राष्ट्रपती, पंतप्रधानांकडून श्रीलंकेतील हल्ल्याचा निषेध
   दिनांक :21-Apr-2019
नवी दिल्ली,
साखळी बॉम्बस्फोटांनी हादरलेल्या श्रीलंकेची राजधानी कोलंबोमधील मृतांची संख्या १९० च्या वर गेली असून ४०० हून अधिक जखमी आहेत. या भ्याड हल्ल्याचा जगभरातून निषेध होत आहे. भारताचे राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करून हल्ल्याचा निषेध नोंदवला असून या काळात भारत भक्कमपणे श्रीलंकेच्या पाठिशी असल्याचे म्हटले आहे.
 
 
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी ट्वीट करून हल्ल्याचा निषेध केला. "भारत श्रीलंकेतील दहशतवादी हल्ल्याचा कठोर शब्दांत निषेध करतो तसेच सरकार आणि जनतेच्या प्रती संवेदना व्यक्त करतो. निर्दोष लोकांना अशा बुद्धीहिनांकडून हिंसेद्वारे मारण्याला सभ्य समाजात कोणताही थारा नाही. आम्ही श्रीलंकेच्या सोबत पूर्ण ताकदीने उभे आहोत," असे राष्ट्रपतींनी ट्वीटमध्ये म्हटले आहे.
 
 
उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी म्हटले आहे की, "ईस्टर संडेच्या पवित्र दिवशी कोलंबोत झालेल्या स्फोटाचे बळी ठरलेले निरपराध लोक आणि नातेवाईकांच्या प्रती संवेदना व्यक्त करतो. या पवित्र दिवशी असल्या भयंकर हिंसने स्तब्ध झालो आहे."तसेच त्यांनी आणखी एका ट्वीटमध्ये म्हटले आहे की, "या दुर्घटनेतील जखमी लवकरात लवकर बरे व्हावे म्हणून प्रार्थना करतो. या दु:खद प्रसंगी ईश्वर जखमी आणि मृतांच्या कुटुंबीयांना धैर्य आणि धाडस देवो."
या बॉम्बहल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्वीट केले आहे. "श्रीलंकेत झालेल्या भयानक स्फोटांचा तीव्र निषेध. अशा घृणास्पद कृत्यांना आमच्या भूमीवर थारा नाही. भारत श्रीलंकेच्या लोकांसोबत मजबुतीने उभा आहे. हल्ल्याचा बळी ठरलेल्या लोकांच्या सोबत माझ्या सहवेदना असून जखमींसाठी मी प्रार्थना करतो."
 
 
 
दरम्यान, या भीषण हल्ल्यानंतर बचाव कार्याला वेग आला आहे. शहरात कर्फ्यू लागू करण्यात आला असून इंटरनेट सेवा खंडित करण्यात आली आहे.