पक्षाच्या अध्यक्षाने, मतदारांनी कुणाला निवडून द्यावे, याबाबतचे ज्ञान पाजळण्याची कला खरंतर दुर्मिळच. पण, आपण ती लीलया साध्य केली आहे. राजसाहेब, आपलं किती कौतुक करावं हेच कळत नाहीय्‌ बघा! कालपर्यंत वाटत होतं, राजकारणात सरड्यासारखे रंग बदलण्याची जी कला पवारांना साधली आहे, तो वारसा भविष्यात कोण सांभाळणार? कधी कॉंग्रेसमध्ये, कधी पुलोदचा प्रयोग, मग पुन्हा कॉंग्रेसमध्ये, मग सोनियांना विरोध, मग त्याच सोनियांच्या मदतीने सत्तेत सहभाग, गेल्या निवडणुकीत तर मागितल्यास भाजपालाही पािंठबा द्यायला तयार झाले होते ते... राजकारणातले इतके विरोधाभास ज्या व्यक्तीला सहज निर्माण करता आले अन्‌ तितक्याच सहजतेने जनतेच्या गळी उतरवताही आले... हे असलं विचित्र काही घडवायला पवारच लागतात. वाटलं होतं, पवारांचा वारसा चालविणारा कुणी निर्माण होतो की नाही? पण, परवा पाडव्याच्या मुहूर्ताला तुमचं ते खास लकबीतलं भाषण ऐकलं अन्‌ डोळे पाणावले. ऊर भरून आला. वाटलं, पवारांचा वारसदार सापडला एकदाचा या महाराष्ट्राला. आता चिंता वाहण्याची अजीबात गरज नाही. नीतिमत्ता केराच्या टोपलीत टाकून, विचारधारा फुटबॉलसारखी उडवत, साथीदारांची पत्रास न बाळगता, जनतेला काल काय सांगितलं होतं हे विसरून, जणू आजच नव्याने काही सांगत असल्याचा आव आणत वार्‍याची दिशा बघून रंग बदलणारा नेता या राज्याला लाभलाय्‌ तो ‘आपल्या’ रूपाने. व्वा! राजसाहेब. त्रिवार कुर्निसात आपल्याला!
 

 
 
 
खरंतर राजकीय पक्षांनी निवडणुकी लढवायच्या. स्थानिक स्वराज्य संस्थांपासून तर विधिमंडळ, संसदेपर्यंत सर्वदूर आपले उमेदवार उभे करायचे. त्यांना निवडून आणण्यासाठी नेत्यांनी ताकद पणाला लावायची. प्रसंगी स्वत: मैदानात उतरायचे. जनतेला साद घालायची. हेच तर घडत आलेय्‌ आजवर. पण, इथे तर आश्चर्याचा धक्का आहे. इथे एका राजकीय पक्षाचा नेता स्वत: निवडणुकीत उभे न राहता तिसर्‍याच राजकीय पक्षाला निवडून द्या अन्‌ चौथ्याला अजीबात निवडून देऊ नका, असे सांगत सुटलाय्‌... बरं, त्याहून कहर असा की, ज्या पक्षाच्या नेत्याला तो आज झिडकारतोय्‌, त्याचे पाय धुवून पाणी पिण्याचा सल्ला याच राजसाहेबांनी गेल्या निवडणुकीत कॉंग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना दिला होता...
