धोनीला किमान २ सामन्यांसाठी विश्रांती देण्यात यावी- श्रीकांत
   दिनांक :21-Apr-2019
विश्वचषकासाठी जाणाऱ्या संघात महेंद्रसिंग धोनीला पर्याय म्हणून दिनेश कार्तिक याला संधी देण्यात आली आहे. परंतु धोनीची तंदुरुस्तीदेखील महत्वाचा घटक आहे. त्यामुळे या स्पर्धेआधी IPL सामन्यांमध्ये धोनीला किमान २ सामन्यांसाठी तरी विश्रांती देण्यात आली पाहिजे, असे मत माजी क्रिकेटपटू के श्रीकांत यांनी व्यक्त केले आहे.
 
 
इंग्लंडमध्ये होणारी वर्ल्डकप स्पर्धा लक्षात घेऊन माजी कर्णधार आणि चेन्नई सुपर किंग्ज संघाचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीला आयपीएलमधील काही सामन्यांमध्ये विश्रांती देण्याची गरज आहे, असं मत माजी क्रिकेटपटू श्रीकांत यांनी व्यक्त केलं आहे. धोनीला पाठदुखीचा त्रास होत आहे. कोलकाताविरुद्धच्या सामन्यात त्याच्या पाठदुखीने उचल खाल्ली होती. त्यानंतर हैदराबादविरुद्धच्या लढतीत त्याला विश्रांती देण्यात आली होती.
‘विश्वचषक स्पर्धा ही अत्यंत महत्वाची असते. अशा स्पर्धांमध्ये महत्वाचे खेळाडू तंदुरुस्त असणे गरजेचे आहे. त्यामुळे धोनीला IPL च्या किमान २ सामन्यांमध्ये तरी विश्रांती देण्याची गरज आहे. तो सध्या पाठदुखीने त्रस्त आहे. पण विश्वचषक स्पर्धेआधी त्याचा पाठदुखीचा त्रास दूर झाला पाहिजे. तो अनुभवी आहे, त्यामुळे त्याचा अनुभव भारताला खूप फायद्याचा आहे,’ असं श्रीकांत यांनी म्हटलं आहे.