‘मेंटल है क्या’ वाद; कंगना राणौतच्या वतीने बहिण मैदानात
   दिनांक :21-Apr-2019
बॉलिवूड अभिनेत्री कंगना राणौत आणि राजकुमार राव स्टारर ‘मेंटल है क्या’ प्रदर्शनापूवीच वादात सापडला आहे. चित्रपटाचे नवे पोस्टर्स रिलीज झाल्यानंतर इंडियन मेडिकल असोसिएशन आणि इंडियन साइकेट्रिक सोसायटीने ‘मेंटल है क्या’ या टायटलवर आणि चित्रपटाच्या पोस्टर्सवर तीव्र आक्षेप नोंदवत, सेन्सॉर बोर्ड, माहिती व प्रसारण मंत्रालय, पीएमओ अशा सगळ्यांना पत्र लिहिले आहे. केवळ इतकेच नाही तर दीपिका पादुकोणच्या ‘द लिव्ह लाफ फाऊंडेशन’नेही या चित्रपटाच्या मेकर्सवर टीका करत, आपल्या जबाबदारीचे भान ठेवा, असे म्हटले आहे. आता या सगळ्या वादावर नेहमीप्रमाणे कंगनाच्या वतीने तिची बहीण रंगोली मैदानात उतरली आहे.
 
 
‘कंगनाच्या परवानगीने मी तिची कहाणी जगासमोर मांडतेय. दोन वर्षांपूर्वी तिच्या ‘एक्स’ने (हृतिक रोशन) आपल्या संपूर्ण नेटोटिज्म गँगसोबत मिळून तिच्यावर हल्ला चढवला. तिला मेंटल, उलट्या पायाची असे काय काय म्हटले. तिच्यावर अनेक जोक्स आणि मीम्स बनवले गेलेत. वेगवेगळ्या मार्गांनी तिचा अपमान केला गेला. पण कंगनाने या सगळ्यांविरोधात लढण्याचा निर्णय घेतला. ‘मेंटल है क्या’ हा चित्रपट पूर्वग्रहदूषित लोकांविरोधातील ती कहाणी आहे, जी कंगना दोन वर्षांपासून जगतेय, ’असे रंगोलीने आपल्या ट्वीटटर अकाऊंट म्हटले आहे. ‘मेंटल है क्या’ प्रदर्शित झाल्यानंतर सर्वांना कंगनाचा अभिमान वाटेल. तिने हा विषय निवडला, याबद्दल तिचे कौतुक होईल. या निषिद्ध विषयाबद्दल जनजागृती वाढेल, असेही रंगोलीने म्हटले आहे.
 
 
 
 
 
 
 
‘मेंटल है क्या’ हा चित्रपट एकता कपूर प्रोड्यूस करतेय. तर प्रकाश कोवेलामुडी या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. या चित्रपटात कंगना व राजकुमार रावशिवाय अमायरा दस्तूर, अमृता पूरी, जिमी शेरगिल असे सगळे कलाकार आहेत.