मोदींविरोधात विनोद कुणाल कामरला भोवला !
   दिनांक :21-Apr-2019
 
 
मोदींवर टीका करताना मॉर्फ फोटोचा वापर केल्याचा बीएसई चा आरोप 
 
 
सोशल मीडियावर स्टँडअप कॉमेडियन म्हणून प्रसिद्धी पावलेला कुणाल कामरा सध्या अडचणीत सापडलेला आहे. मुंबईतील फिरोज जीजीभॉय टॉवर्सचा मॉर्फ केलेला फोटो मोदींविरोधात प्रचार करण्यासाठी वापरल्याने बॉम्बे स्टॉक एक्सचेंजने स्टँडअप कॉमेडियन कुणाल कामराला खडसावले आहे. बीएसईच्या इमारतीचा फोटो चुकीच्या पद्धतीने वापरल्याने त्याच्याविरोधात कारवाई करणार असल्याचेही त्यांनी ट्विटरवर स्पष्ट केले आहे. 
 

 
 
 
कुणाल कामरा पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात प्रचार करत आहे. १४ एप्रिल रोजी त्याने चार वेगवेगळे फोटो शेअर करत हे ‘हे फोटो म्हणजे मोदींनी दिलेली आश्वासनं,’ अशी उपरोधिक टिप्पणी केली. त्यातच एक बीएसईच्या इमारतीचाही फोटो आहे. यावर आक्षेप घेत बीएसईने ट्विट केले, ‘एका राजकीय पक्षाविरोधात बीएसई इमारतीचा मॉर्फ केलेला फोटो कुणाल कामराने वापरला आहे. अशा कृतीसाठी इमारतीचा मॉर्फ केलेला फोटो वापरणे बेकायदेशीर आहे. कुणाल कामराविरोधात योग्य ती कारवाई करण्यासाठी बीएसईकडे अधिकार आहेत.’
 
 
 
कुणाल कामराने बीएसईच्या या ट्विटला प्रत्युत्तर दिले. ‘हा निव्वळ विनोद आहे. विनोदाचा सेन्सेक्स बऱ्याच अंकांनी घसरला आहे. बरं जेलमध्ये वायफाय सुविधा असते का?,’ असा प्रतिप्रश्नसुद्धा त्याने विचारला आहे.