अकोल्यात ‘नेचर की पाठशाला’ उपक्रम
   दिनांक :21-Apr-2019
 
 
  अकोला: सध्याच्या यांत्रिकी व आभासी युगात माणूस निसर्गापासून दूर जात आहे व त्याचे दुष्परिणाम जैवसृष्टीतील सर्व जिवांना भोगावे लागत आहेत. भारतीय संस्कृतीत निसर्ग जपण्याचे संस्कार अनादी काळापासून मानवावर होत आले आहे, पण आताची पिढी निसर्ग संस्कारापासून दूर जात आहे. या नवीन पिढीवर निसर्ग संवर्धनाचे संस्कार करण्यासाठी निसर्गकट्टा व प्रागतिक शिक्षण प्रसारक मंडळ, अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने ‘नेचर की पाठशाला’ या उपक्रमाची सुरुवात वसुंधरा दिनाच्या पूर्वसंध्येला करण्यात आली.
 

 
 
येथील न्यू ईरा हायस्कूलच्या वर्गात ‘नेचर की पाठशाला’ या उपक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी मंचावर अकोला वन्यजीव विभागाचे मनोजकुमार खैरनार, प्रागतिक शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष मोहन गद्रे, निसर्ग कट्टाचे सहसचिव प्रदीप किडीले व न्यू ईरा कॉन्व्हेंटच्या मुख्याध्यापिका अनघा देशमुख होत्या.
कार्यक्रमाबाबत अधिक माहिती देताना निसर्ग कट्टाचे संस्थापक अमोल सावंत म्हणाले की, फक्त वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन या दोन गोष्टींमध्ये न अडकता त्याला निसर्गाबद्दल खास करून स्थानिक पर्यावरणाची, स्थानिक जैवविविधतेबद्दल अधिकाधिक माहिती जाणून घ्यायची असते म्हणून ‘नेचर की पाठशाला’ या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात येत आहे.
 
हा उपक्रम दर महिन्याच्या पहिल्या व तिसर्‍या रविवारी सकाळी 8 ते 10 यावेळेत न्यू ईरा हायस्कूल येथे आयोजित करण्यात येणार असून या उपक्रमात सहभागी होणार्‍या निसर्ग प्रेमी विद्यार्थ्यांना निसर्गाविषयी स्लाईड, फिल्म शो, मान्यवरांचे व्याख्यान, निसर्ग वाचन, लेखन, निसर्ग खेळ अशा विविध उपक्रमांच्या माध्यमातून निसर्ग संवर्धन अवगत करून देण्यात येणार आहे.
यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मनोजकुमार खैरनार म्हणाले की, शालेय जीवनातून निसर्ग निरीक्षणाची आवड जर विद्यार्थ्यांना लागली तर त्यांचे व्यक्तिमत्त्व घडविण्यास मोठा हातभार लागतो. निसर्ग हा मोठा गुरू आहे, तो नेहमी चांगल्या गोष्टी शिकवत असतो, ती शिकण्याची क्षमता आपल्यामध्ये निर्माण झाली पाहिजे. आपल्या जवळचे काटेपूर्णा अभयारण्य हे निसर्ग अभ्यासाचे चांगले ठिकाण आहे, त्याला भेट देऊन वने व वन्यजीव यांच्याविषयी अधिकाधिक जाणून घेण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले.
विज्ञान शिक्षक प्रदीप किडीले तसेच मोहन गद्रे यांनी उपस्थितांना या उपक्रमाबाबतची माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रस्ताविक निसर्ग कट्टाचे गौरव झटाले यांनी, तर आभारप्रदर्शन प्रेम अवचार यांनी केले.