व्यावसायिक बॉक्सिंग स्पर्धा : विकास कृष्णनची दुसरी लढत न्यू यॉर्कमध्ये रंगणार
   दिनांक :20-Apr-2019
न्यू यॉर्क,
 
भारतीय बॉक्सर विकास कृष्णन याला अमेरिकेच्या नोआह किड्ड याने आव्हान दिल्याने त्याची दुसरी प्रो बाऊट न्यू यॉर्कच्या मॅडिसन स्क्वेअरवर शनिवारी रंगणार आहे.
 
 
भिवानीचा बॉक्सिंगपटू विकासने व्यावसायिक बॉक्सिंग गटात दमदार प्रवेश केला होता. जानेवारी महिन्यात त्याने अमेरिकेच्याच स्टिव्हन आंद्रेदला नॉक आऊट करून बाहेर काढले होते. त्या पाश्र्वभूमीवर विकासची दुसरी झुंज अमेरिकेत होत आहे. त्याबद्दल बोलताना विकासने सांगितले की, ‘‘संपूर्ण जगात मॅडिसन स्क्वेअरचे ठिकाण हे लढतींसाठी प्रसिद्ध आहे. तिथे मला माझी दुसरीच लढत खेळायला मिळणार असल्याचा आनंद आहे. अशा जगविख्यात ठिकाणी खेळण्याचा एक वेगळाच दबाव असतो. मात्र, सर्व प्रकारचे दबाव झेलायलादेखील मी शिकलो आहे.’’
विकास सध्या न्यू यॉर्क आणि न्यू जर्सी येथे माजी बॉक्सिंगपटू वली मोझेस यांच्याकडून प्रशिक्षण घेत आहे. विकासने यापूर्वी आशियाई आणि राष्ट्रकुल स्पर्धेतील पदके जिंकली आहेत, तर विकासचा प्रतिस्पर्धी नोआह हा २३ वर्षांचा असून त्याने २०१६ साली व्यावसायिक बॉक्सिंगमध्ये प्रवेश केल्यानंतर दोन लढती जिंकल्या आहेत.