घरटं
   दिनांक :21-Apr-2019
‘‘बाबुजी, माझ्याकडे काहीच नाही. फक्त ही झोपडी आहे. ही मी माझ्या घामाच्या कमाईतून बांधलेली आहे. माझ्या बापानं माझ्यासाठी काहीच ठेवलं नव्हतं. माझं शिक्षण अर्धवट झालेलं. लहानपणापासून पडेल ती कामं केली. भाजी विकली, उदबत्त्या विकल्या, हमाली केली, उसाचा रस विकायचो. माझा बाप घरी देवपूजा सांगायला जायचा. लोकांसाठी उपवास आणि जप वगैरे करायचा. लोक दक्षिणा द्यायला मागे-पुढे बघायचे, ‘‘हे लोक हरामाचं खातात,’’ म्हणायचे. मला ते आवडेना. मग मी कष्ट करून जगायचं ठरवलं. स्वाभिमान विकला नाही. माझी बायको कमी शिकलेली. तीही लहान-मोठी कामं करायची. आयुष्यात कधी व्यसन केलं नाही. कुणाशी भांडणतंटा केला नाही. कधी प्रामाणिकपणा सोडला नाही. एका इमारतीच्या जिन्याखालच्या दोन अगदी लहान खोल्यांमध्ये संसार थाटला. चहाचा खर्च परवडण्यासारखा नव्हता. दूध बाळासाठीच असायचं. मी माझ्या कमाईत घर चालवायचो. ती रुपया-दोन रुपये, कधी दहा-वीस रुपये शिल्लक टाकायची. पाच वर्षांआधी हा पाचशे स्क्वेअर फुटाचा प्लॉट घेतला आणि हळूहळू झोपडं उभं केलं.’’ हरिहरच्या डोळ्यांत पाणी दाटलं. त्याचे वडील शिव आणि विष्णू या दोन्ही दैवतांना पूजायचे म्हणून त्यांनी याचं नाव ‘हरिहर’ ठेवलं असावं. बोलताना हरी मोठ्या कौतुकानं त्या लहानशा जमिनीच्या तुकड्याकडे आणि विटांच्या िंभतीकडे, तर कधी अर्धवट गंजलेल्या पत्र्याच्या छताकडे बघत असे.
 
 
 
‘‘चंदू सेठनं आम्हाला जिन्याखालचं घर सोडायला सांगितलं, तो आमच्या आयुष्यातला सगळ्यात वाईट दिवस होता.’’ हरी पुढे बोलू लागला. ‘‘जुलै महिना. दुपारची वेळ. सायकलीवर भांड्यांची तीन पोती आणि सायकलरिक्षात अंथरूण, बादल्या वगैरे टाकून आम्ही निघालो. गावाबाहेर एक पडकं घर होतं. मागच्या बाजूला चिंचेचं झाड, दाट सावली देणारं, आम्ही तेथेच निवारा शोधला. तिनं भात शिजवला. तीन दगडांची चूल. काटक्या, कागद गोळा करून चूल पेटवली होती. मीठ कालवून एक वर्षाच्या बळाला खाऊ घातला. मी तसाच मैदानात लवंडलो अन्‌ झोपलो. रात्री जोरात पाऊस आला. मिट्ट काळोख. काही भांडी वाहून गेली, हे पहाटे कळलं. मी बायकोची समजूत काढली. म्हणालो- अगं ती पाखरं बघ... पावसाळ्यात त्यांचीही घरटी वाहून जातात. ती रडतात का? पुन्हा काड्या गोळा करतात आणि पुन्हा घरटी बांधतात. आपणही तसंच का नाही करायचं?
 
असेच दिवसामागून दिवस गेले. ओसाड पडलेल्या गोदामात काही दिवस काढले. मोमिनपुर्‍यात एका माणसानं त्याची झोपडी दोनशे रुपये भाड्याने दिली. खूप कामे करून प्रसंगी एक वेळ जेवण करून राहिलो. या दोन खोल्यांमध्ये आमचा स्वर्ग आहे. घराची प्रत्येक वीट आमच्या जीवनातल्या संघर्षाची कहाणी सांगते.’’
 
