भाजपाला पूर्ण बहुमत मिळणे कठीण : शरद पवार
   दिनांक :20-Apr-2019
 
 
 अलिबाग: भाजपासाठी २०१४ सारखी परिस्थिती राहणार नाही. देशातील प्रादेशिक राजकीय परिस्थिती लक्षात घेतली तर, लोकसभा निवडणुकीनंतर भाजपाला पूर्ण बहुमत मिळेल, असे वाटत नाही, असा दावा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज शनिवारी येथे व्यक्त केला. ते अलिबाग येथे शेतकरी भवनात माध्यमांशी बोलत होते. यावेळी शेकाप सरचिटणीस जयंत पाटील उपस्थित होते.
 

 
 
यावेळी पवार म्हणाले, मागील पाच वर्षांत प्रादेशिक पातळीवरील राजकीय परिस्थिती बदलली आहे. उत्तरप्रदेशमध्ये सपा आणि बसपा एकत्र आले आहेत. चंद्राबाबू नायडू रालोआच्या सोबत नाहीत. जयललिता यांच्या पश्चात तामिळनाडूमध्ये अण्णाद्रमूकमध्ये गटातटाचे राजकारण सुरू आहे. राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगडमध्ये विधानसभा निवडणुकीत भाजपाचा पराभव झाला आहे. कर्नाटकमधील परिस्थिती भाजपासाठी आश्वासक नाही. त्यामुळे लोकसभा निवडणुकीनंतर भाजपाला पूर्ण बहुमत मिळेल, असे वाटत नाही.
 
मागील पाच वर्षांत कृषी उत्पन्नात घट झाली असून, शेतकर्‍यांच्या आत्महत्या वाढल्या आहेत. औद्योगिक उत्पादनही घसरले आहे. जीडीपी दरही घटला आहे. बेरोजगारी वाढली आहे. शासनाचा अहवालच हे सांगत आहे, असे ते म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या माझ्यावर टीका करीत आहेत. त्यांचे माझ्यावर प्रेम आहे. माझ्यावर टीका केल्याने त्यांच्या पक्षाला फायदा होईल, असे त्यांना वाटत असेल. त्यामुळे ते कदाचित माझ्यावर बोलत असतील. पक्षाचा उमेदवार नसतानाही राज ठाकरे सध्या प्रचारसभा घेत आहेत. त्यामागे त्यांचा विशिष्ट हेतू आहे. त्यांच्या या प्रचारसभांचा तरुण मतदारांवर परिणाम होईल, असा दावाही यावेळी पवार यांनी केला.