‘शिवशाही’ चालकाच्या अरेरावीमुळे प्रवासी त्रस्त
   दिनांक :20-Apr-2019
 
 
पांढरकवडा: शिवशाही बसचे तिकीट सामान्य बसच्या तिकिटापेक्षा कितीतरी पटीने जास्त आहे. त्यामुळे या गाडीत बसणारा सामान्य ग्राहक गाडीतील वातानुकूलित यंत्रणा सुरू असावी, अशी माफक अपेक्षा करणारच. परंतु या गाडीतील चालक ही यंत्रणा सुरू ठेवण्यासाठी अतिरिक्त पैशांची अपेक्षा ठेऊन ऐन उन्हाळ्यात वातानुकूलित यंत्रणा बंद ठेवत आहे.
 
 
 
याबाबत वाहकाला तक्रार पुस्तिका मागितली असता वातानुकूलित यंत्रणा सुरू करतात, असा अनुभव काही प्रवाशांना आला आहे. याबाबत वाहक मोहोड याने तक्रार पुस्तिका देण्यास नकार दिला. या संदर्भात अमरावती डेपो मॅनेजर जयस्वाल यांना फोन करतो, परिवहन मंत्री रावते यांचेकडे तक्रार करतो, असे सांगितल्यावर चालकाने उद्धटपणाची वागणूक देत ग्राहकांच्या तक्रारीकडे पाहायला वेळ नाही असे सांगितले. तसेच शिवशाही गाडी मालक व त्यांची मैत्री असल्याचे चालकाने सांगत मुजोरी कायम ठेवली. त्यामुळे वातानुकूलित यंत्रणा सुरू नसल्यास ग्राहकाने खिडकीचे काच फोडल्यास, ती नुकसानभरपाई त्या वाहकाकडून महामंडळाने वसूल करावी. जीव गुदमरत असल्याने ग्राहकाने स्वतःचा जीव वाचविण्याकरिता केलेली ही कृती राहील, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
या प्रकरणाची तक्रार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करण्यात आली आहे. या निवेदनावर डॉ. राजेंद्र आत्राम, अजय दुम्मनवार, प्रसाद नावलेकर, जयंत बावणे, मोरेश्वर वातीले, दिलीप वाढई, दामोधर बाजोरिया, यशवंत काळे, बंडूभाऊ लवटे, सुनील धवने यांच्यासह अनेकांच्या स्वाक्षर्‍या आहेत.