चौघी जणी
   दिनांक :21-Apr-2019
कथा
नयन आज बरेच दिवसांनी माहेरी जायला निघाली होती कारण काल तिच्या बालमैत्रिणीचा प्रियलचा अचानक फोन आला होता की- सर्व बालमैत्रिणी यावर्षी मंगळागौरी निमित्त माहेरी येणार आहेत. सर्व मैत्रिणीं मिळून धमाल मजा करायची आहे. नयनचे गाव यायला अजून बराच अवकाश होता. परंतु तिचं मनपाखरू कधीच माहेरच्या सुखाच्या अंगणात जाऊन विसावलं होतं. तिच्या डोळ्यासमोर आली प्रियल. ती छान गाणं म्हणायची. स्वातीचा नक्कल करण्यात हात धरणारा कुणी नव्हता. अंकिताला शास्त्रीय नृत्याची फार आवड होती. नृत्य करताना ती आपलं देहभान हरपून जायची. सर नेहमी तिची प्रशंसा करायचे, म्हणायचे- कॉलेजमध्ये तू प्रथम यायला हवी. आम्हाला तुझ्याकडून फार अपेक्षा आहे. दिसायला सुुंदर असणार्‍या नयनने पण खूप अभ्यास करून बीकॉमच्या शेवटच्या वर्षाला कॉलेजमध्ये प्रथम येण्याचा बहुमान मिळवला. फॅन्सी ड्रेस स्पर्धेत तिचा पहिला नंबर आला तेव्हा तिच्या मैत्रिणींनी स्टेज डोक्यावर घेतलं.
 
 
 
कुठेही जायचं असलं की- त्या चौघीजणी मिळून जायच्या. एकमेकींशिवाय त्यांना चैनच पडायचं नाही. प्रियलचा फोन आल्यापासून नयनला तर कधी एकदा मैत्रिणींना भेटतो, असं झालं होतं. घरट्यातील चिमणी पाखरं जशी मोठी झाली की दूर जातात तश्या मैत्रिणी त्यांची लग्ने झाल्यामुळे दूर वेगवेगळ्या शहरांमध्ये गेल्या होत्या. बरेच दिवसांत त्यांच्या भेटीगाठी झाल्या नव्हत्या. प्रियलला मात्र गावातलंच स्थळ मिळालं होतं. तिच्या मिस्टरांचा त्याच गावात कपड्यांचा व्यापार होता. स्वाती मुंबइर्‌रला असायची तर अंकिता पुण्याला रहायची.
 
प्रियलचा फोन आल्यावर नयनने जयंताला विचारले की माझ्या सर्व बालमैत्रिणी यावेळेस येणार आहेत. मी माहेरी जाते तुम्ही पण सोबत चलता का? जयंत म्हणाला- तुला मैत्रिणी भेटल्यावर नवरा नावाचा प्राणी सोबत आहे हे तरी आठवते का? असं म्हटल्यावर एरवी नयनने जयंतशी वाद घातला असता, तुझे मित्र भेटल्यावर तू काय करतोस वगेैरे पण आज ती जाम खूष होती फक्त गालातल्या गालात हसली. मैत्रिणीचा फोन आल्यापासून बघतोय्‌- तू एकदम स्वप्नातल्या दुनियेत असल्यासारखी खूश दिसतेस. यावेळेस तू एकटीच जाऊन ये. तुमच्या मैत्रिणीत माझा अडथडा कशाला ?
 
नयन कॉलेजमध्ये असताना कविता छान लिहायची. कॉलेजच्या मासिकात तिच्या कविता नेहमी छापून यायच्या. मराठी शेर शायरीपण ती करायची. लहानपणापासून तिला याची आवड होती. लग्न झाल्यावर तर तिला कविता लिहिण्याचा छंदच लागला होता. नयनच्या एका कवितासंग्रहाचा प्रकाशनसोहळा नुकताच पार पडला होता. तिला तिचा कवितासंग्रह मैत्रिणींना दाखवायचा होता. त्यासाठी तिने आठ- दहा कवितासंगहाची पुस्तके आपल्यासोबत घेतली व एका पिशवीत छान बांधून टाकली व ती पिशवी सुटकेसमध्ये वर ठेवून दिली. लासलगांव स्टेशन जवळ आलं, तसे तिने परत एकदा आपण कवितेची पुस्तके व्यवस्थित ठेवली की नाही, त्याची खात्री केली व नाशिकरोड स्टेशन जवळ आले, म्हणून तिने घाईघाईने सुटकेसची चेन लावली पण त्याला लॉक मात्र केले नाही. तिला वाटले सुटकेस काय आता आपल्याजवळच राहणार आहे. ती नाशिकरोड स्टेशनवर लगबगीने खाली उतरली व नाशिकला जाणार्‍या बसमध्ये चढली. बसच्या मागच्या दरवाज्यासमोरची सीट रिकामी होती, म्हणून ती तेथे बसली. तिकडून कंडक्टर आला म्हणाला- इथे रस्त्यात बॅगा कोणी ठेवल्या? चला मागे ठेवा. असं म्हणून येणार्‍या जाणार्‍या प्रवाशांंना अडचण होऊ नये म्हणून सर्वांच्या बॅगा कंडक्टरने मागे केल्या, त्यात नयनची पण सुटकेस होती. एकदम शेवटच्या सिटजवळ जिथे सहा माणसं बसतात, तिथे बॅग सरकवून ठेवली. तिथे फुटबॉलची टीम बसली होती मोठमोठ्यानी हसणे, खिदळणे त्यांचे चालू होते. बॅगच्या पुढे माणसं उभी असल्यामुळे तिला तिची सुटकेस अजिबात दिसत नव्हती. आपली सुटकेस घेऊन कुणी उतरू नये म्हणून नयन दरवाज्याकडें सतत लक्ष ठेवून होती. मुलांचा बसस्टॉंप आला तशी 12-13 मुलांची टीम खाली उतरली. त्यानंतर पुढच्या बसस्टॉपवर नयन तिची सुटकेस व बॅग घेऊन खाली उतरली.
 
