विकी कौशलला चित्रीकरणादरम्यान दुखापत
   दिनांक :20-Apr-2019

‘उरी : द सर्जिकल स्ट्राइक’च्या चित्रपटाच्या अभूतपूर्व यशानंतर अभिनेता विकी कौशल आता आगामी चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यग्र झाला आहे. दिग्दर्शक भानू प्रताप सिंह यांच्या आगामी थरारपटात तो मुख्य भूमिका साकारत आहे. या चित्रपटाचं शूटिंग सध्या गुजरातमध्ये सुरू आहे आणि एका साहसी दृश्याचं शूटिंग करताना विकी दुखापतग्रस्त झाला आहे. त्याच्या जबड्याला मार लागला असून १३ टाके पडले आहेत.

 
 
 

गुजरातमधल्या अलंग या शिपयार्डमध्ये साहसी दृश्याचं शूटिंग सुरू होतं. या दृश्यात विकीला धावत जाऊन दरवाजा उघडायचा होता. मात्र तो दरवाजाच विकीच्या अंगावर पडला आणि त्याला जबर मार लागला. घटनेनंतर त्याला ताबडतोब तिथल्या स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

 

करण जोहर निर्मित या चित्रपटात विकीसोबतच भूमी पेडणेकरचीही महत्त्वपूर्ण भूमिका आहे. विकीने २०१५ मध्ये ‘मसान’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. त्यानंतर ‘राजी’, ‘संजू’ आणि ‘मनमर्जियाँ’मधील अभिनयामुळे त्याला ओळख मिळू लागली. तर ‘उरी : द सर्जिकल स्ट्राइक’ या चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर कमालच केली. या चित्रपटाने बॉक्स ऑफीसवर २०० कोटींहून अधिकचा गल्ला जमवला आहे.