श्रीलंकेत आठवा बॉम्बस्फोट, संचारबंदी लागू
   दिनांक :21-Apr-2019
- इंटरनेट सेवा स्थगित    

 
कोलंबो,
श्रीलंकेची राजधानी कोलंबो आज रविवारी तब्ब्ल आठ साखळी बॉम्बस्फोटांमुळे हादरली आहे. यातील तीन बॉम्बस्फोट हे चर्चमध्ये तर ३ बॉम्बस्फोट हे हॉटेलमध्ये झाल्याची माहिती मिळाली होती. मात्र त्यानंतर आता आणखी दोन बॉम्बस्फोट करण्यात आले आहेत. सातव्या बॉम्बस्फोटात दोन जणांचा मृत्यू झाला आहे.
श्रीलंकेत संध्याकाळी ६ वाजल्यापासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच कोलंबो येथे झालेल्या स्फोटांमुळे इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. ईस्टर संडेला झालेल्या या बॉम्बस्फोटात आतापर्यंत १५६ जणांचा मृत्यू झाला असून ४०० हून अधिक जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
 
 
मिळालेल्या माहितीनुसार, कोलंबोमधील शँग्रिला आणि सिंनामोन ग्रँड हॉटेलमध्ये तसेच कोलंबो बंदराजवळील सेंट अँथनी चर्च, कोच्चिकेडे चर्च, उत्तलम जवळील सॅबेस्टिअन चर्च या तीन चर्चमध्ये स्फोट झाल्याची माहिती मिळत आहे. स्थानिक वेळेनुसार सकाळी ८.४५ वाजण्याचा सुमारास हे स्फोट झाले. या स्फोटांमध्ये किती नुकसान झाले याबाबत माहिती गोळा करण्याचे काम सुरू असल्याचे स्थानिक प्रशासनाचे म्हणणे आहे.
 
 
ईस्टर संडे असल्याने चर्चमध्ये मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. या बॉम्बस्फोटात आतापर्यंत 156 जणांचा मृत्यू झाला 400 हून अधिक जण जखमी झाले आहेत. जखमींवर उपचार सुरू असून अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जखमी आणि मृतांमध्ये विदेशी पर्यटकांचाही समावेश अधिक असून 35 जणांचा मृत्यू झाला आहे. बॉम्बस्फोटाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे. या स्फोटाची जबाबदारी अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने स्वीकारलेली नाही.
 
 
भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी कोलंबोतील बॉम्बस्फोटांच्या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. 'कोलंबो येथील भारतीय उच्चायुक्तांच्या संपर्कात आहोत. तेथील परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे' असं ट्वीट सुषमा स्वराज यांनी केलं आहे.
 
 
 
श्रीलंकेत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटाच्या वृत्तामुळे भारतीय चिंतेत आहेत. श्रीलंकेतील कोलंबो शहरात राहणाऱ्या भारतीय नागरिक, तसेच भारतीय वंशाच्या लोकांची संख्या मोठी आहे. आतापर्यंत या स्फोटात कोणत्याही भारतीयाला दुखापत झाल्याचे वृत्त नाही. या पार्श्वभूमीवर आपण कोलंबोतील भारतीय दूतावासाशी सतत संपर्क ठेवून आहोत असे परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी म्हटले आहे.