आईला व मैत्रिणींंना कधी भेटते, असे तिला वाटत होते. बसस्टॉपपासून घर थोडं लांब असल्यामुळे तिने ऑटोरिक्षा केला. घरी आई स्वयंपाक करून वाटच बघत होती. नयन फ्रेश झाली व लगेच जेवायला बसली. जेवतांना आईशी इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या घाईघाईने जेवण केलं. आई म्हणाली देखील- वाघ पाठीमागे लागल्यासारखी काय जेवण करून राहिली आहेस? आज मी सर्व पदार्थ तुझ्या आवडीचे केले आहेत. निट सावकाश जेव बघू. परंतु तिचं जेवणाकडे लक्षच नव्हतं. प्रियलला कवितासंग्रह द्यायला म्हणून नयनने सुटकेस उघडली तर त्यात कवितासंग्रहाची पुस्तके ठेवली होती ती पिशवी त्यात दिसली नाही. मग नयनने संपूर्ण सुटकेस रिकामी केली पण पुस्तके काही मिळाली नाही. दुसरी बॅग पण उघडली. पूर्ण बँग रिकामी केली पण त्यात पण कवितासंग्रहाची पुस्तके नव्हती. तिला आश्चर्याचा धक्काच बसला, कस कसं झालं? नाशिकरोड रेल्वे स्टेशन यायच्या आधी बॅग उघडून बघितली तेव्हा तर त्यात पुस्तकांची पिशवी होती.
 
नयन आईला म्हणाली-आई, माझी पुस्तके नक्की बसमधल्या कोणीतरी मारली. कारण मी जेव्हा नाशिकला येण्यासाठी बसमध्ये बसले, तेव्हा माझी सुटकेस कंडक्टरने एकदम मागे ठेवली व मला ती दिसत नव्हती. नंबरनी लॉक होणारी सुटकेस होती. घाईघाईत सुटकेसला लॉक करायला विसरले. पुस्तके कोणी कशाला मारील? निट बघ, तूच खालीवर कुठे ठेवली असशील. आई, मी तीन तीन वेळा सुटकेस चेक केली. दुसरी बॅग पण चेक केली पण त्यात पुस्तकांची पिशवी दिसली नाही. मी पिशवीत ती पुस्तके व्यवस्थित बांधून एकावर एक ठेवली होती. आई, मी आता मैत्रिणींंना काय दाखवू?
 
नयन तर सकाळच्याच गाडीने येणार होती मग अजूनपर्यत कशी आली नाही भेटीसाठी ? प्रियल स्व:तच नयनकडे आली. म्हणाली- हे काय नयन, तू आम्हाला भेटायला येणार होतीस ना? आम्ही किती वेळची तुझी वाट बघत आहोत. अंकिता व स्वातीपण नयनला भेटायला आल्या. तेव्हा नयनने त्यांना पुस्तक चोरीचा किस्सा सांगितला व म्हणाली- सांग मग, कोणत्या तोंडाने तुझ्याघरी येणार होती. नयनकडून पुस्तक चोरीचा किस्सा ऐकल्यावर सर्व मैत्रिणी फिदी फिदी हसायलाच लागल्या. म्हणाल्या- कोण आहे तो भाग्यवान, ज्याने आमच्यापण आधी तुझा काव्यसंग्रह घेतला? आम्हाला तर त्याच्या भाग्याचा हेवाच वाटतोे. नयन म्हणाली- माझी पुस्तके चोरीला गेली अन्‌ तुम्हाला हसायला येतंय्‌? अगं नशीब, त्या चोराने फक्त तुझी पुस्तकेच चोरली तुला नाही चोरलं, नाहीतर आमच्या जिजाजींचं कसं झालं असतं? अगं, पुस्तक चोरीला गेली ते बरंच झालं की तुझी प्रसिद्धी आता दूरवर होईल.
 
अगं तुम्हाला माझा कविता संग्रह देता आला नाही याच मला खूप वाईट वाटतं गं. मैत्रिणी म्हणाल्या- काळजी करू नकोस. अगं घरी गेल्यावर पोस्टाने पाठव की आम्हाला तुझा कवितासंग्रह. ते खरं आहे गं. तुमच्याकडून माझ्या कवितांसंग्रहावर आता चर्चा झाली असती तर मला नवं बळ मिळालं असतं. माझ्यासाठी एक उत्साह असता तो. बरोबर आहे. आम्ही समजू शकतो तुझ्या भावना. पण आज तुझ्या कवितासंग्रहावर चर्चा ही होणेच नव्हती. आज आपल्या कॉलेजच्या दिवसांवर, आपल्या जुन्या गमतीजमतीवर चर्चा होणार होती. म्हणून तर तुझे पुस्तकं चोरीला गेले असं समज. तिला हे वाक्य ऐकून खूप बरं वाटलं.
 
 •शालिनी बबनराव कुकडे
9850990334
••