‘टॉयलेट मॅन’ साडेतीन लाखांत निवडणूक लढणार
   दिनांक :21-Apr-2019
 
 
 
मुंबई: देशभरात ‘टॉयलेट मॅन’ अशी ओळख असलेले उद्योजक रामदास माने हे माढा लोकसभा मतदार संघातून अपक्ष निवडणूक लढत आहेत. मी या निवडणुकीसाठी केवळ तीन ते साडेतीन लाख रुपये खर्च करणार आहे, असे त्यांनी आज रविवारी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले.
यावेळी बोलताना माने म्हणाले, मी या निवडणुकीवर केवळ तीन ते साडेतीन लाख रुपये खर्च करीत आहे. 25 हजार रुपयांची अनामत रक्कम, 70 हजार रुपयांचे डिझेल, 70 हजार रुपयांची प्रसिद्धिपत्रके आणि उर्वरीत पैसे माझ्यासोबत प्रचाराचे काम करणार्‍या लोकांसाठी खर्च होतील. माझ्यासोबत 50 पेक्षा जास्त लोक प्रचाराचे काम करीत आहेत. त्यांचे जेवण, प्रवास आणि इतर कामांसाठी हे पैसे खर्च केले जातील.
 

 
 
माने यांनी आपण मोठ्या जाहीर सभा घेणार नसल्याचेदेखील यावेळी स्पष्ट केले. माने म्हणाले, मी केवळ घरोघरी जाऊन लोकांची भेट घेणार आहे. त्याच माध्यमातून माझा प्रचार होईल.
दरम्यान, माने यांनी त्यांच्यावर उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी दबाव टाकला जात असल्याची माहितीदेखील दिली. माने म्हणाले, मी ज्या दिवशी माढा लोकसभेतून माझा उमेदवारी अर्ज भरला, त्या दिवशीच माझ्यावर उमेदवारी अर्ज भरू नये, यासाठी दबाव आणला जात होता. परंतु तरीही मी अर्ज भरला. अर्ज भरला त्या दिवसापासून दररोज 10-15 माणसे माझ्याकडे येतात आणि उमेदवारी अर्ज मागे घ्या, असे मला सांगतात. परंतु, मी अर्ज मागे घेणार नाही, असे म्हणाले.