... तर, ती आपले रक्षण करेल!
   दिनांक :21-Apr-2019
 
 आज जागतिक वसुंधरा दिन
नागपूर: पृथ्वीचे वैशिष्ट्य म्हणजे यावरील जीवसृष्टी आणि जीवनाचा आधार असलेले पाणी हे होय. अन्न, वस्त्र आणि निवारा देणार्‍या पृथ्वीचे संतुलन कायम ठेऊन तिच्यावरील जीवसृष्टी जिवंत ठेवण्यासाठी 22 एप्रिल हा दिवस ‘जागतिक वसुंधरा दिन’ म्हणून जगभर साजरा केला जातो. वसुंधरेच्या घटकांचे आपण संरक्षण केले, तरच, ती आपले रक्षण करेल, हे नक्की!
अमेरिकेचे गेलॉर्ड नेल्सन हे वसुंधरा दिनाचे जनक आहेत. त्यांनी अमेरिकेतील दोन कोटींपेक्षा जास्त लोकांमध्ये पर्यावरणाच्या समस्यांबाबत जागृती केली. हवा, पाणी, वने आणि वन्यजीव, निसर्ग यांच्या संरक्षणासाठी तेथे मोठा राजकीय दबाव निर्माण झाला. त्यानंतर 1970मध्ये सर्वप्रथम अमेरिकेतील सॅनफ्रॅन्सिस्को येथे ‘अर्थ डे’ साजरा करण्याचे ठरले. तेव्हापासून 22 एप्रिल हा दिवस जागतिक वसुंधरा दिन म्हणून साजरा केला जातो.
 
 

 
 
 
सध्या पृथ्वीचे तापमान वाढत चालले असून, समतोल ढासळतो आहे. हे तापमान असेच वाढत राहिले तर, भविष्यात जीवसृष्टी नष्ट होण्याचा धोका असल्याचे मानले जाते. त्यामुळे आपले पर्यावरण वाचवण्याची गरज आज निर्माण झाली आहे.
वृक्षारोपण, पर्यावरण संरक्षण हे यासाठीच महत्त्वाचे आहे. आपल्या वसुंधरेला वाळवंट होण्यापासून वाचवायचे असेल, तर आतापासूनच पर्यावरण संरक्षण करणे आवश्यक आहे. प्रदूषण कमी करण्याची गरज आहे. जंगलतोड कमी करणे, अधिक झाडे लावणे, टाकाऊ वस्तूंवर पुनर्प्रक्रिया करून त्यांचा पुनर्वापर करणे, कार्बन उत्सर्जनात कपात करणे, घरांच्या छपरांवर सौर पॅनेल्स उभारणे आदी गोष्टी आपण करू शकतो. यामुळे जागतिक तापमानवाढ कमी होण्यास मदत होईल. प्रत्येक दिवस हा वसुंधरा दिनच असतो, हे लक्षात ठेवले म्हणजे झाले!
मातीपासून दुरावलेला माणूस शहरीकरणाचा वाढत्या रेट्यामुळे गोंधळात सापडला आहे. अनेक पर्यावरणप्रेमी यावर मात करण्याचा प्रयत्न करीत आहेत. काही ठिकाणी त्यांना बळही मिळाले आहे. याचे उदाहरण आपण प्लॅस्टिकबंदीच्या संदर्भात बघू शकतो. दरम्यानच्या काळात, अनेक संस्थांनी नागरिकांच्या सोयीसाठी कापडी पिशव्यांचे मोफत वाटप करण्याची मोहीम हाती घेतली होती, हे येथे उल्लेखनीय.
शाळांमधूनही जागरूकता वाढवायची असेल, तर निसर्गशिक्षणावर भर देता येईल. ते रंजक असेल, तर मुलेही लवकर शिकतील. आधुनिक मानसशास्त्रानुसार, हसत-खेळत लवकर शिकता येते आणि हे शिक्षण मनात खोल रुजतेही... अगदी झाडांच्या मुळाप्रमाणे!
माणसाची प्रत्येक गरज पृथ्वी पूर्ण करू शकते, मात्र, त्याची हाव पूर्ण करू शकत नाही, अशा अर्थाचे महात्मा गांधींचे एक वचन आहे. या पृष्ठभूमीवर, आपल्या पृथ्वीचे संरक्षण करणे ही प्रत्येकाचीच जबाबदारी असून, या जबाबदारीचे स्मरण आपण स्वत:लाच करून देऊ या!