निवडणूक आणि मतदान केंद्रावरील फेरफटका
   दिनांक :21-Apr-2019
लोकसभेची निवडणूक जाहीर झाल्यापासून देशात सर्वत्र चर्चेला उधाण आले. तज्ज्ञांचा 2014 आणि 2019 च्या निवडणुकांचा तुलनात्मक अभ्यास सुरू झाला. 11 एप्रिल ते 19 में 2019 पर्यंत 7 टप्प्यांमध्ये घेण्यात येणार्‍या या सार्वत्रिक निवडणुकीत आपल्यालाच विजय कसा मिळेल, याचा अभ्यास करीत काही प्रमुख पक्षांनी गठबंधनासह विरोधात राहून एकमेकांच्या उखाळ्या-पाखाळ्या काढीत इलेक्ट्रॉनिक मीडियासमोर ‘ताल ठोक के’ आणि ‘दंगल’च्या माध्यमातून खुल्या चर्चेतून राजकीय नेत्यांमध्ये मैदानी फड िंजकण्याची जणू स्पर्धाच सुरू झाली. आपली श्रेष्ठता सिद्ध करण्यासाठी ‘निवडणूक सर्वेक्षणाद्वारे’ जनमानसात धाक जमवण्यासाठी वेगवेगळ्या चॅनल्समध्ये काट्याची शर्यत सुरू झाली. निवडणूक आयोगाने उत्तम उपाय योजनेसह काही कडक निर्बंध घालीत सार्वत्रिक निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर करताच सर्वच पक्षांचे धाबे दणाणले. ते सोईचे मार्ग शोधायला लागलेत. कडक उन्हात होणार्‍या मतदानात महिला मतदारांना मुलांना घेऊन रांगेत उभे राहण्याचा त्रास होऊ नये म्हणून त्यांच्यासाठी आयोगाने ‘पाळणाघराची’ सोय केली आहे, ही माहिती कौतुकास्पदच आहे. निवडणुकीविषयीची अशी चविष्ट आणि प्रदीर्घ चर्चा रोजच्या रोज ऐकताना असे वाटायचे की सर्व जगाचे लक्ष वेधून घेणार्‍या आणि सर्वांनाच कुतूहल वाटणार्‍या एवढ्या मोठ्या निवडणुकीचा शुभारंभ केंव्हा एकदाचा होतो ते!
 
 
 
- आणि तो दिवस उगवला. शेवटी गुरुवार, 11 एप्रिल 2019 ला 91 मतदारसंघासह निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याला सुरुवात झाली. विदर्भातील 7 मतदारसंघासाठी लोक भर उन्हात मतदान करण्यासाठी एकदाचे बाहेर पडले...
मतदान केंद्रावर आपण केलेल्या मतदानाची सत्यता पडताळून पाहण्याची संधी उपलब्ध करून देऊन व्हीव्ही पॅटने खोटी तक्रार करणार्‍याला चांगला धडा शिकवला आहे. मतदान करून बाहेर चौफेर फेरफटका मारताना राजकीय पक्षांचे बुथही लॅपटॉप घेऊन डिजिटल झाल्याचे जाणवले. आजूबाजूला फेरफटका मारत काही चेहर्‍यांचे निरीक्षण करताना असे वाटले की,
मतदानाचा काळ हा राजकीय नेत्यांसाठी एक ऋतुबदलंच असतो. कुठे पानगळीचा शिशिर तर कुठे सृष्टीला सजीव करणारा फुललेला वसंत असतो. तसे पाहता लोकांसाठी दोन्ही ऋतूंचा पेहराव आणि वागण्यातील वैचित्र्य ही बाब दर्शनी जरी परस्पर विरोधी भासत असली तरी दोघांची मैत्री मात्र दखल घेण्यासारखी असते. शिशिराच्या पदरात संचिताचे दान टाकून त्याची ओटी भरणारा वसंतासारखा ऋतू वेगळाच! वसंतातील हिरवे झुंबर निष्पर्ण शिशिराचे सांत्वन करण्यास पुरेसे असते. हाच ऋतुगंध बुथवरील फेरफटका मारताना मला जाणवला. काही बूथवर वसंतासारखी लठ्ठ गर्दी तर काही बुथवर फक्त शिशिरातले पानगळीचे दर्दी असेच चित्र होते. एक मात्र खरे की प्रस्थान कुठूनही असो; पण गंतव्य स्थळ मात्र एकच असते. टिकाऊ आणि टाकाऊ, तसेच द्रष्टा, निष्ठा आणि प्रतिष्ठा यांचे योग्य मूल्यांकन करून व्यक्तीला नवे संदर्भ बहाल करणारा जनशक्तीचा ऋतोत्सव म्हणजे ही ‘सार्वत्रिक निवडणूक!’ जगातील प्रचंड मोठ्या लोकशाहीचा हा शक्तीयज्ञ आहे, असे माझे प्रांजळ मत आहे.
म्हणून तळपत्या उन्हातही हक्काच्या सावलीच्या छत्रीत येऊन प्रत्येक नागरिकाने आपला मतदानाचा हक्क बजावावा आणि विकासोन्मुख कार्यासाठी संकल्पित असलेल्या योग्य उमेदवाराच्या तोंडून ‘वसंत फुलला दारी’ असे सुंदर वाक्य ऐकावयास मिळावे, हीच अपेक्षा!
लोकशाही आणि लोकशक्तिचा विजय असो! मेरा भारत महान!
 
अरुण देशपांडे
महाल, नागपूर