बीसीसीआयने केली गांगुलीची पाठराखण
   दिनांक :21-Apr-2019
नवी दिल्ली,
 बीसीसीआयचे लोकपाल निवृत्त न्या. डी. के. जैन यांनी सौरव गांगुली यांच्याविरुद्ध हितसंबंधावरुन तक्रार केलेल्या तिनही तक्रारदारांना आपले म्हणणे लिखित स्वरुपात देण्यास सांगितले आहे. या प्रकरणी बीसीसीआयने भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीची बाजू घेतली आहे.
 
 
बंगालचे भास्वती शांतुआ, अभिजीत मुखर्जी व रंजीत सिल यांनी गांगुलीवर बंगाल क्रिकेट असोसिएशन (कॅब) व आयपीएलमधील दिल्ली कॅपिटल्सचा सल्लागार ही दोन्ही पदे घेतल्यामुळे हितसंबंधात बाधा येत असल्याची तक्रार केली आहे. बीसीसीआयने म्हटले आहे की, ‘या बाबत पूर्ण खुलासा केल्यानंतर हा मुद्दा सुटण्यास मदत होईल.’ गांगुलीने खुलासा केल्यानंतर त्याच्यावर कोणताही दंड होऊ नये अशीच बीसीसीआयच्या प्रशासकीय समितीला वाटते. मंडळाच्या एका ज्येष्ठ अधिकाऱ्याने म्हटले की, ‘गांगुली बीसीसीआयच्या सल्लागार समितीवर आहे. या समितीची बैठक चार वर्षात दोनदाच झाली आहे. अशा स्थितीत व्यावसायिक खेळाडू म्हणून त्यांना अन्यत्र कार्य करण्यास कसे काय रोखू शकतो. या प्रकरणी लोकपालच निर्णय देतील.’
गांगुलीने सल्लागार समितीचा राजीनामा दिल्यास सचिन तेंडुलकर (मुंबई इंडियन्स) व व्हिव्हिएस लक्ष्मण (सनराजयर्स हैदराबाद) यांनाही आपले पद सोडावे लागेल. गांगुलीने म्हटले, ‘दिल्ली संघाचा सल्लागार म्हणून मी एक पैसाही घेत नाही. मी हे काम स्वत:च्या इच्छेने करत आहे.’ लोकपालने उच्च न्यायालयाचे वरिष्ठ वकिल बिश्वनाथ चॅटजी व तक्रारदार रंजित सील यांच्याशी साडेतीन तास चर्चा केली.