राजसाहेब, असले विरोधाभास दर्शविणारे टुकार विनोद करण्याची बिशाद आणि कसब फक्त आपलेच! ज्या तर्‍हेची भाषणं आपण मुंबई, सोलापुरात केलीत, खरंतर तसल्या अभ्यासपूर्ण भाषणाची गरज विधिमंडळ, संसदेत असते. चार महिन्यांनंतर होणार्‍या विधानसभा निवडणुकीत आलेच कुणी चुकून आपल्या पक्षाचे उमेदवार निवडून, तर शिकवा त्यांना, तिथे भाषण कसे करायचे, विरोधी पक्षनेत्यांनी अभ्यास कसा करायचा, मुद्दा कसा मांडायचा अन्‌ खोटा असला तरी तो सिद्ध कसा करायचा असतो ते. हां, पण तोवर तुमची प्रॅक्टिस चालू द्या. जनता लय भारी आहे आपल्या देशातली. चुटकीसरशी मूर्ख बनवता येते तिला (खरं सांगा, आपल्यालाही असंच वाटतं ना?). आपलं शिवसेनेतून बाहेर पडणं, मनसेची स्थापना, ‘बाळासाहेबांचा आदर राखून’ शिवसेनेला शिव्या हासडणं, कधी भाजपाचा पदर धर, तर कधी कॉंग्रेसला मदत कर... एखाद्या मुद्यावर भाजपाच्या बाजूने, तर दुसर्‍याच क्षणी दुसर्‍या मुद्यावर विरोध, या पद्धतीने कारभार चालवला मनसेच्या तेरा सदस्यांनी गेल्या सत्रात. बहुधा म्हणूनच की काय, पण लोकांनीही तीनतेरा वाजवले! पक्षाचे जाहीर धोरणही असेच बदलत राहिले. खुद्द राजसाहेब कधी शिवसेनेसाठी, कधी त्यांच्या विरोधात, गेल्या निवडणुकीत मोदींच्या बाजूने, यंदा मोदींच्या विरोधात, गेल्या वेळी गुजरातेत जाऊन आल्याबरोबर प्रभावित झाल्याची बतावणी, यंदा मात्र त्या दौर्‍यात काही खास बघायला मिळालं नव्हतं असा कांगावा... व्वा! राजसाहेब, व्वा! अशाने तर सरड्यांनाही मागे टाकाल तुम्ही, रंग बदलण्याच्या स्पर्धेत!
पण, गेल्या विधानसभा निवडणुकीत लोकांनी आपल्या पक्षाला साफ नाकारलं, हे वास्तव खिशात बाळगून ज्या ऐटीत आपण राजकारणात विनासायास वावरत आहात ना राजसाहेब, मान गये बॉस! याला म्हणतात मुजोरी. शिवसेनेशी फारकत घेऊन मनसे स्थापन केलीत, ती वैयक्तिक स्वार्थापायी. पक्षाचे प्रमुखपद वाट्याला आले नाही म्हणून. पण, नंतरच्या काळात किती म्हणून किती सोयीचे राजकारण करत आलात आपण? तुम्ही सांगणार अन्‌ लोक ऐकणार, असंच ना? ते, मुंबईत येऊन धडकणार्‍या बिहारी, उत्तरप्रदेशी तरुणांना नंतर कधी आडवे आले नाहीत आपल्या पक्षाचे सैनिक. मराठी तरुणांची रोजगाराची गरज संपली की काय आता? पाकिस्तानी कलावंतांचा सहभाग असलेल्या टीव्ही मालिकेला सुरुवातीला विरोध करून नंतर तिचा मार्ग मोकळा करून देण्याचा प्रकार असो, की धडाक्यात सुरू होऊन अचानक थांबलेले मनसेचे टोल नाक्यांविरुद्धचे आंदोलन असो, कायम लोकांना गृहीत धरून निर्णय बदलत राहिलात साहेब तुम्ही. परवाही स्वत:च्या बदललेल्या भूमिकेचे निलाजरे समर्थन करण्यासाठी बाळासाहेबांच्या नावाचा आधार घेतलात! एक मराठी व्यक्ती राष्ट्रपती बनत असल्यामुळे शिवसेनेचा पाठिंबा कॉंग्रेसला, असं बाळासाहेबांनी जाहीर केलं. किती मूर्ख समजता ना तुम्ही राजकारणी लोक जनतेला? मराठी माणसाच्या हिताआड शिवसेना कॉंग्रेसच्या पाठीशी उभी राहिली, असं बाळासाहेबांनी सांगितलं अन्‌ विश्वास बसला लोकांचा लागलीच त्यावर? आता तुम्ही निघालात त्याच धर्तीवर कॉंग्रेसच्या वार्‍याला उभे राहायला? अन्‌ तुमच्यावरही लोकांचा ठाम विश्वास बसावा अशी अपेक्षा करताय्‌? जनता, तुम्ही समजता तितकीही खुळी नाही हो राजसाहेब! कळते तिला तुम्हा राजकारण्यांची लबाडी. मुंबई मनपाची सत्ता वर्षानुवर्षे शिवसेनेच्या खिशात कशी जाते आणि ऐन निवडणुकीच्या तोंडावर राजसाहेबांच्या मनात मोदींबद्दल अचानक संताप कसा निर्माण होतो... सारंच कळते जनतेला.
