कोलंबो साखळी बॉम्बस्फोटांनी हादरले ; १५६ जणांचा मृत्यू
    दिनांक :21-Apr-2019
कोलंबो, 
 जगभरात ईस्टर संडे साजरा होत असताना श्रीलंकेतील कोलंबो साखळी बॉम्बस्फोटांनी हादरले आहे. तब्बल सहा ठिकाणी साखळी बॉम्बस्फोट झाले असून यातील तीन बॉम्बस्फोट हे चर्चमध्ये तर ३ बॉम्बस्फोट हे हॉटेलमध्ये झाल्याची माहिती मिळत आहे. ईस्टर संडेला झालेल्या या बॉम्बस्फोटात आतापर्यंत १५६ जणांचा मृत्यू झाला असून ४०२ हून अधिक जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
 
 
 कोलंबोमधील शँग्रिला आणि सिंनामोन ग्रँड हॉटेलमध्ये तसेच कोलंबो बंदराजवळील सेंट अँथनी चर्च, कोच्चिकेडे चर्च, उत्तलम जवळील सॅबेस्टिअन चर्च या तीन चर्चमध्ये स्फोट झाल्याची माहिती मिळत आहे. रविवारी (२१ एप्रिल) स्थानिक वेळेनुसार सकाळी ८.४५ वाजण्याचा सुमारास हा स्फोट झाल्याची माहिती काही नागरिकांनी दिली आहे.
 
 
ईस्टर संडे असल्याने चर्चमध्ये मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते. या बॉम्बस्फोटात आतापर्यंत १५६ जणांचा मृत्यू झाला ४०२ हून अधिक जण जखमी झाले आहेत. जखमींवर उपचार सुरू असून अनेकांची प्रकृती चिंताजनक आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जखमी आणि मृतांमध्ये विदेशी पर्यटकांचाही समावेश अधिक आहे. बॉम्बस्फोटाची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे. या स्फोटाची जबाबदारी अद्याप कोणत्याही दहशतवादी संघटनेने स्विकारलेली नाही.
 
 
भारताच्या परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी कोलंबोतील बॉम्बस्फोटांच्या घटनेवर प्रतिक्रिया दिली आहे. 'कोलंबो येथील भारतीय उच्चायुक्तांच्या संपर्कात आहोत. तेथील परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे' असं ट्वीट सुषमा स्वराज यांनी केलं आहे. तसेच कोलंबोतील साखळी बॉम्बस्फोटाच्या घटनेनंतर श्रीलंकेतील भारतीय दूतावासाकडून हेल्पलाइन नंबर जारी करण्यात आला आहे.