मनभावन ‘पळस!’
   दिनांक :21-Apr-2019
पूर्व दिशा जणू केशरी वस्त्र परिधान करून त्या मिहिराच्या स्वागतासाठी सज्ज झाली होती. सहस्त्रांशूचे कोमल किरणं काळोखाचा परीघ छेदत वसुंधरेच्या मिलनासठी धडपडत होते. तृणाकुरांवरील दविंबदूंचे आच्छादन त्या सोनेरी रविकिरणाने विलग होणारे होते. क्षितीजातून निघणारा सहस्रश्मी वसुंधरेला सावकाश तिमिरातून प्रकाशाकडे नेत होता. संपूर्ण सृष्टीचं त्या मिहिराच्या आगमनाने तेजोमय भासत होती.
 
 
 
हलकेच पाखरांची किलबील मनाला हषूर्ंन जात होती. वसंत ऋतूची चाहूल सर्वत्र जाणवत होती. वृक्षांमधून सृजनशीलता फांदोफांदी जाणीव करून देत होती. पानगळीने वृक्षांचे एकेक पान गळून त्या वृक्षाच्या खाली अवनीला भेटायला जात होतं. वृक्षांखाली असंख्य शुष्क पर्णे त्या मातीत मिसळून वार्‍याच्या मंद झुळुकीने सुद्धा इतरस्त्र विखुरलेली दिसत होती. पानगळ सुरू असली, तरी वृक्षांना मात्र नव्याने धुमारे येऊ लागलेत. जवळपास वृक्ष निष्पर्ण झालेले दिसत होते. सर्वत्र वृक्षावर फांद्यांचंच साम्राज्य पसरलेलं होतं. परंतु ‘पळस’ मात्र एवढ्या पानगळीत निष्पर्ण होऊनही फुलला होता. असंख्य केशरी रगांची उधळण करीत, प्रत्येकाच्या मनाला भुरळ घालून आकर्षित करीत आहे. वाटेवरच्या वाटसरूंना क्षणभर का होईना स्वत:कडे बघण्यास बाध्य करीत आहे.
 
‘पळस’ वृक्षाच्या खाली जणू केशरी रंगाचा गालीचाच अंथरला आहे, असा भास होत आहे. पळसाची टोकदार, निमुळती व वक्र असलेली फुलं कुणालाही हर्षभरीत केल्याशिवाय राहणार नाही. अनेकांच्या काटेरी आयुष्यात क्षणभर सुखद चाहुल आणणारा पळस म्हणजे एक महोत्सवच आहे. निसर्गातील असंख्य वृक्ष निश्चेष्टपणे वर्षानुवर्षे ही पानगळ सोसूनही नव्या उमेदीने कोवळ्या, पोपटीसर नूतन धुमारे फुटण्याच्या प्रतीक्षेत असतात. एवढ्या रणरणत्या शुष्क उन्हातही पळसाला निसर्गाकडून मिळालेलं वरदानच. असंख्य वृक्षांच्या गर्दीत तसा उपेक्षिला जाणारा पळस मात्र वसंतात सर्वांना सुखावून जातो. इतर ऋतूंमध्ये त्याच्या पानांचा उपयोग पत्रावळी व द्रोण यासाठी मात्र आवर्जून केल्या जातो. फुलांचाही उपयोग रंग तयार करताना व उन्हाळ्यात अनेकदा ओैषधी उपयुक्त म्हणूनही करण्यात येतो.
 
‘पळस’ आपलं स्वतंत्र अस्तित्व राखून केशरी फुलांची वसंतात अनवरत उधळण करीत रानमाळात प्रत्येक फुलांच्या स्पर्शातून हर्षभरीत, आल्हादक वातावरण निर्मिती करीत असतो. मानवालाच नाही तर पक्ष्यांनाही आपल्या सौंदर्याची भुरळ घालणारा पळस सर्वांना आकर्षित करतो.
 
निमुळत्या, निर्मनुष्य, लांब वाटेवर असंख्य पळसाचे वृक्ष वाटसरूला रखरखत्या उन्हातही सोबत करत एकाकीपणाची उणीव दूर करून उभा असतो. असंख्य पक्ष्यांचे निवासस्थान म्हणूनही तो ज्ञात आहे. तसेच पशूंनाही आपल्या छायेत सामावून घेणारा पळस अंततर्मनाला प्रेरीत करून जगण्याची प्रचोदकता मानवाला देऊन आयुष्याचं आनंदविभोर करतो. आपल्या आयुष्यात अनेक रंगीबिरंगी फुलं येतात, परंतु त्यातील पळस पुष्प मात्र सर्व गुणांनी अनेकांना आकर्षित करतात.
मृणाल मंगेश भगत/दुर्गे
8007352221