मुलायमसिहांचा मायावतींकडून प्रचार!
   दिनांक :21-Apr-2019
श्यामकांत जहागीरदार
 
राजकारणात कोणी कोणाचा कायमचा शत्रू आणि कायमचा मित्र नसतो, असे म्हटले जाते. त्याचे प्रत्यंतर नुकतेच मैनपुरीत आले. मैनपुरी येथे समाजवादी पक्षाचे ज्येष्ठ नेते मुलायमसिंह यादव यांच्या प्रचारासाठी बसपाच्या सर्वेसर्वा मायावती आल्या होत्या. जवळपास २४ वर्षानंतर मुलायमसिंह यादव आणि मायावती यांना एका व्यासपीठावर यावे लागले.
 
 
 
सपा आणि बसपा यांच्यात झालेली ही दुसरी आघाडी आहे. बसपात कांशीराम यांचे युग असतांना आणि मायावती दुय्यम भूमिकेत काम करत असतांना सपा आणि बसपा यांनी १९९५ मध्ये विधानसभा निवडणुकीसाठी आघाडी केली होती. त्यावेळी बसपाच्या पाठिंब्याने मुलायमसिंह यादव मुख्यमंत्री झाले होते. मात्र मध्येच बसपाने मुलायमसिंह यादव सरकारचा पािंठबा काढून घेतला आणि मुलायमसिंह यादव यांचे सरकार पडले.
 
त्यानंतर लखनौतील स्टेट गेस्ट हाऊसमध्ये बसपाच्या नेत्या मायावती बैठकीसाठी आल्या असता त्यांच्यावर सपाच्या कार्यकर्त्यांनी हल्ला केला. मायावती यांचे कपडे फाडण्यात आले, त्यांना जिवाने मारण्याचा सपा कार्यकत्यार्र्चा प्रयत्न होता. भाजपा नेत्यांमुळे मायावती यांचा त्यावेळी जीव वाचला होता. त्यामुळेच आज त्या मुलायमसिंह यादव यांच्या प्रचारासाठी येऊ शकल्या.
 
लखनौतील स्टेट गेस्ट हाऊस कांडानंतर सपा- बसपा यांच्यातील संबंध विकोपाला गेले होते. मुलायमसिंह आणि मायावती यांच्यात 36 चा आकडा निर्माण झाला होता. या दोघांतून विस्तवही जात नव्हता. दोन्ही नेते आणि त्यांचे कार्यकर्ते एकदुसर्‍याचे तोंडही पाहायला तयार नव्हते. त्या वेळी या दोन पक्षाच्या नेत्यांनी एकदुसर्‍यावर जो शाब्दिक हल्ला केला त्याचे स्मरण यावेळी केले तर चांगलेच मनोरंजन होईल.
 
समाजवादी पक्षावर विशेषत: तेव्हाचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यावर हल्ला चढवतांना बसपा नेत्या मायावती यांनी २०१६ मध्ये म्हटले होते की, जोपर्यंत उत्तरप्रदेशात मुलायमसिंह आणि त्यांच्या मुलाचे अखिलेशचे राज्य आहे, तोपर्यंत राज्यातील जनता कधी सुखी होऊ शकत नाही. अखिलेशचा उल्लेख उपरोधिकपणे बबुआ असा करत मायावती यांनी जोपर्यंत राज्यात बबुआ ब्रॉडकास्टिंग कार्पोरेशन भाग दोन सुरू राहील तोपर्यंत राज्याचा विकास होऊ शकणार नाही, असे म्हटले होते. याआधी अखिलेश यादव यांनी मायावती यांचा उल्लेख बीबीसी २ म्हणजे बुआ ब्रॉडकास्टिंग कार्पोरेशन असा केला होता, त्याची परतफेड मायावती यांनी या पद्धतीने केली.
 