आपला चाहता म्हणून एकच विनंती आहे साहेब आपल्याला. निदान मनाची तरी राखा. गेल्या निवडणुकीत ज्यांची स्तुती करून थकला नाहीत त्यांना आता शिवीगाळ करत सुटलात. निदान, स्वत:च्या पक्षाची तरी बूज राखा. लोक मोठ्या आशेनं बघताहेत तुमच्याकडे. कायम काय हो असे कुणाच्यातरी दावणीला बांधून घेता स्वत:ला? पक्षाचा कार्यकर्ता तुमच्या शब्दावर काम करतो, याचे भान राखून तरी वापर करा आपल्या शब्दांचा. गेल्या दहा वर्षांत लोकसभेच्या चार जागा लढवण्याइतकीही परिस्थिती निर्माण करू शकला नाहीत. गेल्या विधानसभा निवडणुकीत धड आकडा गाठू शकला नाहीत. म्हणून तुमच्या शब्दावर विश्वास ठेवणार्‍या जनतेला कॉंग्रेसच्या दावणीला बांधायला निघालात? कोण आहेत प्रायोजक तुमच्या जाहीर सभांचे? अन्‌ म्हणे तुमचा सध्याचा निर्णय फक्त लोकसभा निवडणुकीसाठी आहे? म्हणजे स्वत:ची राजकीय सोय बघून चार महिन्यांनी पुन्हा बदलणार तुमची भूमिका? त्यानुरूप आपला निर्णय बदलत जनतेनेही फरफटत यायचे तुमच्या मागे? इतके मूर्ख समजता राजसाहेब तुम्ही मराठी जनतेला? की गृहीत धरता त्यांना?
सभेत ज्याचे व्हिडीओ दाखवलेत, त्या हरिसालला कधी गेला होतात? वर्षभरापूर्वी केव्हातरी जाऊन आलात त्या भरवशावर दिली ठोकून आता. पुण्यात राहून मेळघाटात काम करणार्‍या ज्या कुण्या तुमच्या पक्षकार्यकर्त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे ‘लाव रे तो व्हिडीओ’ म्हणत प्रचार करत निघालात, एकदा वस्तुस्थिती शंभर टक्के आपण म्हणता तशीच आहे का हे तपासून तरी घ्या. सरकार म्हणते तेवढी तिथली स्थिती सुधारली नसेलही, पण आपण दाखवली तेवढीही ती वाईट नाही. हरिसालच्या पंचक्रोशीतील गावे या डिजिटलायझेशनचा उपयोग करताहेत आज. दहा किलोमीटर अंतरावर असलेल्या लवादा गावातील बांबू केंद्राची आयटीशी संबंधित कामे हरीसालमधील सुविधेच्याच भरवशावर चालली आहेत. मग खोटे का सांगताहात जनतेला? कॉंग्रेस, राष्ट्रवादीला मदत करण्याची शपथ घेऊन बसलात की काय यंदा? म्हणून चाललाय्‌ मोदींविरुद्धचा हा थयथयाट? तुम्ही जरूर करा तुमचे राजकारण. नाहीतरी दर निवडणुकीत वेगवेगळ्या लोकांकरता मते मागण्याचा एव्हाना सराव झाला आहेच तुम्हाला. पण, जनतेला गृहीत धरून तरी राजकारण करू नका!
आपलाच,
एक चाहता
(भविष्यातही राहीलच याची खात्री नसलेला!)
9881717833