हरी अगदी मनापासून बोलला. आपलं घर- ते लहान असो अथवा मोठं- त्यात आपले प्राण अडकलेले असतात. आईची िंकमत त्यांनाच कळते, ज्यांना आई नसते, अशा अर्थाचं एक गाणं आहे. घराच्या बाबतीत ते खरं आहे. चार िंभतीच्या आत आपलं एक जग असतं. ज्यांच्याजवळ घर नसतं त्यांना त्याची िंकमत अधिक असते. ‘घर असावे घरासारखे, नकोत नुसत्या िंभती...’ हे गाणंसुद्धा बहुतेकांना माहीत आहे. मुळात िंभतीतरी असायला हव्यात ना?
 
घरात प्रेम, आनंद, स्नेह, उत्साह, आपुलकी इ. असावं, असं सांगावं लागतं. घरट्याचं तसं नाही. घरट्यात या सगळ्या गोष्टी असतातच. हरिहरचं घर हे घर नसून ते घरटं आहे, असं मला नेहमी वाटतं. त्याने ते त्याच्या कष्टातून साकारलंय! पक्षी काड्या गोळा करून मोठ्या कलात्मकतेने त्यांचं घरटं सजवतात. तसं ते हरीलाही सजवायचं आहे. एका लहानशा कुटुंबाला आपला स्वत:चा निवारा हवा असतो. हरी आणि त्याच्या पत्नीने एक एक वीट जमवून तो उभारला. ‘घर देता का घर...’ असा टाहो फोडणारा गणपतराव बेलवलकर या क्षणी आठवतो. तुम्ही एकेकाळचे अभिनयाचे सम्राट असाल िंकवा अजून कशाचेही सम्राट असाल, परंतु तुमच्या घरट्यातून तुम्ही हद्दपार झालात, की त्यासारखं दु:ख नाही. कुणातरी समीक्षकाने ‘नटसम्राट’ आणि ‘किंग लिअर’ची तुलना करताना असं लिहिलय की, ‘‘लिअर हा एका देशाचा स्वामी होता- गणपतराव एका सिमेंट आणि विटांच्या घराचा स्वामी होता. दोघांचं दु:ख एकसारखं आहे, असं म्हणता येणार नाही.’’
 
लिअरचं सबंध राज्यच रक्ताच्या नात्यांनी बेईमान झाल्याने त्याच्या हातून निघून गेलं. मला वाटतं, हे दु:खाचं मूळ कारण नाही. विश्वासघाताने मनाला बसलेला धक्का माणसे पचवू शकत नाहीत. निवारा पुन्हा उभारता येतो. घरटं पुन्हा बांधता येतं! जन्माला आल्यापासून मोठ्या मायेने केलेलं संगोपन, लळा, जिव्हाळा, प्रेम या भावनांना गेलेले तडे बुजवता येत नाहीत. घर असो, महाल असो की खोपटं असो, ते आपल्या हातून गेलय, हे दु:खद आहे. घरटं हे प्रतीक आहे कर्तव्याचं, त्यागाचं, समर्पणाचं, प्रेमाचं, आपल्या माणसांसाठी कष्टाने उभारलेल्या निवार्‍याचं; ते उद्ध्वस्त झाल्यावर माणूस आतून उद्ध्वस्त होतो.
 
ज्या घरट्यात शांतता आणि पावित्र्य असतं तिथे ईश्वर नांदतो. ज्या घरात कलहप्रिय लोक राहतात ते घर स्वत:च उद्ध्वस्त करीत असतात. त्याचं घरपण केव्हाच हरवलेलं असतं. अभ्यास करणारी, शिकणारी, आई-वडिलांचा भार उचलणारी मुलं त्या घरट्याचं घरात रूपांतर करतात. आजी-आजोबा, नातेवाईक आणि सज्जन माणसांच्या राहण्याने घराचा निवास होतो. लहान मुलांच्या खेळण्या-बागडण्याने त्याचे गोकुळ होते आणि धन-धान्य, पुत्र-पौत्र, पाळीव प्राणी यांच्या वास्तव्याने त्याचं नंदनवन होतं. पक्ष्यांंना, प्राण्यांना आणि माणसांनाही निवारा हवा असतो, हेतर खरं आहे. त्या निवार्‍याचं रूपांतर जर अन्य कशातही व्हायला हवं असेल, तर तिथे समाधान असणं अत्यंत महत्त्वाचं आहे. ‘राजास जी महाली, सौख्ये कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या...’ असं राष्ट्रसंत म्हणतात ते यासाठीच!
रमेश जलतारे
9561595095