मुस्लिम समाजाच्या लोकांनी सपाला मतदान करू नये, सपाला केलेले मतदान वाया जाते, अप्रत्यक्षपणे त्याचा भाजपाला फायदा होतो, त्यामुळे कोणत्याही स्थितीत मुस्लिम समाजाने सपाला मतदान न करता बसपाला मतदान करावे, असे आवाहन मायावती यांनी त्यावेळी केले होते. त्यामुळे मुस्लिम मतदारांची पंचाईत झाली. मायावती यांचे तेव्हाचे ऐकावे की आताचे असा प्रश्न त्यांना पडला आहे.
 
२०१७ मध्ये अखिलेश यादव यांनी मायावती यांच्या पक्षाचा आणि सरकारचा उल्लेख पत्थरोवाली सरकार असा केला होता. आता त्यांची भाषा बदलली आहे, सरकार आल्यावर आम्ही ना मूर्ती बसवू ना स्मारक उभारू, फक्त विकास करू असे ते म्हणत आहे, सत्ता मिळाली नाही तर आम्ही विरोधी पक्षात बसू असे ते म्हणत आहेत, पण कोण विश्वास ठेवणार त्यांच्यावर? भाजपासोबत अनेक वेळा त्यांनी रक्षाबंधन साजरे केले आहे, आताही निवडणुकीनंतर त्या भाजपाशी हातमिळवणी करू शकतात, असे अखिलेश यादव यांनी म्हटले होते.
 
नोटबंदीनंतर पैशाच्या माळा हातात घेऊन आमची बुआ (मायावती) अडचणीत सापडली, असे अखिलेश यादव यांनी नोटबंदीच्या निर्णयानंतर मायावती यांच्यावर टीका करतांना म्हटले होते. सपा आणि बसपाच्या नेत्यांनी एकमेकांची कशी निंदानालस्ती केली याची मोठी यादी आहे. मात्र कालाय तस्मै नम:! आज मुलायमसिंह आणि मायावती एकमेकांवर स्तुतीसुमने उधळत आहेत. हा दोघांवर नियतीने उगवलेला सूडच म्हटला पाहिजे.
 
मैनपुरीच्या सभेत मुलायमसिंह यादव यांनी मायावती यांचे स्वागत करण्यासाठी जनतेला टाळ्या वाजवण्याचे आवाहन केले. आज मला अतिशय आनंद होत आहे, माझ्या प्रचारासाठी त्या आल्या, मला विजयी करण्याचे आवाहन त्यांनी जनतेला केले, त्यांचे उपकार मी कधीच विसरू शकणार नाही. मायावती यांचा नेहमीच सन्मान करा, त्यांनी आमची खूप मदत केली आहे, असे मुलायमसिंह म्हणाले. मुलायमसिंह यादव यांचे व्यासपीठावर आगमन होताच त्यांच्या स्वागतासाठी मायावती उभ्या झाल्या. अखिलेश यादव यांनी जेव्हा बसपाशी आघाडी केली, तेव्हा तो निर्णय मुलायमसिंह यादव यांना मान्य नव्हता. मात्र आपल्या राजकीय अस्तित्वासाठी मायावती आणि मुलायमसिंह यादव यांना आज एका व्यासपीठावर यावे लागले.
 
मुलायमसिंह यादव यांनी पंतप्रधानपदाचे स्वप्ने पाहणे वयामुळे सोडले असले तरी मायावती यांचे पंतप्रधानपदाचे स्वप्न कायम आहे. आपल्या स्वप्नपूर्तीसाठी समाजवादी पक्ष आपल्याला मदत करेल, असा मायावती यांचा विश्वास आहे. त्यामुळे आपला झालेला अपमान विसरून त्यांनी समाजवादी पक्षासोबत आघाडी केली. लोकसभा निवडणुकीनंतर जेव्हा मायावती यांचा भ्रमनिरास होईल, तेव्हा त्यांची प्रतिक्रिया काय राहील हे पाहणे मनोरंजक ठरेल.